Login

आईची सावली भाग - १

मुलाच्या यशासाठी आई त्याग करते.
आईची सावली भाग - १


गावाच्या टोकाला, नदीच्या काठावर, एक लहानसं घर होतं. मातीच्या भिंती, पत्र्याचं छप्पर आणि ओसरीवर नेहमी वाळत घातलेली कपड्यांची दोरी, हेच त्या घराचं वैभव. त्या घरात राहत होती सुमित्रा आणि तिचा मुलगा आरव.

सुमित्रा फारशी बोलकी नव्हती. तिचं आयुष्य शब्दांपेक्षा कामात जास्त व्यक्त होत असे. सकाळी अंधार असतानाच उठणं, चुल पेटवणं, भाकरी भाजणं, आरवसाठी डबा तयार करणं आणि मग कामावर जाणं, हा तिचा रोजचा क्रम होता.

आरव लहानपणापासूनच हुशार होता. प्रश्न विचारणारा, विचार करणारा. पण वडिलांच्या मृत्यूनंतर त्याचं बालपण अचानक मोठं झालं. तो आईला मदत करायचा, पण त्याच्या मनात एक बोच होती, “आपण गरिबीचं आयुष्यच जगणार का?”

शाळेत शिक्षक त्याचं नेहमी कौतुक करत. “आरव, तू पुढे जाशील. मोठं काहितरी करशील,” हे ऐकून सुमित्राच्या डोळ्यांत पाणी यायचं. पण ते आनंदाचं की भीतीचं, हे तिलाही कळत नसे.

ती स्वतः फारसं शिकलेली नव्हती. सहावीपर्यंत शाळा, मग संसार. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व तिला आयुष्याने शिकवलं होतं. म्हणूनच आरवच्या शिक्षणासाठी ती कोणतीही अडचण चालवायला तयार होती.

पावसाळ्याच्या एका संध्याकाळी आरव म्हणाला, “आई, मला इंजिनियर व्हायचं आहे.”

सुमित्रा क्षणभर थांबली. इंजिनियर, हा शब्द तिला पूर्ण कळला नाही, पण त्यात काहीतरी मोठं आहे, हे तिला जाणवलं. “ठीक आहे,” ती फक्त एवढंच म्हणाली.
त्या “ठीक आहे” मागे तिच्या आयुष्याची किंमत होती.

दहावी आली. आरव रात्रंदिवस अभ्यास करू लागला. दिवा कधी बंद पडला, तर सुमित्रा कंदिल पेटवायची. कधी पैसे नसले, तर स्वतः उपाशी राहायची, पण मुलाचा डबा कधी रिकामा नसायचा.

निकालाच्या दिवशी आरव पहिल्या क्रमांकाने पास झाला. गावात पेढे वाटले गेले. लोक म्हणाले, “सुमित्रा, तुझा मुलगा नाव काढणार.”

पण त्या रात्री सुमित्रा झोपली नाही. शहरात कॉलेज म्हणजे खर्च, दूर राहणं, एकटेपणा. आरव मात्र स्वप्नात होता.

“आई, मी तुला मोठ्या घरात ठेवीन,” तो उत्साहात म्हणाला.

सुमित्रा हसली, पण म्हणाली, “मला घर नको रे… तू मोठा झालास, एवढंच पुरेसं आहे.”

दोन दिवसांनी ती बाजारात गेली. तिची एकमेव सोन्याची नथ तिने विकली. घरी येताना हात रिकामे होते, पण मन मात्र भरलेलं होतं, मुलाच्या भविष्याने.

आरव शहरात गेला. बस निघताना सुमित्रा रस्त्याच्या कडेला उभी होती. बस दूर जात होती… आणि तिची सावली मात्र तिथेच राहिली होती.