Login

आई... भाग - २

आईच्या त्यागातून स्नेहाची उंच भरारी घडते. मुळं घट्ट असली, तर आकाश जवळ येतं.
आई... भाग - २


माधुरी आजारी पडल्यानंतर घरातलं सगळं वातावरण बदललं होतं. घर तसंच होतं, भिंती तशाच, पण स्नेहाला ते घर अचानक मोठं आणि एकटं वाटू लागलं.

आई झोपलेली असताना स्नेहा तिच्या शेजारी बसून पुस्तक उघडायची, पण अक्षरं डोळ्यांसमोरून निसटून जायची. मनात एकच विचार घोळायचा, जर आईला काही झालं तर?

माधुरीचं आजारपण फार मोठं नव्हतं, पण तिची कमजोरी स्नेहासाठी नवीन होती. आजपर्यंत जी आई सगळं सांभाळायची, ती आता स्नेहावर विसंबून होती.

त्या दिवशी शाळेत स्नेहा उशिरा पोहोचली. “आज काय झालं?” शिक्षिकेने विचारलं. स्नेहाने काही न सांगता मान खाली घातली. तिच्या मैत्रिणी सीमा आणि पूजा तिच्याजवळ आल्या. “आई आजारी आहे का?” सीमाने हळूच विचारलं. स्नेहाने फक्त मान हलवली.

त्या दिवसापासून स्नेहाचं आयुष्य दोन भागांत विभागलं गेलं, एक शाळेत अभ्यास करणारी स्नेहा आणि दुसरी घरी आईची काळजी घेणारी स्नेहा.

माधुरीला बरे वाटावं म्हणून स्नेहा घरकाम, औषधं, स्वयंपाक सगळं करू लागली. तिच्या हाताने चूक होत होती, पण मनात प्रामाणिक प्रयत्न होते.

एक दिवस माधुरी म्हणाली, “स्नेहा, मला तुझी काळजी वाटते. अभ्यास राहतोय तुझा.” स्नेहाने पटकन उत्तर दिलं,
“आई, मी जमवतेय सगळं.”‌ पण खरं सांगायचं तर तिला जमवणं कठीण होतं.

त्या काळात शाळेत एक घोषणा झाली, राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा. शिक्षिकेने सांगितलं, “ही परीक्षा पास केली तर पुढच्या शिक्षणासाठी मोठी मदत मिळेल.”
स्नेहाचं मन तिथेच अडकलं. हीच संधी आहे, ती स्वतःशीच म्हणाली. आईसाठी… आपल्या दोघांसाठी.
पण त्यासाठी अभ्यास हवा होता, भरपूर.

त्या रात्री स्नेहा उशिरापर्यंत जागी होती. एकीकडे आई झोपलेली, दुसरीकडे पुस्तकं. डोळे थकत होते, पण मन थांबत नव्हतं. आई झोपेत पुटपुटली, “स्नेहा…” स्नेहा पटकन उठली. “काय आई?” माधुरी हळूच म्हणाली,
“माझ्यामुळे तुझं आयुष्य थांबू नकोस.” त्या वाक्याने स्नेहाचं मन हादरलं. “आई, तू माझं आयुष्य आहेस,” ती म्हणाली.

त्या दिवसापासून स्नेहाने स्वतःसाठी एक शिस्त तयार केली. सकाळी लवकर उठणं, घरकाम, शाळा, संध्याकाळी अभ्यास आणि रात्री आईजवळ बसणं.
शेजारच्या काकूंनी कधी कधी मदत केली. शिक्षकांनी स्नेहाच्या परिस्थितीची दखल घेतली.

पण सगळ्यात मोठी लढाई होती, स्वतःशी. कधी कधी स्नेहा थकून जायची. एका संध्याकाळी अभ्यास करताना तिने वही बंद केली आणि रडायला लागली. “मला नाही जमणार…” ती पुटपुटली.

तेवढ्यात माधुरी हळूच उठून तिच्याजवळ आली.
“रड,” माधुरी म्हणाली, “पण हार मानू नकोस.” तिने स्नेहाचा हात धरला. “तू माझी मुलगी आहेस… आणि मी हार मानलेली नाही.” त्या शब्दांनी स्नेहाच्या मनात पुन्हा ताकद आली.

परीक्षेच्या दिवसापर्यंत स्नेहा अक्षरशः झटली. कधी झोप कमी, कधी जेवण विसरलेलं. परीक्षेचा दिवस उजाडला.
स्नेहा परीक्षाकेंद्रात बसली होती. हात थरथरत होते.
डोळे बंद करून तिने आईचा चेहरा आठवला, थकलेला, पण हसरा. “आईसाठी,” ती स्वतःशी म्हणाली.

प्रश्नपत्रिका उघडली. वेळ संपेपर्यंत तिने पूर्ण ताकद लावली. परीक्षा संपल्यावर ती बाहेर आली तेव्हा माधुरी दारात उभी होती.‌“कसा गेला पेपर ?” माधुरीने विचारलं.
स्नेहा हसली, “मी प्रयत्न केला.” माधुरीने तिला मिठीत घेतलं. त्या मिठीत शब्द नव्हते, पण आशा होती.

पण आयुष्य इतकं सोपं नसतं. काही दिवसांनी माधुरीला पुन्हा त्रास सुरू झाला. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, “तिला पूर्ण विश्रांती हवी. काम बंद करा.” माधुरी शांत झाली. काम बंद म्हणजे पगार बंद.
घरात आर्थिक ताण वाढला.

त्या रात्री स्नेहाने आईला पहिल्यांदाच घाबरलेलं पाहिलं.
“आपण कसं करू?” माधुरी हळूच म्हणाली. स्नेहाने आईचा हात धरला. “आता माझी पाळी आहे,” ती ठामपणे म्हणाली. त्या क्षणी माधुरीला जाणवलं,
तिची सावली आता हळूहळू मागे सरकत होती आणि स्नेहाचं आकाश पुढे येत होतं.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all