शीर्षक:- आई रिटायर होते...भाग १
विषय:- थोरलेपण
©® सौ.हेमा पाटील.
'हे काय? कुकरच्या शिट्ट्या ऐकू आल्या नाहीत आज. तव्यावर पडलेल्या पोळ्यांचा वासही आला नाही. सासुबाईंचा स्वयंपाक आज फारच लवकर आवरलेला दिसतोय.' मोबाईलवरील गजराने जाग आलेल्या विधीच्या मनात विचार आला.
विधी उठून वाॅशरुमला जाऊन आली. त्यानंतर तिने वाॅर्मअप केले व थोडावेळ व्यायाम केला. आंघोळ करून ती बेडरुममधून बाहेर पडली व किचनमध्ये डोकावली तर तिला धक्काच बसला.
किचनमध्ये आई नव्हत्या. किचनकट्टा रात्री आवरला तसाच होता, चकचकीत. त्यावर काहीच दिसत नव्हते. ती बुचकळ्यात पडली. मुलांना उठवायला त्यांच्या रुमकडे ती निघाली होती, त्याऐवजी ती गडबडीने किचनमध्ये शिरली.
किचनमध्ये ना भाजी बनली होती, ना पोळ्या. ब्रेकफास्टचीही काहीच तयारी दिसत नव्हती. तिच्या लग्नाला सात वर्षे झाली होती. या सात वर्षांत पहिल्यांदाच तिला हा अनुभव आला होता, अपवाद फक्त आई बाहेरगावी गेल्या तरच तिला सकाळी किचनचा ताबा घ्यावा लागत होता.
आता किचनमध्ये काही बनवावे की मुलांना उठवून त्यांना शाळेसाठी तयार करावे या विचारात ती पडली. तिने गडबडीने चहाचे पातेले गॅसवर चढवले व ती मुलांच्या रुममध्ये शिरली.
वनिता ताई प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. कालच शाळेत त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला होता. घरातील सर्वजण त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर सर्वजण हाॅटेलमध्ये जेवायला गेले होते.
आज सकाळी विधी, त्यांची सुनबाई रोजच्या सवयीने उठली; तर आई किचनमध्ये नव्हत्या. सात वर्षांपूर्वी लग्न होऊन सासरी आलेल्या विधीने आजवर रोजच पाहिले होते, सकाळी लवकर उठून वनिताताई सर्वांचे डबे बनवत. सर्वांसाठी नाश्ता बनवत. पूर्वाकडे फक्त डबे भरण्याचे काम असे. तिचे मस्तक भणभणू लागले. इथून पुढे डबे बनवणे शक्यच नव्हते. मुलांचे आटपून तिने त्यांच्या डब्यात आज ब्रेड, जाम दिला. ते पाहून स्मिशा कुरकुरत म्हणाली,
"मम्मा, मॅम रागावतात. डब्यात पोळी भाजी आणायची असे सांगितले आहे त्यांनी."
"आजचा दिवस घेऊन जा बाळा." विधीने तिची समजूत घातली व तिला तयार करून स्कूल बसमध्ये बसवून दिले. संज्योतचे आवरुन झाले तोपर्यंत विकी उठला होता. संज्योतला विकीकडे सोपवून तिने कणीक मळली. कोबी चिरुन भाजी बनवली व गडबडीने दोन पोळ्या बनवून त्याचा टिफीन भरला.
तिने कसातरी कपभर चहा पिला व पटकन स्वतःचे आवरुन ती संज्योतला घेऊन बाहेर पडली. बाहेर पडता पडता तिने विकीला सांगितले,
"आज टिफीन बनवलेला नाही. आज कंपनीच्या कॅन्टीनमध्ये जेव, नाही तर बाहेर खा." संज्योतला डे केअर मध्ये सोडून ती ऑफीसला निघाली.
'आज आईंना काय झाले? त्या कालच्या दगदगीने आजारी पडल्या की काय?' असा विचार तिच्या मनात आला. लोकलमध्ये बसल्यावर तिने मोबाईल हातात घेतला व त्यांना मेसेज करण्यासाठी त्यांच्या वाॅटसअपवर गेली. तिथे टाईप करणार तोच तिचे लक्ष त्यांच्या डिपीकडे गेले. तिथे आज नवीनच फोटो दिसत होता. सुर्योदय आणि प्रसन्न सकाळ फोटोत दिसत होती.
"आई, तब्येत बरी आहे ना? सकाळी उठला नव्हता म्हणून विचारले." तिने मेसेज टाकला. लगेचच रिप्लाय आला,
"हो, छान आहे माझी तब्येत. मी सकाळी लवकर माॅर्निंग वाॅकला गेले होते, तिथूनच योगाच्या क्लासला."
हे उत्तर वाचून विधीच्या मस्तकाची शीर उठली.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होते पुढे? आज डबा का मिळाला नाही याचे उत्तर पुढील भागात वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा