आई जेवायला येते.. अंतिम भाग

आई जेवायला येते

"असं काही नाही. तुम्ही बसा. मी पाणी देते. अनय आला की बसू जेवायला." प्रिशा म्हणाली.

"काय केलं आहेस जेवायला?"

"ते आपलं..." प्रिशा बोलणार तोच अनय आलासुद्धा.

"आई, तू? मस्तच.."

"अरे बाबा गेले अचानक बाहेर. मग घरी एकटंच राहण्यापेक्षा म्हटलं येऊ इथे."

"बरं झालं. तू बस. मी आलोच हे फ्रीजमध्ये ठेवून."

"तुम्ही पण बसा जेवायला. मी गरम भाकर्‍या करायला घेते." प्रिशा म्हणाली.

"भाकरी? अगं मला कुठे चालते? मला त्रास होतो भाकरीचा. तुम्ही करा सुरूवात. मी भात खाईन फक्त." अंजली म्हणाली.

"नको.. मी पटकन पोळ्या करते. कधीतरी माझ्या हातच्या पोळ्या खाऊन बघा." कोणालाही बोलायची संधी न देता सुमेधा उठली आणि पोळ्या करायला गेली. तोपर्यंत प्रिशाने ताटे करायला घेतली.

"अरे व्वा.. भरली वांगी, मेथीची भाजी.. मिरचीचा ठेचा. छानच मेनू आहे." अंजली म्हणाली.

"बॅगेत सुरळीची वडी आणि खीर पण आहे बघ." पोळ्या करताना सुमेधा म्हणाली. प्रिशाने ताटे वाढली.

"तुम्ही करा सुरुवात. मी गरमागरम देते पोळ्या करून."

"जेवू ना सोबत?" अंजली म्हणाली.

"एक दिवस जेवा गरमागरम. प्रिशा, तू पण बस.."

"मी तुझ्यासोबत बसते ना.."

"मग ना तुला गरम खायला मिळणार ना मला.. बस पटकन." सगळ्यांना पोळ्या खायला घालून सुमेधा जेवायला बसली. जेवण होताच शशांक एकटा असेल म्हणून ती घरी जायला निघाली. लेकीने बाबांसाठी खाणं डब्यात पाठवलं होतं. अर्ध्या रस्त्यात पोहोचताच सुमेधाचा फोन वाजला. प्रिशाचा मेसेज? आश्चर्याने सुमेधाने फोन उघडला.

"आई.. सो सॉरी. दोन दिवसांपूर्वी मी एक सिरियल बघत होते. त्यातली आई सगळ्यांना जेवायला वाढत होती. ते बघताना मला तुझी आठवण आली. तू सुद्धा नेहमीच इतरांना जेवायला वाढून शेवटी जेवायला बसतेस. आज मला तुला गरमागरम जेवायला वाढायचे होते.. पण.. खरंच सॉरी." सुमेधाने मोबाईल बंद केला. मेसेज करताना रडवेली झालेली तिची लेक तिच्या डोळ्यासमोर दिसू लागली. तिने मोबाईल उघडला.

"वेडी गं वेडी. आज पहिल्यांदाच माझ्या लेकीने माझा आवडता स्वयंपाक केला होता. तो ही अगदी छान झाला होता. एवढ्या सगळ्या गोष्टीने माझे पोट भरले असताना हे सॉरीचं तुणतुणं मध्ये कशाला? आणि कोणी सांगितलं की प्रत्येक वेळेस गरम खाल्ल्याने पोट भरतं म्हणून? कधीतरी प्रेमाने सुद्धा पोट भरतं गं.." मेसेज टाईप करताना सुमेधाच्या डोळ्यातून कधी पाणी वाहू लागले.. तिला समजलंच नाही.


आई आणि लेक.. एक जगावेगळं नातं. कधी ती आईच्या भूमिकेत तर कधी लेकीच्या. भूमिकांची ही अदलाबदल सतत सुरूच असते. ती मांडायचा हा प्रयत्न.

या कथेचा व्हिडिओसाठी वापर करण्यास सक्त मनाई आहे. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all