आईचे लग्न भाग १

आईचे लग्न भाग१
जलद लेखन
कर्तव्य
आईचे लग्न भाग १

"काय रे आशिष? किती पसारा करून ठेवला आहे घरात."

"अगं आई, थांब नां. खेळू दे ना मला. शिवाय माझी एक छोटीशी गाडी दिसत नाही आहे. ती शोधत आहे मी."आशिष म्हणाला.

"तुझे बाबा येतील बघ एवढ्यात ऑफिसमधून. ते घरी यायच्या आत सर्व आवरून ठेव. पसारा पाहून ते उगाच चिडचिड करतात.आवर लवकर." मी तोपर्यंत स्वयंपाकाचं बघते. तुझ्या बाबांनी सकाळीच मला शेवयाची खीर करायला सांगितली होती. ते येईपर्यंत बनवून ठेवते. असं म्हणत सुवर्णा स्वयंपाक घराकडे वळली.

हो आई. असं म्हणत आशिषने सर्व वस्तू बरोबर जागच्या जागी ठेवून दिल्या. इकडे सुवर्णाचाही स्वयंपाक होत आला होता.

"आज तुझ्या बाबांनी घरी यायला एवढा उशीर कां केला असेल? एव्हाना त्यांना यायला पाहिजे होतं."सुवर्णा म्हणाली.

तेवढ्यात सुवर्णाचा फोन वाजला. कुणाचा फोन असेल कुणास ठाऊक? बहुतेक तुझ्या बाबांचाच असेल म्हणत सुवर्णा चार्जिंगला लावलेल्या फोन जवळ गेली आणि फोन घेतला.

"हॅलो कोण बोलतंय? पलीकडून एक अनोळखी आवाज."

"हॅलो बोला नां. कोणाचा नंबर पाहिजे आहे तुम्हाला .सुवर्णा म्हणाली.

"तुम्ही सुजयच्या मिसेस कां?"

"हो मीच बोलतेय. सांगा नां काय म्हणता?"

"सुजयचा अपघात झालाय."

ऑफिसमधून घरी येताना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.सिटी हॉस्पिटल मध्ये आहेत ते.

"काय?????????"

"काय बोलताय तुम्ही हे?"एवढ्यात फोन कट झाला.

आशिषsssss

म्हणत सुवर्णाच्या हातातील फोन गळून पडला. ती धाडकन जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली.

इकडे आईची किंकाळी ऐकून आशिष धावत आला.

"काय झालं गं आई? कां अशी करतेस? आई !आई !सांग नां गं काय झालं?"

आईची अशी अवस्था बघून आशिष जोर जोरात रडू लागला. त्याचे रडणे ऐकून शेजारी गोळा झाले.

सर्वांनी सुवर्णाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. हळूहळू सुवर्णा शुद्धीवर आली. तिने घडलेली हकीकत सांगितली. शेजाऱ्यांनी त्या मायलेकरांना हॉस्पिटलमध्ये नेले.

परंतु तोपर्यंत सर्व काही संपले होते आशिषच्या बाबांचा मृत्यू झाला होता.

दोघेही धाय मोकलून रडू लागले. उपस्थितांना त्यांची कशी समजूत घालावी कळेना. सुवर्णाची तर वारंवार शुद्ध हरपत होती.

आशिष सतत आपल्या आईला धीर देत होता.

खेळ कुणाला
दैवाचा कळला.
मी असो, तू असो
हा असो कुणी असो
दैवलेख नां
कधी कुणा टळला.


आशिषला आपल्या आईची अवस्था पहावत नव्हती. सुवर्णाही वारंवार आशिष कडे बघत होती. तिलाही आशिषचे सांत्वन कसे करावे कळेना. दोघेही रडत रडतच एकमेकांना धीर देत होते. सकाळी शेवयाची खीर करायला सांगून गेलेले सुजय आता आपल्याला कधीच दिसणार नाही. ही कल्पनाही ती करू शकत नव्हती.

पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य वाचा.

क्रमशः

सौ. रेखा देशमुख