आई जेवायला येते.. भाग २

आई जेवायला येते

"चहा नाश्ता.. सगळं तयार आहे. हाताने घ्या फक्त." सुमेधा तिथून सटकत म्हणाली. जेमतेम तासाभराच्या अंतरावर असलेलं लेकीचं घर. पण मनात आलं आणि गेलं हे शक्यच नाही. कधी तिच्या सासरची माणसं आली असायची तर कधी ही तिथे जायची. त्यातूनही काही वाटलं तर प्रिशाच इथे यायची. त्यामुळे आवर्जुन तिथे जावं असं कधी घडायचं नाही. पण आज जेव्हा ती परत परत बोलावत होती. तेव्हा मात्र तिने जाऊन यायचेच असं मनाशी ठरवलं होतं. बसमध्ये बसल्या बसल्या तिने हातातल्या बॅगांमधल्या सामानावर नजर फिरवली. जावयाला आवडते म्हणून सुरळीची वडी. लेकीला हवी तशी शेवयांची खीर. थोड्या करंज्या, थोडा चिवडा. कितीतरी दिवसांनी ती विनाकारण घराबाहेर पडली होती. लेकीने काय मेनू ठरवला असेल याची थोडी उत्सुकता होतीच.

तासाभरातच सुमेधा पोहोचली सुद्धा. लेक दरवाजा उघडा ठेवून वाट बघतच होती.

"तुला कसं समजलं मी आलेले?" सुमेधाने आश्चर्याने विचारले.

"मी बाबांना फोन केला होता. कारण तुला मला सरप्राईज द्यायचे असेल.. ते मला माहित होते." नाक उडवत प्रिशा म्हणाली.

"तुझा बाबा पण ना.. इतर वेळेस चुकून फोन उचलणार नाही.. आणि आज बरं सांगितलं?" हातातलं सामान ठेवत सुमेधा म्हणाली.

"ते तुला नाही समजणार.." प्रिशा हसत म्हणाली. "आता बस.. आणि ही घे गरम कॉफी."

"कॉफी? आणि आता?"

"तूच म्हणतेस ना.. साधी कॉफी पण हातात मिळत नाही म्हणून."

"अच्छा.. म्हणून चाललं आहे का हे सगळं?" सुमेधाने हसत विचारले.

"थांब.. कुकरचा गॅस बंद करून आले." प्रिशा आत पळत म्हणाली.

"मी आले गं मदतीला."

"काही गरज नाही. सगळं झालं आहे. मी आलेच पटकन." प्रिशा आतूनच ओरडली.

"आणि अनय? तो कुठे गेला?"

"तो येईलच.. तिथे टेबलवर पुस्तक ठेवलं आहे बघ. तू वाचत बस. मी आलेच." सुमेधाने बाजूचे पुस्तक बघितले. तिच्या आवडत्या लेखिकेचे होते. प्रिशा आत येऊ देणार नाही, हे तिला दिसत होतेच. तिने पुस्तक वाचायला सुरूवात केली. आणि बघता बघता त्यात रंगून गेली. तिची तंद्री मोडली ते बेलच्या आवाजाने. प्रिशा बाहेर येईपर्यंत सुमेधाने दरवाजा उघडला होता. दरवाजातच अनयची आई, अंजली उभी होती.

"अरे, तुम्ही?? सॉरी हं.. मला माहित नव्हतं तुम्ही इथे आहात ते." त्या पटकन म्हणाल्या.

"अहो, तुमचंच घर आहे. मी सहजच आले होते आज. बसा ना. प्रिशा बहुतेक काहीतरी करते आहे." सुमेधा आत बघत म्हणाली. अंजलीचा आवाज ऐकून प्रिशा बाहेर आली.

"अरे आई तुम्ही? बसा ना.."

"अगं सकाळी सांगायचं तरी तुझी आई येणार आहे ते."

"ते.. तिचं नक्की नव्हतं ना.." प्रिशा अपराधीपणे म्हणाली.

"अगं.. तुम्हाला गप्पा मारायला वेळ मिळावा म्हणून म्हटलं मी. मी तुम्हाला आश्चर्याचा धक्का द्यायला आले आणि मलाच सरप्राईज मिळालं बघ."

🎭 Series Post

View all