पंचगंगा सोसायटीच्या आवारात चार नंबरच्या बिल्डिंग समोर एक पांढऱ्या रंगाची लांब लचक महागडी बी. एम. डबल्यू गाडी येऊन उभी राहिली. मध्यमवर्गीय वस्तीत एवढी मोठी महागडी गाडी रोज येत नसल्याने, सगळे आसपासची माणसं ती गाडी पहायला उत्सुक. लहान मुलं गाडी भोवती गोळा झाले, तर इतर बायका पुरुष खिडकीतून डोकावून पहात होते.
साधारण पन्नास पंचावन्न वर्षांच्या बाई गाडीतून खाली उतरल्या. लाल रंगाची काठा पदराची साडी, त्यावर लांब घसघशीत मंगळसूत्र, कपाळावर मोठं लाल कुंकू, केसांचा अंबाडा. त्यांचं तेजस्वी खानदानी रूप, सुंदर पेहराव पाहून पाहणाऱ्यांना कुतूहल वाटू लागले, बाई आल्या तरी कोणाकडे. ड्रायव्हरला गाडीतून बॅगा घेऊन येण्यास सांगून त्या बिल्डिंगच्या दिशेने चालू लागल्या.
दुसऱ्या मजल्यावरच्या, २०३ फ्लॅट मध्ये जाऊन त्यांनी बेल वाजवली. सोनिया लगबगीने दार उघडायला आली. तिने खिडकीतून गाडी येताना पहिली होती.
" हॅलो, मम्मा ...." म्हणत सोनिया आईच्या गळ्यात पडली. सौ.अवंतिका अविनाश जहागीरदार ह्यांनी आपल्या लेकीला औपचारिक मिठी मारत, उसना आनंद चेहेऱ्यावर आणला अन् नुसतच हसल्या सारखं केलं.
" येना मम्मा,...आत ये"
आत येताच समोर, पराग, सोनियाचा नवरा दिसला. त्याने पुढे सरकून अवंतिकाला वाकून नमस्कार केला,
"नमस्कार, मॅडम, कश्या आहात?"
" आय एम गूड, थँक्यू. हाऊ आर यू पराग?"
"फाइन मॅडम... थँक्यु" परागने उत्तर दिले.
मम्मा, पराग, काय तुम्ही दोघे असं फॉर्मल बोलताय, घर आहे हे, ऑफिस नाही. आणि हो पराग तू काही आता माझ्या पपांच्या ऑफिसमध्ये काम करत नाहीस. तू माझ्या मम्माला आई किंवा मम्मा म्हणू शकतोस, हे काय मॅडम मॅडम लावलय! असं इतकं काय औपचारिक बोलताय तुम्ही दोघे.
"सोना,असं लगेच इतकी पटकन नाही जुळत नवीन नात. पण हो नातं तोडता सहज येतं, जुळायला मात्र वेळ लागतो . तू नाही सहज नातं तोडून, आम्हाला आणि आपलं आलिशान घर सोडून तडकाफडकी निघून गेलीस. कसलाही विचार न करता ह्या परागसाठी तू आम्हाला सोडलस. मम्मा, पप्पाला काय वाटेल त्यांना किती त्रास झाला असे ,काहीच वाटलं नाही का ग? कसलाच विचार मनात आला नाही का ग सोनिया?..."
" मम्मा, त्या सगळ्याला आता दोन वर्ष झाली, प्लीज आपण त्या विषयावर नको ना बोलायला. आपण हे सगळं बोलून झालंय आणि आज तू आमच्याकडे पहिल्यांदा आलीस.अखेर आपली दोन वर्षांनी भेट झाली....."
"हो सोना विसरायचं म्हणलं तरी सोप्पं नाहीये. पप्पाला अजुनी राग आहे, त्याला नाहीच पटलं हे तुमचं लग्न. मी आज आले इथे, कशी राहू मी तुझ्या शिवाय, एक आईचं मन आहे माझ.आपली लाडकी लेक, आपला काळजाचा तुकडा जेव्हां आपलं काही न ऐकता, आई वडिलांच्या मना विरुद्ध लग्न करून घर सोडून जाते, तेव्हा त्या आई वडिलांना काय यातना होत असतील? ह्याची कल्पना तुला आत्ता येणार नाही. मी जेकाही बोलते आहे, हे सगळं, माझा त्रास,तू जेव्हा आई होशील तेव्हा कळेल तुला"
तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि ड्रायव्हर गाडीतून सामानाने भरलेल्या पिशव्या घेऊन आला.
बॅग मधून सुंदर रंगीत कागदात गुंडाळलेले मोठे महागडे गिफ्टस् अवांतिकाने परागच्या हातात दिले. पराग सोनियकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला.' घेऊ की नको? ' हा त्याच्या चेहेऱ्यावरचा प्रश्नार्थक भाव सोनियाने बरोबर टिपला. नजरेने " होकार " अर्थी इशारा सोनियाने परागला केला .
