" अरे, काय हे सकाळचे दहा वाजून गेले तरी चहाचा पत्ता नाही..समीरा ऐ समीरा.. आहेस कुठे?" आजोबा चहाशिवाय खूपच बेचैन होऊन ओरडत होते.
"आई, ए आई ऊठ ना यार, आजोबांना चहा हवा आहे.. आणि मला पण कॉफी पाहिजे." वीर बेडरूममध्ये झोपलेल्या समीराला म्हणाला..
"सॉरी, मी आजपासून सुट्टीवर आहे. मी कालच तुम्हाला सांगितले होते." समीरा अंथरूणातून न उठता म्हणाली..
"आई, तू कधी सांगितलंस? आणि बाबा कुठे गेले?"
"काल जेवताना जेव्हा तू कानात तुझे हेडसेट घालून बसला होतास ना, तेव्हा मी तीनदा सांगितले. तुझे लक्ष असते का कधी आईच्या बोलण्याकडे? आणि बाबा गेले आहेत दूध आणायला?"
"आई,हे बघ अशी मस्करी बरी नाही. तुझ्यासारखी कॉफी कोणीच करू शकत नाही.. प्लीज माझी लाडकी आई. दे ना.." वीर समीराच्या जवळ जात म्हणाला..
"अजिबात जवळही येऊ नकोस.. आणि मस्का तर अजिबात नाही.. फ्रिज मध्ये कालचे दूध असेल बघ.. त्याचा पटकन चहा ठेव.. आणि थोडे आले पण ठेचून टाक बरे.."
आपल्या विनवणीचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून वीर गुपचूप चहा ठेवायला गेला.. त्याला स्वयंपाकघरात शिरलेले पाहून आजोबा पण आत शिरले. " काय रे, काय झाले समीराला?"
" काय नाही. सुट्टीवर आहे म्हणे..आजोबा , आई असे काही काल बोलली होती का?"
" अरे , काल सुट्टी असे काहीतरी ऐकले..मला मस्करी वाटली. हि खरेच सिरियसली बोलली कि काय?"
"हो ना, आता तर मला वाटते, नाश्ता, स्वयंपाक सगळेच आपल्याला करायला लागणार?"
" अरे रडतोस काय? मी आहे ना तुझ्या मदतीला.. मला सगळा स्वयंपाक छान जमतो."
" आजोबा तुम्ही ना लांबच राहा.. मागच्या वेळेस मस्त कॉफी करतो म्हणालात आणि दूध उतू घालवलंत, कॉफीची बाटली फोडून ठेवली.. आई यायच्या आत आवरताना मला किती त्रास झाला. तरिही तिला कळलेच."
"बरे मग एक दिवस बाहेरून मागवू.."
"मस्त आयडिया..मी बाबांना फोन करतो.."
तर आजोबा, वीर, सुदीप आणि समीरा ह्या चौघांचे हे एक टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब..सुदीप आणि समीरा दोघेही बँकेत कामाला होते.. वीर अकरावीला होता.. आजोबा निवृत्त झाले होते.. सगळ्यांचे एकमेकांशी छान जमायचे. वीरही एक आज्ञाधारक , प्रेमळ मुलगा होता. असे सगळे असताना समीराला अचानक काय झाले हे कोणालाच कळेना... बघूया त्यांना आज चहा तरी मिळतोय का?
"काय रे सुदीप, एवढा वेळ लागतो का दूध आणायला? आणि आपल्या रोजच्या दूधवाल्याचे काय झाले?", वीरचा चहा अजून तयार झाला नसल्याने आजोबांची चिडचिड थांबली नव्हती..
"अहो बाबा, त्याचा छोटासा अपघात झाला आहे म्हणून तो आठ दिवस दूध घरी आणून देणार नाही. आणि मला जायला थोडा उशीर झाला, तोपर्यंत त्याच्याकडचे दूध संपले होते. दूध शोधून दमलो मी. जाऊ दे.. नाश्त्याला गरम घावणे मिळाली ती आणली आहेत. देऊ का तुम्हाला?"
" हो दे, समीराला पण नेऊन दे. आज काय झाले पण तिला?"
" नाही माहित.. खाऊन झाल्यावर विचारतो.."
"आई , चहा आणि नाश्ता.."
" वीर, खोलीच्या बाहेरच ठेव.. आणि नंतर भांडी घासून पुसून ठेव.."
" आई, एनिथिंग सिरियस?" वीरने काळजीने विचारले..
" संध्याकाळी बोलू. बाबांना विचार आज दुपारचा मेनू काय असणार?"
"आई,मी तुला खूप त्रास देतो का?"
" नाही असं कारे विचारतोस?"
"मग बाबांच्या हातच्या जेवणाची शिक्षा तू असताना का? तू कर ना काहीतरी नाहीतर बाहेरून मागवू.."
" आत्तापुरते तर करा.. आणि तुला माहित आहे, आजोबा खाताना आवडीने बाहेरचे खातात पण नंतर त्यांना खूप त्रास होतो.. तुम्ही तयारी करा, मी सांगते कसे करायचे... आणि सोप्या सोप्या गोष्टीच करा.." समीरा वीरला समजावत म्हणाली..
समीराच्या सूचनेप्रमाणे आजोबांनी फुडप्रोसेसरमध्ये कणीक भिजवायला घेतली.. आधी घट्ट मग पातळ मग कसेतरी पीठ घालून कणीक भिजली..तो पर्यंत सुदीपने कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाकले. वीरने वरणभात, बटाट्याचा कुकर लावला..
" आता एक काम कर, कुकरची वाफ गेली कि, बटाटे सोलून मिरचीची फोडणी दे ..वरून थोडे साखर, मीठ टाक भाजी तयार.." समीरा आतून सूचना देत होती..
"आता पोळ्या मी नाही हा करणार..बाबांना सांग, " वीर कुरकुरत म्हणाला..
"तू प्रयत्न कर, मी तुला शिकवतो.." इति सुदीप..
" तुम्हाला जमणार नसेल तर मी करू का? " उत्साही आजोबा..
" नको, नको आम्ही करतो," असे म्हणत सुदीप आणि वीर पोळ्या करायला धावले..
कसाबसा स्वयंपाक झाल्यावर त्यांनी समीराला जेवायला बोलावले.. पण ती बेडरूममध्येच जेवायला बसली..
"समीरा आता तरी काय चालले आहे सांगशील का, कि मी आत येऊ?" आजोबा ओरडले..
" ओके. सांगते. आपण सगळे परवा पिकनिकला गेलो होतो ना तिथे एक जण तिला झालेला करोना आणि त्यामुळे तिच्या घरातल्यांची झालेली अडचण सांगत होती.. माझ्या डोक्यात आले कि उद्या असे काही माझ्यासोबत झाले तर तुम्हा सगळ्यांना जमेल का मॅनेज करायला? म्हणून मी स्वतःला एका दिवसासाठी क्वारंटाइन करून घेतले.."
" वेडीच आहेस.." असे म्हणत सुदीपने प्रेमाने समीराला टपली मारली..
वीर सुद्धा तिला जाऊन चिकटला...
"बरे तुझा हाच प्रॉब्लेम असेल आणि तो सुटला असेल तर, संध्याकाळी भजी कर.. सुदीप जरी माझाच मुलगा असला तरी त्याच्या हाताला अजिबात माझ्या हाताची चव नाही आणि वीरच्या तर नाहीच नाही.."आजोबांनी
सगळ्यांच्या मनातले बोलून दाखवले...
कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा