आई जेवायला येते

आई जेवायला येते
मुलीची आई...


"आई, उद्या ये ना जेवायला. तुझ्या आवडीचा मेनू करणार आहे." प्रिशाने फोनवर सुमेधाला विचारले.

"मी येऊ? आणि तुझ्या बाबांना कुठे पाठवू?" कपड्यांच्या घड्या करता करता हसत सुमेधा म्हणाली.

"कुठे पाठवू, म्हणजे काय? त्यांनाही घेऊन ये." कपाळावर आठ्या पाडत प्रिशा म्हणाली.

"तुझे बाबा घर सोडून येणार? त्यांच्या मॅचेस नाही का जाणार? सोड तो विचार. माझ्या आवडीचा स्वयंपाक मीच करेन कधीतरी. आणि अगदी तुला वाटलंच तर संध्याकाळी घेऊन येऊ." सुमेधा विषय संपवत म्हणाली.

"तुझं ना.. हे असं असतं बघ. कधीतरी काहीतरी जमून येतं तर तुझी ही नाटकं. सोड.. नकोच येऊस. एक दिवस म्हटलं आपल्या हाताने काहीतरी गरम गरम करून खायला घालावं तर नाही.. बाबा नाही येणार आणि आजी नाही येणार." रागाने फोन ठेवता ठेवता प्रिशाने केलेली बडबड सुमेधाने ऐकलीच. लेक अजून चिडायच्या आत तिला भेटायला जायचं ठरवूनही टाकलं.

"काय हे? आज काय सण आहे का? एवढ्या लवकर उठलीस ते." झोपेतच शशांक बडबडला.

"लवकर?? नऊ वाजले आहेत. ऐका.. प्रिशाचा काल फोन आला होता. आपल्याला जेवायला बोलावले आहे तिने."

"मग हे काल का नाही सांगितलेस?"

"काल होता का तुम्ही घरी?"

"ऑफिसमध्येच होतो.. भटकत नव्हतो."

"विषय भरकटवू नका. प्रिशाकडे येणार की नाही?"

"नाही.. आठवड्यातून एक दिवस मिळते सुट्टी. त्यात आज आयपीएल आहे."

"तिच्याकडे बघा की मॅच.."

"नको.. तो अनय चेन्नईला सपोर्ट करणार. मग मला राग गिळून गप्प बसावं लागणार. त्यापेक्षा तिलाच बोलवायचं ना इथे."

"सांगितलं.. नाही ऐकलं तिने. चिडली आहे. मीच येते मग जाऊन. तुमचा स्वयंपाक करून ठेवते. हाताने घ्या. जमेल ना?"

"न जमायला काय झालं? मी काय कुकुलं बाळ आहे का?" थोडं वैतागूनच शशांक म्हणाला.

"ती बाळं परवडतात.." सुमेधा पुटपुटली. "मग निघू ना मी?"

"हो.. आणि लवकर ये. चहा केला आहे ना माझा?" शशांकने पांघरूणातून डोकं बाहेर काढत विचारले.

"चहा नाश्ता.. सगळं तयार आहे. हाताने घ्या फक्त." सुमेधा तिथून सटकत म्हणाली. जेमतेम तासाभराच्या अंतरावर असलेलं लेकीचं घर.

🎭 Series Post

View all