आई तू हवी होती ग..(भाग १)

कथामालिका
आई तू हवी होतीस ग...

"शिल्पा काय झाल? आजच्या एवढ्या आनंदाच्या क्षणी तुझे डोळे पाणावले ! "

"नाही काही नाही ताई."

"विश्वास तू तरी शांत हो."

"ताई, बघ ना. आज आई असायला हवी होती ग."

"विश्वास, शिल्पा काय चालवलं दोघांनी. शांत व्हा बर. बाहेर सगळे पाहुणे बसले आहेत. "

"पण त्यात माझी आई नाही ना ग ताई. बाबा देखील काही तरी हरवल्यासारखे बघत आहे. सगळ्यांमध्ये ते बसलेले असूनही त्यांना किती एकटं वाटतय."

"विश्वास मला कळतय सगळ. पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना रे. "

"अग आईच स्वप्न अपूर्ण राहिले ग."

"विश्वास परत तेच."

"कुमूद मावशी चहा दे‌ ना सगळ्यांना."

ताईने विषय बदलला.

विश्वास आणि विशाखा म्हणजेच ताई दोघेच बहीण भाऊ. रत्नमाला आणि वसंतरावांचे मुले. आज रत्नमालाताईंना जाऊन एक वर्ष होऊन गेले.
रत्नमालाताईंनी वसंतरावांच्या संसाराची गाडी इथपर्यंत ओढली होती. परिस्थिती अगदीच साधारण. सासू सासरे , चुलत सासरे, दोन सख्खे आणि चुलत दीर, दोन नणंदबाई असा दहा पंधरा जणांचा परिवार. रत्नमालाताई या सगळ्यांमध्ये दबकून राहात असायच्या. दिवसभर त्या सतत कामात असायच्या. रात्रीच्या वेळी जरा पाठ टेकली तेवढीच उसंत मिळायची. जवळपास पन्नास वर्षांचा कालावधी कसा निघून गेला कळलेच नाही. हळुहळु नणंदाचे लग्न, दीरांचे लग्न सासु सासरे अचानक जाणे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनात घडत गेल्या. काही वर्षांपूर्वी एकत्र असणार कुटुंब हळूहळू विखुरले गेले.

"अग विशाखा माझ्या आर्वीचा जन्म झाला आणि वर्षाच्या आतच आई गेली."

"हो रे विश्वास."

"आपल्या आई बाबांना सगळ्यांनी किती त्रास दिला ना."

वसंतरावाचा स्वभाव खूप भोळसर होता. शिक्षण कमी. शिवाय घरच्या शेतीतच पूर्णवेळ देत होते. मोठ्या भावावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवत होते. आज्ञाधारक स्वभाव. इतका की दादा आणि वहिनी सांगतील ती पुर्व दिशा.

"आपल्या आईला या गोष्टी दिसत होत्या. पण बाबांना मात्र आई चुकीची आहे असे वाटायचे. तिच्या वर कधीच विश्वास ठेवला नाही. की कधी सल्ला विचारला नाही. बायकांच्या भानगडीत तर बाबांनी कधीच नाक खुपसले नाही. आपली बायको जेवली का? तिचे काही दुखते का ? तिची काही गरज आहे का? प्रेम, विश्वास या गोष्टी तर दूरच साधे तिला प्रेमाने जवळ सुध्दा घेत नव्हते. "

"विश्वास नको ना जुन्या आठवणी."

"विशाखा आज बोलू दे मला. जे लहानपणापासून बघीतले ना. त्यामुळे माझ मन आज खूपच विचलित झाले आहे. खरच आज आई हवी होती ग."

क्रमशः
©® अश्विनी मिश्रीकोटकर




🎭 Series Post

View all