आईचे लग्न भाग ३(अंतिम)

आईचे लग्न भाग ३(अंतिम)
जलद लेखन
कर्तव्य
विषय - आईचे लग्न भाग ३ (अंतिम)

आशिषचे करियरही तेवढेच महत्त्वाचे आहे. तो आपल्याजवळ किती दिवस राहील. आता आपल्याला सवय करायलाच हवी.

आशिष म्हणतोय त्या गोष्टीचा विचार करायचा कां? ती स्वतःच स्वतःच्या मनाला प्रश्न विचारू लागली. पहिली गोष्ट म्हणजे समाज काय म्हणेल? आपण असे करून चूक तर करत नाही नां? एक नां अनेक प्रश्न सुवर्णासमोर फेर धरून नाचू लागले. तेवढ्यात सुवर्णाचा भाऊ विवेक तिच्या घरी आला.

थोडा वेळ निवांत बसल्यावर विवेकने हळूच सुवर्णाजवळ पुन्हा गोष्ट काढली.

"ताई काय ठरवले मग? केलास कां लग्नाचा काही विचार?"

यावेळी मात्र सुवर्णाने एकदम नकार दिला नाही. ती फारशी संतापली ही नाही. ती फक्त चूप होती. भावाने ओळखले, की आशिषच्या बोलण्याचा थोडाफार परिणाम ताईच्या मनावर झाला असेल. कदाचित तिच्याही गोष्ट लक्षात आली असेल.

"ताई तू काही बोलत कां नाहीस?"

यावेळी मात्र सुवर्णाने आपले मौन तोडले.

"पण विवेक समाज काय म्हणेल?लोक काय विचार करतील?"

यावर विवेक म्हणाला. "असाच विचार करून पती निधनानंतर स्त्रिया आपलं उरलेलं आयुष्य पणाला लावतात." पतीच्या मृत्यूनंतर ती स्त्री आधीच खचलेली असते. तिला याबाबत विचारण्याची कोणीही हिंमत करत नाही.

" तिला काय वाटेल? तिला हे पटेल की काय ?वगैरे वगैरे. आणि ती स्वतःहून म्हणू शकत नाही. अशा दुष्टचक्रात स्त्री अडकली जाते आणि तिच्या पुढील पूर्ण आयुष्य ती एकाकी जगते. कारण पिलांना पंख फुटल्यानंतर ती आपल्या घरट्यातून उडून जाणारच. तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य पडलेलं असतं. अशावेळी नक्कीच याबाबत तिने विचार करायलाच हवा. कारण वेळ निघून गेल्यावर काहीच अर्थ नसतो.

या उलट पुरुषांच्या बाबतीत विचार केला तर ते स्वतःचे निर्णय घेण्याला सक्षम असतात. अशावेळी पटकन लग्न करून ते मोकळे होतात. मात्र अशा बाबतीत स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीचा ती विचार करते.

त्यामुळे अशा प्रश्नांचा थोडा भावनिक विचार करून हाताळणे महत्त्वाचे आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझा मुलगाच तुला तुझ्या लग्नाबद्दल म्हणतो आहे. किती अकाली प्रौढत्व आलं आहे त्याला. अगं आम्हाला सुद्धा ही गोष्ट तुझ्यापुढे काढायची हिंमत होत नव्हती. ते काम त्याने केले. बघ तू विचार कर व मला सांग.

"ठीक आहे तुझं म्हणणं पटलं मला." मी तयार आहे लग्नासाठी. लगेच विवेकने आशिषला फोनवर ही गोष्ट सांगितली. एक मोठा प्रश्न सुटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता.

आशिष च्या मामाने लवकरच एक चांगलं स्थळ शोधून काढलं. त्या व्यक्तीच्या पत्नीचा सुद्धा अगदी थोड्याशा आजाराने मृत्यू झाला होता.

स्वप्निल त्याचे नाव. तो एका बँकेत नोकरी करत होता. त्यालाही एक लहान मुलगी होती. विवेक ने आशिषला लगेच तातडीने बोलावून घेतले. सर्वांनाच हे स्थळ आवडलं. विशेष म्हणजे स्वप्निल ने आशिष चा आनंदाने स्वीकार केला होता. स्वप्नील ची मुलगी स्वीटी अत्यंत गोड मुलगी. आता आशिषला एक बहीण मिळाली होती. कोणताही गाजावाजा न करता नोंदणी पद्धतीने स्वप्निल व सुवर्णा विवाहबद्ध झाले. दोघेही खूप खुश होते. सुवर्णाला पुढील आयुष्य जगण्यासाठी जोडीदार मिळाला होता.

स्वप्निल ला एक प्रेमळ पत्नी मिळाली होती. आशिषला स्वीटी सारखी गोड बहीण मिळाली होती.

दुसऱ्या दिवशी आशिषला निघायचे होते. त्याने आपल्या आई-वडिलांना वाकून नमस्कार केला. सुवर्णाने आशिषला प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या डोक्यावर तिच्या अश्रूंचा अभिषेक होत होता.

एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने आशीर्वाद द्यावा तसा तो आपल्या आईला म्हणाला,

"आई सुखी राहा".मला तुला सतत आनंदी पाहायचं आहे. काळजी घ्या.

आशिषच्या चेहऱ्यावर जणू कर्तव्य पार पाडल्याचा आनंद होता. आपल्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद ही तो हलकेच आपल्या डोळ्यात साठवत होता. पण त्याला आता निघावे लागणार होते.

बरं निघतो मी आई-बाबा. असे म्हणत आशिष घराबाहेर पडला. स्वप्निल व सुवर्णा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पहातच राहिले.

समाप्त

सौ. रेखा देशमुख