Login

आईचा हात

आई कमी शिकलेली असली तरी तिचं प्रेम आभाळाएवढं असतं
आईचा हात


एक छोट्या गावात रोहन नावाचा मुलगा राहत होता. तो दहावीत शिकत होता. त्याची आई कमी शिकलेली होती त्यामुळे तो सतत आपल्या आईला कमी लेखायचा आणि इतरांसोबत तिची तुलना करायचा आणि नेहमी आपल्या आईवर राग काढायचा. कारण त्याला वाटायचं, आईला काहीच समजत नाही. त्याच्या आईचं शिक्षण कमी झालं होतं म्हणून त्याला वाटायचं आपल्या आईला काहीच येत नाही, पण तसं नव्हतं. तिचं मन अगदी सोन्यासारखं होतं. ती खुप मेहनती होती. कमी शिकलेली असली तरी दिवसभर कष्ट करायची, त्याच्या शिक्षणासाठी पैसा हवा म्हणून खुप मेहनत करायची. पण रोहनला त्याची जाणीव नव्हती.

एक दिवस शाळेत शिक्षकांनी सांगितलं, “उद्या सगळ्यांनी 'आई ' या विषयावर निबंध लिहायचा आहे.”
रोहनला ते काम अगदी कंटाळवाणं वाटलं. घरी आल्यावर त्याने आईला विचारलं,
“आई, तू काय करतेस दिवसभर?”
त्यावर आई हसून म्हणाली, “तू शाळेत जातोस ना, मी तुझं आयुष्य सुरळीत व्हावं यासाठी काम करते.”

दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन उठला आणि पाहतो तर आईला ताप आला होता, तिला बरं वाटत नव्हतं. तरीही ती उठून त्याचा डबा तयार करत होती. त्याने पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातील थकवा आणि हातातील कापरेपणा पाहिला.
तो म्हणाला, “आई, आज तू विश्रांती घे, मी स्वतः माझी तयारी करतो.”
आईने हलकं हसून सांगितलं, “बाळा, आईचा हात थांबला की सगळं घर थांबतं.” तिच्या अशा बोलण्याने लगेचच रोहनच्या डोळ्यांत पाणी आलं आणि तो थेट शाळेत गेला.
शाळेत पोहोचल्यावर त्याने निबंधात लिहिलं,
“आई म्हणजे ती शक्ती असते, जी कधीही न थांबता आपल्या लेकरासाठी जगते. ती बोलत नाही, पण तिचं प्रत्येक काम हे तिच्या प्रेमाचं प्रतीक असतं. तिचा हात म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो. आपण जगात कितीही उंच गेलो तरी त्या हाताची ऊबच खरी श्रीमंती आहे.”

तो निबंध शिक्षक वाचत होते आणि सगळी मुलं ऐकत होती ते ऐकून सगळे शांत झाले. निबंध वाचताना शिक्षकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आले.

त्या दिवशी रोहनला समजलं... आई शिकलेली नसली तरी ती जीवन शिकवते आणि त्यासोबतच जगायला शिकवते. त्या दिवसापासून तो त्याच्या आईवर मनापासून प्रेम करू लागला.