Login

आई..

ती होती म्हणोनी
#शब्दस्पर्श_ब्लॉग्स
#होती_ती_म्हणोनी

काळ्याकुट्ट गर्भराती ओळखीचा श्वास होता
पोटी तिच्या रुजताना गोड स्पर्शभास होता
आईच्याच कुशीत गं अंगाईला अर्थ होता
तिच्या मिठीपुढे स्वर्ग फिका होता व्यर्थ होता

काळ बालपणीचा तो किती सुखाचा गं होता
तिच्या अबोल्यामध्येही राग फुकाचा गं होता
देव्हाऱ्यात तो अखंड होता तेवणारा दीप
गर्द सावलीत तिच्या देव वाटला समीप

माया तिच्यापोटी आणि मनी सागर प्रेमाचा
होती ती म्हणोनी देवा होता जागर नात्यांचा
होती आईमुळे सारी घर जपणारी नाती
प्राण सांडुनी आपुला तिने लिंपल्या गं भिंती

तिने वेचल्या कष्टांची किती गाऊ गं महती
तिच्या चरणी पंढरी आई वात्सल्याची मूर्ती
भाग्य माझे थोर आणि कैक जन्माची पुण्याई
सारे तुला देते देवा मला द्यावी तीच आई..!