अवंतिका :"अरे घे पराग, तुमच्या लग्नाचे गिफ्ट आहे हे. सोनाकडे नको बघू ती काही बोलणार नाही, घे तू "
पर्स मधून एक बॉक्स काढला. त्यावर ज्वेलरचे नाव कोरले होते. आत मध्ये नक्कीच कुठला तरी दागिना असणार, हे बघूनच कळेल. तो बॉक्स सोनियाला देत अवंतिका म्हणाली, " सोना, धीस इज फॉर यू डिअर"
"नाही मम्मा, मला नको हे,. तू दिलंस ना परागला. आता ह्याची काय गरज आहे?"
" अगं, काय नाही नाही करतेस, माझ्या आणि पप्पा कडून स्पेशल गिफ्ट आहे तुझ्यासाठी, उघडून तर बघ ... यू विल लव्ह इट"
सोनिया ने बॉक्स उघडून पहिला. तिचा अंदाज बरोबर होता. दागिन्यांचा बॉक्स होता तो. पण तिला वाटेल तेव्हढा साधा दागिना नसून त्यात हिऱ्यांचा लखलखता हार आणि सुंदर कानातले होते.त्या सुंदर हिऱ्यांचा हाराची किंमत नक्कीच रुपये सात आठ लाखांच्या वर होती!
" मम्मा, खरंच खूप सुंदर आहे हा हार, पण मला नकोय."
" काय वेडेपणा करतेस, हा गिफ्ट समज तुमच्या लग्नाच माझ्या आणि पप्पा कडून."
" तू आणि पप्पांनी आमचं लग्न मान्य करून आम्हाला मनापासून जर आशीर्वाद दिले तर ते सगळ्यात अनमोल गिफ्ट असेल. ह्या डायमेंड्स पेक्षापण जास्त किमती असेल ते माझ्याकरिता."
" ओह! प्लीज....उगाच कसले ते इमोशनल डायलॉग मारू नकोस! अगं हा असला किमती हार पराग तुझ्यासाठी कधी घेईल ? इनफॅक्ट कधी तो घेऊ शकेल की नाही कोणास ठाऊक! "
" ओह्! आय वॉज रॉंग....माझा अंदाज चुकला. मला वाटलं आज मला भेटायला माझी मम्मा अलिये, पण नाही आज देखील आल्या आहेत सौभाग्यवती अवंतिका अविनाश जहागीरदार म्हणजे सगळ्यांच्या मॅडम!! तू आणि पप्पा महागडे गिफ्ट देऊन माझी आजपण समजूत काढत आहात का? जशी लहानपणी काढत होतात??
मी पण ना... खरंच.....
मी उगाच तुला आल्यापासून मम्मा मम्मा म्हणत आहे. परागने तुला मॅडम म्हटलना तेच बरोबर आहे. मी पण मॅडम म्हणायला हवं तुला.खरं तर मी तुला आणि पप्पाला पण लहानपणापासून मॅडम आणि सर असच हाक मारायला हवे होते."
" सोनिया स्टॉप इट! खूप जास्त बोललीस! आपल्या आईशी बोलतेस तू हे भान असू दे"
"भान आहेच, खरं तर भानावर तूच आणलस मला. माझी आपली भाबडी अपेक्षा होती कि, मी घर सोडून गेल्यावर तरी तुला माझी मनापासून आठवण येईल आणि माझी आई, हो माझी लहानपणीची आई मला भेटायला येईल..... पण आज इथे भेट झाली ते मम्माची, श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तिमत्व द इंडस्ट्रीललिस्ट अविनाश जहागीरदार ह्यांच्या पत्नीची."
" आज पुन्हा माझी आई हरवली...."
"खरं तर तू तेव्हा पासूनच माझ्या पासुन दुर झालीस जेव्हा पप्पांचा बिझनेस प्रगती करू लागला. तू त्यांना बिझनेस मध्ये जॉईन झालीस. तुझ घराकडे माझ्या कडे सुरवातीला लक्ष असे पण कालांतराने तू माझ्या पासून दुरावलीस. मला आठवतेय तू आणि पप्पा मला झोपताना लहानपणी छान गोष्टी सांगायचा कधी गाणी म्हणायचा. पण पैसा, बिझिनेस, प्रगती ह्या सगळ्यात तुम्ही इतके बुडलात की त्या पुढे दुसरं काहीच तुम्हाला दिसत नवहतं. बऱ्याचदा तुम्ही रात्री बिझनेस डिनर, पार्टीज ना जाऊ लागलात आणि मी एकटीच माझ्या खोलीत पडून असे.....तेव्हा...."
सोनियाचा कंठ दाटून आला....स्वतःला सावरत डोळ्यातलं पाणी लपवत ती आत खोलीत गेली. आतून कपाटातून एक मऊ मुलायम अबोली रंगाची कॉटनची साडी घेऊन आली.....
ती पुन्हा बोलू लागली....
".....तेव्हा मी काय करायचे माहितीये?? तुझी ही जुनी मऊ कॉटनची साडी जवळ घेऊन झोपायचे. त्यात मला तुझी ऊब तुझी माया जाणवत असे. आजही जाणवते. मी तुला खूप मिस करते. तुझ्या ह्या मऊ कॉटन साडीत मला तुझा गंध, तुझा स्पर्श जाणवतो....
