Login

आईची शिकवण भाग - २

आईची शिकवण कायम उपयोगी ठरते.
आईची शिकवण भाग - २

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
संघ - वनिता शिंदे


जुई.. निलिमा आणि निलेशची एकुलती एक लाडाची मुलगी. बारावीची परीक्षा नुकतीच पास झालेली. आता पुढे काय करायचं म्हणून तिने अनेक ठिकाणी फॉर्म भरून ठेवलेले. इंजिनियरिंग करायचं म्हणून तिने आणि तिच्या पप्पांनी दोघांनी मिळून ठरवलेलं. अभ्यासात तशी हुशार होती जुई, पण घरकामात तिला अजिबात रस नव्हता. लहानपणापासूनच पप्पांनी तिच्या मनावर बिंबवले, की घरातली कामं काय कधीही शिकून होतील, पण अभ्यास मात्र अजिबात चुकवायचा नाही; म्हणून तिनेही कधी मनावर घेतले नाही, पण निलिमाला मात्र त्या दोघांच्या अशा वागण्याचा राग यायचा. सगळ्यांचे सगळे करता करता  ती एकटी दमून जायची. 


माझ्या पोरीला काही काम सांगायचं नाही; म्हणून निलेश तिला काहीच काम करू देत नव्हता. घरातली अगदी छोटी छोटी काम सुद्धा निलिमा करायची; त्यामुळे तिला वाटायचं की लेकीने थोडीफार मदत केली तर काय बिघडले? पण निलेशला हे मुळीच पटत नव्हते. जास्तच गरज पडली तर तो स्वतः मदत करायचा किचनमधे, पण मुलीला अजिबात येऊ देत नव्हता गॅस जवळ. यावरून त्या नवरा बायकोमधे अनेकदा भांडण व्हायची.


किमान जेवताना भांडी घेऊन येणे, वाढून घेणे, पाणी आणणे त्यानंतर सगळे पुन्हा किचनमधे नेऊन ठेवणे हे तर अगदी क्षुल्लक कामं आहेत, पण तरीही तिला हे सुद्धा काम सांगायचे नाही अशी ताकीद देऊन ठेवली होती त्याने निलिमाला; त्यामुळे तिची मनातून चिडचिड होत असे.


"पोरीच्या जातीने नुसतं बसून राहणे चांगले दिसत नाही. काही ना काही काम करत राहायला पाहिजे. मान्य आहे, पोरगी चांगली शिकतेय, हुशार आहे, पण म्हणून तिला कधी तुम्ही किचनमधे जाऊच देणार नाही का? कधी ना कधी हे कामही करावेच लागणार आहे ना! उद्या लग्न झाल्यावर सासरचे काय म्हणतील? पोरीच्या आईने तिला काही शिकवलेच नाही."
नीलू बडबड करत होती आणि तिची बडबड ऐकून निलेश मात्र बसल्या जागी घोरत होता.


"काय एक एक माणसं असतात? पोरीच्या काळजीने इथे मला राहवत नाहीये आणि हे घोरत पडलेय."
निलिमा पुन्हा बडबडत किचनमधे जाते इतक्यात दारावरची बेल वाजते म्हणून ती दरवाजा उघडायला जाते.


"आई ग! आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे."
जुई आनंदात घरात उड्या मारतच येते.


"अरे वाह! माझा शोना."
निलिमाला पण खूप आनंद झाला. त्या दोघींचा बोलण्याचा आवाज ऐकून निलेश पण झोपेतून जागा झाला.


"काय चाललंय, कसला आनंद झालंय माझ्या लेकीला?"
निलेश उठून बसत बोलू लागला.

"पप्पा, माझा नंबर लागलाय इंजिनियरिंग कॉलेजात."
जुई अगदी खुश होऊन सांगत होती.


"अरे वा वा वा.. हुशार आहे माझं पिल्लू. आता खूप अभ्यास करायचा, अजिबात इकडे तिकडे करायचं नाही."
निलेश तिला लाडाने जवळ घेत बोलतो.

"पप्पा, पण मला त्यासाठी तुमच्यापासून लांब जावे लागेल."
जुई हळूच बोलली, कारण तिला वाटले की बाहेरगावी शिकायला तिला जाऊ देणार नाही.

"म्हणजे काय? इथल्या कॉलेजात नाही लागला नंबर."
निलेश तिच्याकडे आश्चर्याने बघत बोलतो.

"मग आता काय?"
निलिमा पण पुढे काय करायचं याचा विचार करू लागते.

"हो पप्पा, हे बघा इथली लिस्ट."
जुई फोनमधे कसले तरी फोटो दाखवत बोलते.


"अरे मला वाटलं इथे नंबर लागला तर छान होईल, पण असो.. अजिबात घाबरायच नाही. आम्ही तुला सगळी व्यवस्था करून देऊ. काळजीच अजिबात कारण नाही. तुला तिथे हॉस्टेलवर राहायची काही गरज नाही. आम्ही चांगली रूम बघून देऊ म्हणजे तुला कसले टेन्शन नाही."
निलेश आपल्या लाडक्या लेकीसाठी सगळं काही करायला तयार होता.


"अहो पण.. "
निलिमा काही बोलणार तोच निलेशने तिला चहा करायला सांगितले.


क्रमशः