Login

आईची समजूत घालतांना भाग 2

AAichi Smjut
आईची समजूत घालतांना भाग 2


बरं बोला माँ साहेब तुम्हीच बोला, मनात काय आहे ते सांगून टाक तिला कळू दे तिला ही सासूचा धाक...रवी


धाक कसला, काही गोष्टी धाक देऊन नाही जमत बाबा आता, कोणी कोणाच्या धाकात राहिले का, तुझे बाबा आहेत का धाकात...गेलेत सकाळी सकाळी शेजारच्या नातवांकडे खेळायला, फक्त चहा घेतला आणि गेले तिकडे...काय म्हणतील लोक ,शेजार पाजार, आला हा म्हतारा आमच्या घरी सकाळी सकाळी खेळायला आमच्या नातवासोबत...मग ते गेले की शेजारी चहा करून देतात आणि मस्त गप्पा झाल्या ,नातवासोबत खेळून झाले की घरी येतात, मग पुन्हा तिसरा चहा होतो...मग नाशता... मग पुन्हा वरच्या काकांकडे गप्पा, मग दुपारी आल्यावर tv आणि आराम...मग संध्याकाळी पुस्तक घेऊन बसतात...कधी कधी तुझ्या मुलाचे फोटो घेऊन बसतात, तो अलबम सोडत नाहीत...

त्याला आईची ही तक्रार कश्यासाठी आहे हे मूळ कळत नव्हते, आईला एकटे वाटत होते,आणि बाबा ही तिला वेळ देत नव्हते, बोलायला माणूस नव्हते, मन मोकळे करण्याची जागा नव्हती..

इकडे सुधा त्यांचे बोलणे ऐकत होती, आईला काय बोलायचे असेल, काही चुकले असेल का ,की दुसरे काही असेल..तिने ही जास्त लक्ष दिले नाही..


अग मग छान रुटीन झाले की बाबांचे ,तुला काय अडचण आहे त्यात, त्यांनी जायचे नाही का कुठे, घर सोडायचे नाही का बोलायचे नाही का कोणाशी, की पुस्तक वाचायचे नाही...चहा म्हणत असशील तर ती सवय आहे त्यांची ,आणि लहान मुलं तर त्यांना आवडतात...त्यांचे मन रमते.. दिवस कसा सत्कारणी लावतात ग बाबा आणि तू आपली सतत त्यांना धाकात ठेवतेस असं वाटतंय मला, तू ही जात जा ,थोडी फ्रेश होत जा तू ही..जा कोणते मंदिर असेल तिथे, भजन ऐक, तिथे येणाऱ्या बायकांशी बोल, का तू जात नाहीस घर सोडून जरा ही बाहेर...म्हणजे बाबांच्या मागची ही तक्रार कमी तरी होईल जरा...

म्हणजे तुझी आई तुझ्या बाबांच्या मागची तक्रार आहे तर, त्यांना धाकात ठेवते असे वाटते तर तुला ,त्यात माझी त्यांच्यासाठी काळजी दिसत नाही तर तुला, मी कटकट अशी वाटते का तुमच्या सगळ्यांना, मला ही काही काम नाही असे वाटते हो सगळ्यांना, मी घरी रिकामी असते म्हणून मी तुला फोन करून त्रास देते असे तर वाटत नाही ना तुला ,तुझ्या बायको सोबत जरा बोलायचे म्हणते तर म्हणतोस की मला निरोप दे मी सांगतो, ती कामात आहे...तुम्ही सगळे कामाचे मी काय बिनकामी असे का रे...


इकडे आई चिडली होती रवीवर


तिला त्याचा खूप राग आला होता