Login

आई तुझं लेकरू येडं गं कोकरू : भाग २

Its A Story Of Mother And Son

आई तुझं लेकरू येडं गं कोकरू

भाग : २

राहुलची दहावीची परीक्षा संपली आणि त्याने गावात पहिला क्रमांक मिळवला. त्याची आई खूप खुश होती, पण तिला माहित होतं की पुढील शिक्षणासाठी त्याला मोठ्या शहरात जावं लागेल. त्याच्या १२वीच्या महागड्या क्लासेससाठी पैसे जमवणं तिच्यासाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे शोभाने शिवणकाम वाढवलं आणि त्याचबरोबर घरगुती डब्बे बनवून राहुलच्या मित्रांना पुरवू लागली.

राहुलाच्या अभ्यासामुळे आणि आईच्या कष्टांमुळे तो १२वी मध्येही गावात पहिला आला. आता पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणं आवश्यक होतं. पुण्यात राहण्याची व्यवस्था झाली, पण दोघांचं मन कसं लागणार? त्यांना एकमेकांशिवाय करमणं कठीण जाणार होतं.

राहुलच्या पुण्याला जायच्या आदल्या दिवशी, शोभा त्याला मिठीत घेऊन म्हणाली, "बाळा, तू खूप मोठा होणार आहेस.IAS नक्की होणार तू.. पण लक्षात ठेव, मोठी होतात मुलं पण आई मोठी होत नाही ,कुशीत नसतं पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई . तुझं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, पण तुझ्या आईला विसरू नकोस."

राहुल हसत म्हणाला, " आई, मी तुला कधीच विसरणार नाही. तुझं स्वप्न ते माझं स्वप्नं आहे. आणि आपण रोज बोलणार, हे पक्कं आहे. कारण आपल्या शेजारी राहणाऱ्या अजयने नवीन फोन घेतलाय मी रोज रात्री त्यावरून तूला फोन करत राहील"

पुण्यात पोहोचल्यावर राहुलला सुरुवातीला खूप एकटं वाटलं. त्याचा अभ्यास जोरात चालू होता, पण मनात सतत आईची आठवण येत होती. त्याच्या रूममधील मित्राचा फोन वापरून त्याने दररोज आईशी बोलणं सुरू केलं, तेव्हा तो हळूहळू स्थिर झाला. आईशी बोलल्यावर त्याच्या मनातली भीती कमी होत गेली, आणि आता पुण्यात राहणं त्याला सोपं वाटायला लागलं.

राहूलचा मित्र अजय राहुलच्या आईला रोज फोनमधील नवनवीन गोष्टी शिकवायचा त्यामुळे काहीवेळा राहुल सोबत त्याची आई व्हिडिओ कॉल देखील करायची . आईला पाहून राहुल समाधानी असायचा.


एकदा अजयने राहुलच्या आईला AI तंत्रज्ञानाबद्दल सांगितलं. तो सांगत होता, "आता अशा तंत्रज्ञानामुळे आपण आपला चेहरा, आवाज, आणि देह वापरून विविध गोष्टी घडवू शकतो. तुझा चेहरा आणि आवाज वापरून एक आभासी प्रतिमा तयार करता येईल, जी तुझ्या मुलाशी कधीही संवाद साधू शकेल."

शोभाला हे ऐकून थोडी उत्सुकता वाटली. ती विचारात पडली की हे तंत्रज्ञान तिच्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने किती उपयोगी ठरू शकेल. काही दिवसांनी तिने विचार पक्का केला, "राहुलसाठी हे तंत्रज्ञान कदाचित उपयुक्त ठरेल," असं मनाशी ठरवत ती AI तंत्रज्ञान शिकण्यासाठी अजय सोबत यु ट्यूब वर प्रशिक्षण घेऊ लागली . तिने अजयला सांगितलं की राहुलला सांगू नकोस याबद्दल कारण तिला राहुलला सरप्राईज देयचं होतं.

पण नियतीचे चक्र फिरले, जिथं प्रेम ओसंडून वाहत असतं तिथेच नेहमी नियती घात करते , आईला मुलापासून वेगळं करण्यासाठी नियतीने आता आईची परीक्षा घेयचं ठरवलं होतं जणू.

काही दिवसांनी राहुलच्या आईला रक्ताच्या उलट्या झाल्या. अजयने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा कळलं की,त्याच्या आईला ब्लड कॅन्सर झालाय ,आता ती काहीच महिने जगू शकणार. अजय राहुलच्या कानावर ही गोष्ट घालणारच तोच शोभाने अजयला शपथ घातली ,तिचं म्हणणं होतं की, " माझ्या मुलाला जर माझ्या आजाराबद्दल कळलं तर तो सगळं सोडून इकडे निघून येईल आणि तो पुन्हा आयुष्यात कधीच उभा राहू शकणार नाही "

अजयने मनावर दगड ठेवून शोभाच म्हणणं ऐकलं, त्याने राहुलला आईला बरं नाही इतकंच सांगितलं त्यानिमित्ताने राहुल घरी आला ,आईसोबत काही दिवस राहिला.. त्या काही दिवसांत त्याची आई राहुलला मनभरून पाहत होती ,राहुलच्या आवडीचे सगळे पदार्थ तिने त्याला बनवून खाऊ घातले ...राहुल पुन्हा पुण्याला जाताना यावेळी तिला खूपच गहिवरून आलं ,त्याला मिठीत घेऊन खूप रडली बिचारी.

स्वतःचा आजार बरा व्हावा म्हणून राहुलची आई सगळ्या देवांना रोज साकडं घालायची कारण तिला भीती वाटत होती की, तिच्याशिवाय तिच्या मुलाचं कसं होणार ?

अजयने काही पैसे जमवले परंतु त्या पैशातून फक्त औषधे विकत घेता आली पण शस्त्रक्रिया करण्यासाठी बक्कळ रक्कम लागणार होती ती मात्र अजयला कमावणे अवघड होतं, शोभा जितकं कमवायची त्यातला काही पैसा तर राहुलच्या खर्चासाठी जायचा... येणारा प्रत्येक दिवस शोभा कसातरी पुढे ढकलत होती.

शेवटचे काहीच दिवस उरले होते शोभाच्या आयुष्यातील , ती खूप थकून गेली होती ,पण तरीही अशाही परिस्थितीत ती राहुल सोबत फोनवर बोलताना ती अजिबात त्याला तिच्या आजाराबद्दल कळू देत नव्हती.
क्रमशः


0

🎭 Series Post

View all