Login

आई... भाग - ३

आईच्या त्यागातून स्नेहाची उंच भरारी घडते. मुळं घट्ट असली, तर आकाश जवळ येतं.
आई... भाग - ३


डॉक्टरांनी “काम बंद” असं स्पष्ट सांगितल्यानंतर माधुरीचं आयुष्य जणू थांबलं होतं. सकाळी उठून तयार होणं, शाळेकडे जाणं, मुलांचा गोंधळ, हे सगळं अचानक संपलं. घरात शांतता वाढली आणि त्या शांततेत चिंता अधिक मोठी होत गेली.

स्नेहा मात्र शांत बसली नव्हती. ती रोज वहीत काहीतरी लिहीत होती, खर्च, औषधं, शाळेची फी, किराणा. आकड्यांकडे पाहताना तिला पहिल्यांदाच आयुष्याचं गणित कळायला लागलं.

एक संध्याकाळी माधुरी म्हणाली, “स्नेहा, कदाचित तुला काही दिवस शाळा सोडावी लागेल.”‌ त्या वाक्याने स्नेहाच्या छातीत धस्स झालं. “नाही आई,” ती पटकन म्हणाली,‌ “मी शाळा सोडणार नाही.” “पण परिस्थिती...." माधुरी बोलत होती. “परिस्थिती बदलायची असते,” स्नेहाने ठाम उत्तर दिलं.

त्या रात्री स्नेहाला झोप आली नाही. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश काळं होतं, पण ताऱ्यांची हलकी चमक होती. मी काहीतरी करणार, तिने स्वतःशी ठरवलं.

दुसऱ्या दिवशी शाळेतून परतताना स्नेहा थेट ग्रंथालयात गेली. तिथे नोटीस बोर्डावर एक कागद चिकटलेला होता,
“दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी शिकवणी हवी आहे.”

ती थांबली. मी शिकवू शकते का? तिला स्वतःवरच प्रश्न पडला. घरी येऊन तिने आईला विचारलं. “आई, मी लहान मुलांना शिकवू का?” माधुरी आश्चर्याने पाहत राहिली.
“तुला वेळ कसा मिळेल?” “मी जमवेन,” स्नेहाने उत्तर दिलं.

थोड्या दिवसांत स्नेहा शेजारच्या दोन मुलांना शिकवू लागली. पैसे फारसे नव्हते, पण आत्मविश्वास मोठा होता.
पहिल्यांदाच तिने स्वतःच्या हाताने कमावलेले पैसे आईच्या हातात ठेवले.‌ माधुरीचे डोळे पाणावले. “हे पैसे नाहीत,” ती म्हणाली, “ही तुझी जबाबदारी आहे.”

त्या दिवसापासून स्नेहाचं आयुष्य आणखी व्यस्त झालं. शाळा, शिकवणी, घरकाम, आईची काळजी, सगळं एकत्र. कधी कधी ती थकायची.

एक दिवस शाळेत निकाल लागला. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल. स्नेहाचं नाव यादीत होतं. ती धावत घरी आली.
“आई! माझा नंबर लागला!” माधुरीने तिला मिठीत घेतलं. त्या मिठीत अभिमान होता, पण भीतीही होती.
“पुढे शिकायला बाहेर जावं लागेल,” माधुरी हळूच म्हणाली. तो विषय दोघींनी टाळला.

पण आयुष्य टाळायला देत नाही. काही आठवड्यांनी पत्र आलं, शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश.‌ वसतिगृहाची सोय. स्नेहा आनंदात होती, पण आईचा चेहरा पाहून ती थांबली.‌ “मी गेल्यावर तू?” स्नेहाने विचारलं.‌

माधुरी शांत होती. “माझ्यासाठी तू तुझं आयुष्य थांबवू नकोस,” ती म्हणाली. त्या रात्री दोघींनी एकत्र जेवण केलं, पण शब्द कमी होते. स्नेहाच्या मनात वादळ होतं. आईला एकटी सोडून कसं जाऊ? पण न गेलो तर हे सगळं कशासाठी?

ती झोपायला गेली, पण डोळ्यांत झोप नव्हती. सकाळी उठून तिने निर्णय घेतला. ती आईजवळ बसली. “आई, मी जाईन,” ती म्हणाली, “पण मी पळून जाणार नाही. मी परत येईन, तुझ्यासाठी अधिक मजबूत होऊन.” माधुरीच्या डोळ्यांत पाणी आलं.‌“आज तू मला आई वाटतेस,” ती हसत म्हणाली.

निघायचा दिवस आला. छोटं दप्तर, काही कपडे, पुस्तकं आणि आईचा आशीर्वाद. बस निघताना स्नेहाने मागे वळून पाहिलं. माधुरी हात हलवत उभी होती. चेहऱ्यावर हसू, डोळ्यांत पाणी.

बस पुढे सरकली. त्या क्षणी स्नेहाला कळलं, निर्णय घेताना वेदना होतात, पण त्या वेदनाच पुढचं आयुष्य घडवतात. शहरातलं आयुष्य कठीण होतं. वसतिगृह, नवीन माणसं, अभ्यासाचा ताण. कधी कधी स्नेहा एकटी पडायची.

फोनवर आईचा आवाज ऐकला की तिला बळ मिळायचं.
“मी ठीक आहे,” माधुरी नेहमी म्हणायची. स्नेहा अभ्यासात झोकून दिली. तिने स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं होतं, आईसाठी आणि स्वतःसाठी.

एक दिवस तिला कॉलेजमध्ये भाषण द्यायला सांगितलं गेलं.‌ विषय होता, “माझी प्रेरणा.” स्टेजवर उभी राहून तिने फक्त एक वाक्य म्हटलं, “माझी आई.” पूर्ण सभागृह शांत झालं. त्या क्षणी स्नेहाला जाणवलं, तिचं आकाश आता खरंच विस्तारत होतं.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all