Login

आईची शिकवण भाग - ४

आईची शिकवण कायम उपयोगी ठरते.
आईची शिकवण भाग - ४

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
संघ - वनिता शिंदे


आख्खी रात्र निलिमाला झोप लागली नाही. जुईच्या काळजीने तिला काही सुचत नव्हते. पहिल्यांदा ती अशी घर सोडून जाणार होती; त्यामुळे टेन्शन तर येणारच होते.

निलेश आणि निलिमा दोघेही जुईला सोडायला निघतात. सगळं सामान नीट भरलं का? सगळं व्यवस्थित घेतलं का? हे निलिमा पुन्हा पुन्हा चेक करत होती.

"चला आता लवकर, आपल्याला वेळ लागणार आहे पोहोचायला तिकडे."
निलेश बाहेर उभा राहून दोघींची वाट बघत होता.


"हो पप्पा, आलेच. मी तयारच आहे, पण आई काय माहिती काय करतेय आतमध्ये. थांबा थोडा वेळ येईलच ती इतक्यात. आता तिला काही बोलू नका बरं. आधीच ती जरा रडवेली झाली आहे."
जुईला सुद्धा कळतं होते की तिच्या जाण्याने आईला त्रास होतोय.


"चला निघुया का? जुई हे घे, हे पैसे जवळ ठेव आणि हा देवाचा अंगारा आहे. नीट पर्समधेच ठेव कुठेही इकडे तिकडे टाकू नकोस."
निलिमाने तिच्या हातात पैसे आणि एक छोटेसे देवाचे पाकीट दिले.


गाडीत बसूनही निलिमा जुईला काय करायचं काय नाही हे सांगत होती. जुई फक्त ऐकायचं म्हणून ऐकत होती, कारण तिला हे घरात असतानाही चार चार वेळा सांगून झाले होते. मुलीच्या जातीने कसे राहायला हवे कसे नाही? कोणाशी बोलायचं कोणाशी नाही? हे सुध्दा ती सांगत होती. कोणी कुठे चल म्हणाले तर लगेच जायचं नाही. अशा अनेक गोष्टी ती सांगत होती. शेवटी आईच ती, लेकीच्या काळजीने हे सारं बाहेर पडत होतं.

  
पाच सहा तासानंतर ते कॉलेजात पोहोचले आणि सगळ्या फॉर्मलीटी पूर्ण करून झाल्या. जुई आता हॉस्टेलमधे राहणार होती. कॉलेजचेच हॉस्टेल होते; त्यामुळे तिथे इतक्या चांगल्या सुविधा तर नसतील, पण सुरक्षित नक्की असणार म्हणून निलिमाला थोडं बरं वाटलं. परवानगी शिवाय बाहेर जाता येणार नाही आणि आई वडील भेटायला आले तर भेटू शकता असेही सांगण्यात आले. बाकी इतर वेळी बाहेर सोडणार नाही.


जुई सोबत आणखी तीन जणी असणार होत्या. एका रूममधे चार जणी याप्रमाणे त्यांना एक छोटा बेड आणि बाजूला बॅग ठेवायला जागा. जुईचे सर्व सामान ती रूममधे ठेवू लागली. बाकीच्या दोघी तिघी जणी अजून यायच्या होत्या; त्यामुळे त्यांची ओळख झालेली नव्हती.


सर्व फॉर्म्यालिटी पूर्ण करून भरपूर वेळ झाला होता. आता निघावे लागणार होते. जास्त वेळ थांबता येणार नाही म्हणून सांगितले होते. निघताना निलिमा मात्र मनातून बेचैन झाली होती.


"चल बेटा, निघू का मग आम्ही?"
असे म्हणून निलेशने जुईला जवळ घेतले.


"नीट व्यवस्थित रहा, चांगला अभ्यास कर. आम्ही येतच राहू तुला भेटायला अधून मधून; त्यामुळे काळजी करायची नाही."
निलिमा जुईच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होती. शेवटी निघताना पोरीला कडकडून मिठी मारली आणि गाडीत बसल्यावर जे निलिमा रडायला लागली, की तिला निलेश सुद्धा थांबवू शकला नाही.


"नीलू, अग आपली लेक शिकायला आली आहे इकडे. तिला सासरी सोडायला आल्यासारखे का वागतेस तू?"
निलेश गाडीतल वातावरण थोडं हलकं करण्याचा प्रयत्न करत होता.

"तुम्हाला नाही समजणार आईच काळीज, तुम्ही आपली गाडी चालवा."
निलिमा नाक पुसत बोलली.


"अरे, बाप आहे मी. मला नाही कळणार तर कोणाला कळणार बरं! काळजी मलाही वाटते तिची, पण म्हणून आपण तिला कधी मोकळं सोडायचंच नाही का?"
निलेश आता तिला समजावत शांतपणे बोलू लागला आणि त्याने सांगितलेले तिला सगळे पटतं होते; त्यामुळे ती शांतपणे फक्त त्याचे ऐकत होती.


क्रमशः