Login

आई रिटायर होते... भाग ३

स्त्रीची कुटुंबात होणारी कुचंबणा

शीर्षक:- आई रिटायर होते... भाग ३

विषय:- थोरलेपण

©® सौ.हेमा पाटील.

वनिता ताई घरातील कामांमधूनही निवृत्ती घेण्याची भाषा करत आहेत. त्यावरुन घरात वादंग सुरू आहे. आता पुढे...

"शरीराची हालचाल होणे आवश्यक असते. एका जागेवर बसून एकेक अवयव निकामी होत जातील, मग समजेल. घरात असे किती काम असते? बघितले तर चार टाळक्यांचा स्वयंपाक करायचा असतो. फरशी आणि भांड्याला तर बाईच येते. उगाचच खूप कामे केली असल्याचा आव आणू नकोस." हे राजेंद्ररावांचे म्हणणे ऐकल्यावर मात्र वनिता ताई चिडल्या.

"हो का? घरात काहीच कामे नसतात? मग का माझ्या मागे लागला आहात? करुदेत की मग सुनबाईला." आता गाडी आपल्याकडे वळली हे पाहून विधीचे धाबे दणाणले.

"आई, तुमच्यासारखा स्वयंपाक करणे मला जमत नाही. माझे लग्न झाल्यापासून तुम्हीच रोज करताय. मी यात फक्त लिंबू टिंबू आहे. किमान मला सवय होईपर्यंत तरी मला मदत करा." विधी म्हणाली.

यावर वनिता ताई काही बोलण्याआधीच राजेंद्रराव म्हणाले,

"घरात थोरली आहेस ना! मान पाहिजे तर मग त्या पदावर शोभेसे वागायला नको?"

"तीच चूक सुधारतेय मी आता. विधीवर लग्नानंतर मी थोडीफार जबाबदारी सोपवायला हवी होती. माझ्या सासुबाईंनी तर घरकामाची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती, पण बाकी घराच्या चाव्या मात्र मरेपर्यंत स्वतःच्या ताब्यात ठेवल्या होत्या.

काळजी करू नकोस विधी. सवयीने सगळे जमते. मला तरी लग्न झाले तेव्हा कुठे जमत होते, शिकलेच ना! माझे लग्न झाले तेव्हा घरात खाणारी सहा तोंडे होती. सासुबाई अजिबात कशालाच हात लावत नसत. त्यातच नणंदेचे लग्न, दीराचे लग्न केवळ माझ्या जीवावर पार पाडले, पण चुकूनही कधीच कुणाच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द ऐकायला मिळाला नाही. चुका मात्र सगळ्यांसमोर वारंवार उगाळल्या गेल्या.

उतारवयात यांना तरी माझी दया येईल असे वाटले होते, पण निवृत्तीनंतर यांना स्वतःच्या मित्रमंडळीत वेळ घालवणे महत्वाचे वाटले. माझी चाललेली कसरत यांना कधीच दिसली नाही. तूही वेगळे काय केलेस? करतेय सासू तर करु देत असे म्हणत तूही निवांत होतीस.

आज मीही नोकरीतून निवृत्त झालेय, तर मला मात्र अजूनही गृहीत धरले जातेय. माझ्या सासूबाई माझ्याशी जश्या वागल्या, तसे आपण आपल्या सुनेशी वागायचे नाही असे मी मनाशी ठरवले होते, पण हे गृहीत धरणे नकोसे झालेय आता मला.

मी आता मनाशी निश्चय केला आहे की, मी आता स्वतःसाठी वेळ काढणार. आता मला कुणीही गृहीत धरायचे नाही." एवढे बोलल्यावर त्या जरा शांत बसल्या. त्यांचे बोलणे ऐकून राजेंद्रराव चिडले होते, पण त्या जे काही बोलल्या त्यातील अवाक्षरही चुकीचे नव्हते. शेवटी त्यांनी शेवटचे अस्त्र उगारले.

"अगं, तू या घरातली ज्येष्ठ कर्ती स्त्री आहेस. थोरलेपणाने तुला या सगळ्यात लक्ष घालायला नको?" आपण इतके सांगूनही आपल्या नवऱ्याने स्वतःचा ठेका अजूनही सोडला नाही हे पाहून वनिता ताई म्हणाल्या,

"घराच्या चाव्या मी आजपासून सुनबाईच्या ताब्यात देत आहे. घरासाठी जे काही योग्य निर्णय असतील ते तिने घ्यावेत. आजपासून घरातील कर्ती स्त्री ती असेल. मी आयुष्यभर कामं करत आले, सासुबाई होत्या तेव्हा, अगर नंतरही...थोरलेपणाचा नुसता मुखवटा धारण करण्याचा कंटाळा आला आहे मला. आता मला मुक्तपणे जगायचेय."

हे ऐकल्यावर विधी म्हणाली,

"आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आजपासून घराची सगळी जबाबदारी मी घेत आहे. मला कल्पना आहे, तुमच्यासारखे कष्ट मला जमणार नाहीत. मी बाईची मदत घेईन, पण तुम्हाला आता परत यात अडकू देणार नाही. तुमच्या मनाप्रमाणे तुमचे उरलेले आयुष्य तुम्ही मनमुरादपणे जगा. आमची पिढी खूप प्रॅक्टीकल आहे, त्यामुळे मी स्वतःवरही असा अन्याय होऊ देणार नाही."

"आज स्वतःवर वेळ आली तेव्हा तुला समजले ना? नाही तर आजपर्यंत तूही मला गृहीत धरत होतीस. मी घरात काही कामे करणारच नाही असे नाही, पण आजपर्यंत सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून सगळे निर्धास्त होते तसे आता चालणार नाही. आता मी या घरात लिंबू टिंबू असेन." वनिता ताई म्हणाल्या.

"ओके बाॅस. चालेल." विधी म्हणाली, आणि घरातील तणावपूर्ण वातावरण निवळले. विकी जाऊन फ्रिजमध्ये असलेले आईस्क्रीम घेऊन आला. सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले.

बेडरूममध्ये गेल्यावर राजेंद्रराव म्हणाले,

"खरंच माझे चुकले. मी तुला कायमच गृहीत धरले. तुझा कधीच विचार केला नाही."

"आता करा. आता आपण जोडीने वर्षातून दोन ट्रीप तरी करायच्या. पूर्ण भारत फिरायचे माझे स्वप्न होते. ते आता तरी पूर्ण करुयात." वनिता ताई म्हणाल्या.

"ओके बाॅस." असे राजेंद्र राव म्हणताच वनिताताई खुदकन हसल्या.
समाप्त ©® सौ.हेमा पाटील.

कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा ही वाचकांना विनंती.


0

🎭 Series Post

View all