तू तर कॉटन साड्या नेसण फार पूर्वीच सोडलस कारण पप्पाला ते तुझ साध्या कॉटन साड्या नेसण म्हणजे फार डाऊन मार्केट वाटायचं! पण मला माझी आई ह्याच साध्या साडी मध्ये भेटत होती. ह्या तुझ्या शिफॉन, जॉर्जेट, काठा पदराच्या महागड्या पार्टी वेअर साड्यांन मध्ये माझी आई कुठे तरी हरवली होती.त्यात होत्या मॅडम, सौभाग्यवती अवंतिका अविनाश जहागीरदार!
तू आणि पप्पा सतत बिझिनेस आणि कामात व्यस्त रहायचा माझ्यासाठी तुमच्याकडे वेळ असायचा पण अगदी मोजकाच! तू आणि पप्पांनी मला सगळं सगळं दिलंय मी काही मागायच्या आधीच माझ्या हातात वस्तू असायची.पण मला ते भौतिक सुख नको होतं, मला तेव्हापण आणि आज देखील तुम्ही दोघे माझे मम्मा पप्पा हवे आहात....
एवढं बोलून सोनिया आत खोलीत निघून गेली ...
स्तब्ध होऊन ऐकत असलेल्या अवंतिका मॅडम सोनियाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक टक पहात होत्या. त्यांची नजर स्वतःच्याच जुन्या कॉटन साडीवर पडली आणि त्या भूतकाळात पोहोचल्या....
सोनिया बोललेला शब्द अन् शब्द खरा होता. अवंतिका नकळतपणे सोनिया पासून दुरावली गेली. तिला आणि अविनाशला ठाऊक होतं आपण आपल्या लेकीला कामामुळे खूप कमी वेळ देत आहोत. त्याच्या मोबदल्यात सोनियाला महागडे ड्रेस, खेळणी, छान छान मिठाया, चॉकलेट्स आणली जात . कधी दोन तीन दिवसांसाठी तिला बाहेर देशात फिरायला घेऊन जात, तोच काय तो वेळ तिला देत होते. ट्रीप वरून आल्यावर पुन्हा पुढील सहा सात महिने मात्र सोनिया आपल्या आई बाबांच्या सहवासांची आतुरतेने वाट बघत असायची.
काही न बोलता अवंतिका सोनिया पराग ह्यांच्या घरातून निघून गेली.....
थोड्या वेळाने सोनियाचा राग शांत झाल्यावर परागने तिला समजावलं. काहीही झालं तरी आईशी असं सोनियाच बोलणं चूक आहे आणि तिने आईची माफी मागितली पाहिजे! सोनियाला देखील पटलं आपण चुकलो ही भावना तिच्या मनात ट टोचू लागली. तिने ठरवलं उद्या सकाळी मम्मा ने आणलेली सगळी गिफ्ट घेऊन घरी जायचं ती परत करायची आणि आईची माफी मागायची.
सकाळी अकराच्या सुमारास दोघे जहागीरदार व्हीला वर जाण्यास निघाले, बिल्डिंगच्या खाली पोहोचले आणि चकित होऊन समोर पहातात तर कोण? खुद्द इंडस्ट्रीयलिस्ट श्री. अविनाश जहागीरदार आणि सौ. अवंतिका बाई हजार होते.
"सर, मॅडम ...तुम्ही दोघे इथे?? या ना प्लीज कम ....." पराग ने विनम्रतेने दोघांचे स्वागत हसत मुखाने केले.
" नो... नो..... आम्ही कुणी सर मॅडम नाही ....पराग तू आम्हाला आई बाबा म्हण! चालेल ना? सोना? " अविनाश ह्यांनी सोनियाकडे पहात विचारले
सोनियाने पहिलं तर आज अवंतिकाने गुलाबी रंगाची सुंदर स्टार्च अन् इस्त्री केलेेली कॉटन साडी नेसली होती.आज तिची आई त्या कॉटन साडीत अधिकच सुंदर दिसत होती. आज अखेर तिला तिची आई पुन्हा भेटली....
सोनिया आणि परागने आई वडिलांची माफी मागितली.श्रीमंत बिझनेसमन आज कुठेतरी हरवले आणि आज अविनाश अवंतिका आई वडील म्हणून आपल्या लेकीला आणि जावयाला भेटले. त्यांना आपलंसं केले.....
अविनाश आणि अवंतिकाने देखील सोनियाची माफी मागितली. खरं तर आता वेळ गेली होती, पण लहान सोनाला वेळ न देणं ही त्यांची खूप मोठी चूक होती.तिला वेळ देता आला नाही, त्याचा मोबदला म्हणून तिला महागडी खेळणी वस्तू कपडे देऊन ते आई वडिलांची जगा नाही घेऊ शकत हे अविनाश आणि अवंतिकाला उशिराने का होईना कळले. त्यांना आपली चूक समजली.....
समाप्त....
©तेजल मनिष ताम्हणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा