आई, बायको, बहिण हवी... मग मुलगी का नको?

सकाळीच मी वर्तमानपत्र वाचत बसले होते...
(आई, बायको, बहिण हवी..मग मुलगी का नको?..
इयत्ता दहावीत असताना एका वक्तृत्व स्पर्धेसाठी मला मिळालेला हा विषय... इथ मला आवर्जून माझे विचार, हा विषय मांडावासा वाटतोय..)


             सकाळीच मी वर्तमानपत्र वाचत बसले होते. वर्तमानपत्र वाचता वाचता माझी नजर त्यातील एका कवितेकडे गेली. आईच्या गर्भात वाढणार्‍या चिमुकलीला जेव्हा हे कळत की आपली आई आपल्याला गर्भातच मारणार आहे तेव्हा ती आपल्या आईला म्हणते...
         'खुडू नको ग कळी...आई फुलू दे ग मला..
          दिवा हवा वंशाचा...पणती नको का ग तुला...'
या चिमुकलीची विनवणी ऐकून माझे हृदय पूर्णपणे हेलावून गेले. आज कोणतेही वर्तमानपत्र हातात घ्या, त्यातले मथळे वाचले की अंगावर शहारे उमटतात. कचरा कुंडीत सापडला स्त्री-गर्भ..., दोन-तीन दिवसाच्या स्त्री अर्भकाला रस्त्यावर सोडून आई-वडील बेपत्ता..., बेकायदेशीर गर्भपात करताना डॉक्टरांना अटक...अश्या एक ना अनेक घटना मन सुन्न करुन सोडतात. मुलगीच नको ही भावना आपल्या किंबहुना समाजाच्या मनात निर्माण झाली आहे. काहीतरी करण्यासाठी, काहीतरी मिळविण्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच केला पण आपण या समाजाला बदलू शकलो नाही. सूर्य, चंद्र, तारे यांना गवसणी घालण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला परंतु आपण या समाजातील माणसांची मने मात्र बदलू शकलो नाही. स्त्री भ्रूणहत्या, त्याचे परिणाम, समस्या काय आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर प्रथम समाजातील स्त्रीचे स्थान लक्षात घेतले पाहिजे.
               'स्त्रीच जगण म्हणजे मर्यादेच्या चौकटीतील असह्य होऊन घुटमळन...डबडबलेल्या डोळ्यात उद्याचा प्रकाश पाहण...' हे स्त्री जीवनावरच चित्रण कवी 'प्रदीप' यांनी आपल्या शब्दात रेखाटले आहे. पद, प्रतिष्ठा, अधिकार स्वताच्या मुठीत ठेवणार्‍या पुरुष प्रधान संस्कृतीने आपण माणूस आहोत, आपल्याला स्वातंत्र्य आहे, हक्क आहेत याची जाणीव स्त्रीला कधी होऊच दिली नाही. तिच्या संघर्षालाच तिचे जीवन मानले. परंतु तिचा संघर्ष आज जन्मापासूनच सुरू होत आहे, स्त्रीला गर्भातच मारल जात आहे. अश्या या पाषाणहृदयी माणसांना मला विचारावस वाटत...कळी खुलण्याआधीच आपण तिला खुडतो का?.... मुलगा वंशाचा दिवा असू शकतो मग मुलगी वंशाची पणती असू शकत नाही का?...आपल्या आधारच केवळ एक बोट तिला न देण्याइतपत आपण निष्ठुर झालो आहोत का?...
             जन्म देऊन विश्व दाखवणारी...बोटाला धरून चालायला शिकवणारी...बायकोच्या हट्टासाठी आईच काळीज घेऊन जाताना ठेच लागून पडलेल्या बाळाला, 'बाळ लागल नाही ना रे...' अस विचारणारी आई तुम्हाला हवी... रक्षाबंधनाच्या सणाला राखी बांधुन देवाकडे शंभर वर्षे आयुष्य मागणारी बहीण तुम्हाला हवी.... लग्नामध्ये तुमच्याबरोबर सप्तपदी करून अग्नीदेवता आणि ब्राह्मणाच्या साक्षीने तुम्हाला पती मानणारी.... जन्मोजन्मी हाच पती मिळवा म्हणून वडाच्या झाडाला फेर्‍या मारणारी....कामावरून घरी यायला उशीर झाला म्हणून चातक पक्षासारखी डोळे लावून वाट पाहणारी बायको तुम्हाला हवी.... फोनवरून गुलूगुलू बोलायला... हॅलो हाय करायला...हातात गुलाबाचं फुल घेऊन वाट पाहणारी प्रेयसी तुम्हाला हवी...मग तुमच्याच पोटी जन्माला येणारी मुलगी का नको?? इथंच खेदाने म्हणाव वाटत... 'आई, बायको, बहिण हवी तर मुलगी का नको?'
             जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले असते का? यशोदा नसत्या तर साने गुरुजी घडले असते का? भीमाई नसत्या तर आंबेडकर घडले असते का? पुतळाबेन नसत्या तर महात्मा गांधी घडले असते का? आज कित्येक युगपुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात होता हे विसरतोय का समाज.. राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, कल्पना चावला, किरण बेदी, सुनीता विल्यम्स अहो एक ना लाखो उदाहरणे देता येतील की स्त्री आज कोणत्याच क्षेत्रात पाठीमागे नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात वावरतेय.
            वाचकहो...मला तुम्हाला इथं एक उदाहरण द्यावस वाटत. एका विमानाचा आकाशात प्रवास चालू होता. सर्व लहान, थोर, वृद्ध, वयस्कर मंडळी त्या विमानाने प्रवास करत होती. अचानक विमानामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि विमान भरकटू लागत. सर्व लोक घाबरू लागतात, ओरडू लागतात. पण एक चिमुकली मात्र शांतपणे आपल्या खेळण्याशी खेळत बसली होती. थोड्यावेळाने विमान पुन्हा व्यवस्थित चालू लागत. तेव्हा एक व्यक्ती त्या मुली जवळ येते आणि विचारते. बाळ विमान भरकटत होत सर्व लोक घाबरत होते तरीही तू शांत कशी काय होतीस. तेव्हा त्या चिमुकलीने दिलेलं उत्तर मोठ मार्मिक होत. ती मुलगी म्हणाली "मला माहीत आहे हे सर्व...आणि मला हेही माहीत आहे की, या विमानाची पायलट माझी आई आहे आणि जिथ माझी आई आहे तिथ माझ्याच काय, कोणत्याच व्यक्तीच्या जिवाला धोका पोहोचू शकणार नाही याची मला खात्री आहे." बघा तर ही चिमुकली एवढ्या खात्रीशीरपणे सांगू शकते. तर इथच लक्षात येत ते एका स्त्रीच नेतृत्व-मातृत्व-कर्तुत्व....
            कंठ दाटून येतो माझा,
          आई हा शब्द उच्चारताना...
          कारण आईलाच पाहतेय मी,
         ताईची हत्या गर्भात करताना...
         छोटासा अंकुर म्हणतो आईला,
          दे मला जिवनदानाची भिक्षा...
       लहानग्या जिवाची एकच आकांक्षा,
        देवू नकोस एवढी मोठी शिक्षा...
        देवू नकोस एवढी मोठी शिक्षा...


.....धन्यवाद!....
         
               (Speech by ~Pranali Gaikwad.)


🎭 Series Post

View all