Login

आईच्या मनाचा आवाज

स्त्री आई झाल्यावर काय काय अनुभवते. हे ह्या कथेत वाचूया.
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
लघुकथा फेरी ( संघ - कामिनी )

शीर्षक - आईच्या मनाचा आवाज

प्रसूती म्हणजे एका स्त्रीसाठी दुसरा जन्मच असतो. बाळाचा जन्म होताच संपूर्ण घरात आनंदाचा उत्सव सुरू होतो; पण त्या आईच्या मनात किती भावनिक वादळं दाटून येतात, हे फार कमी लोकांना समजतं.

सोनालीचं लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. शहरापासून थोडं दूर, पिंपळगाव नावाच्या गावात ती नवरा आकाश आणि सासू नंदासोबत राहत होती. सोनाली शिकलेली हुशार मुलगी; पण लग्नानंतर तिला नोकरी सोडावी लागलेली.

सोनालीनं नुकताच मुलाला जन्म दिला होता. घरातला पहिला नातू, त्यामुळे सगळे जण खूप खूश होते.

नंदा, "माझा नातू किती गोड दिसतोय. आमच्या घराचा दिवा आहे ना..."

सगळ्यांचं लक्ष बाळाकडे होतं. सोनाली मात्र बिछान्यावर थकलेली, फिकट चेहरा घेऊन पडली होती.

सोनाली मनाशीच म्हणाली, 'बाळ छान आहे. त्यामुळे सगळेच खूश आहेत. मी पण खूश आहे. तरीही मला इतकं रिकामं, काळोखासारखं का वाटतंय? मी आई आहे ना? मग मी एवढी घाबरलेली का आहे?'

रात्रंदिवस बाळ रडायचं. यामुळे सोनालीची झोप होत नव्हती. तिच्या मनात सतत भीती, अपराधगंड असायचा.

तीन आठवडे उलटले. सोनालीला शरीराने बरं वाटायला लागलं होतं; पण मनाने ती अधिकच तुटू लागलेली. तिला काहीच छान नाही वाटायचं.


नंदा म्हणाली, "काय गं सोनाली, अजून बरी झाली नाहीस का? आमच्या काळात बाळ झालं तरी दुसऱ्या दिवशी आम्ही भांडी घासली, स्वयंपाक केला. आमच्या सासूने आम्हाला दोन दिवस पण आराम नव्हता दिला. तू तर दिवसभर आळसावलेलीच!"

यावर सोनाली गप्पच राहिली. तिच्या डोळ्यांत पाणी आलं.

आकाशला पण आईचं ऐकून वाटायचं की आपली बायको खरंच आळशी झालीये.

आकाश म्हणायचा, "आईचं बरोबर आहे. थोडं कणखर व्हायला हवं. एवढं काही नाही, बाळ सांभाळताना सगळ्यांचंच असं होतं."

हे ऐकून सोनालीचं मन पूर्ण खचून जायचं.

बाळ रडायला लागलं की सोनालीच्या छातीवर दडपण यायचं. तिला वाटायचं, 'मी वाईट आई आहे. मी बाळ नीट सांभाळूच शकत नाही.'

तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं होतं. डोळे नेहमी पाणवलेले असायचे.

एकदिवशी संध्याकाळी बाळ रडत होतं. सोनाली आकाशला म्हणाली, "थोड्या वेळ बघतो का बाळाला प्लीज, मी सकाळपासून झोपले नाहीये. रात्री पण झोप झालेली नाही. थोडा वेळ आराम करते."

आकाश म्हणाला, "दिवसभर काम करून मी कंटाळतो. घरी आल्यावर तरी मला बसू दे ना जरा. तू घरीच असतेस. तुझी इच्छा असेल तेव्हा आराम करू शकतेस."

तसे सोनालीला खूप रडू आले; पण ती काहीच बोलली नाही.

एका संध्याकाळी गच्चीवर बसून स्वतःशी बोलत होती, 'मी सगळ्यांना त्रास देतीये. मीच नाहीशी झाले तर बरं होईल.'

तेवढ्यात दारातून आवाज आला, "अगं सोनाली! कुठे आहेस?"

तो आवाज होता आकाशची बहीण - रुचीचा.

रुची शहरात राहायची.
तिनं सोनालीला पाहिलं आणि तिला धक्काच बसला.

रुची म्हणाली, "अगं सोनाली! तुला काय झालंय? चेहरा का एवढा फिकट?"

सोनाली डोळयांतले पाणी लपवू शकली नाही.

रुची मायेने म्हणाली, "काय झालं? सगळं सांग मला."

थोडा वेळ गप्प राहून मग सोनालीनं मन मोकळं केलं.

सोनाली म्हणाली, "रुचीताई मला खूप एकटं वाटतंय... बाळाचं रडणं सहन होत नाही. सासूबाई मला आळशी म्हणतात. आकाशलाही वाटते मी काही करत नाही. मला भीती वाटते, मी चांगली आई नाहीये."

रुचीने सगळं शांतपणे ऐकलं.

रुची हुशार होती. तिने या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या.

रुची म्हणाली, "सोनाली, ही काही तुझी चूक नाही. हे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे. प्रसूतीनंतर अनेक स्त्रियांना होतं."

सोनाली कळकळीने म्हणाली, "पण सासूबाई आणि आकाशला मी हे कसं सांगू? ते हसतील माझ्यावर."

रुची म्हणाली, " मी आहे ना, मी समजावते त्यांना. तू काळजी नको करू."

रुचीने आईला समोर घेतलं.

रुची, "आई, सोनालीला आजार आहे. तिला मदतीची गरज आहे. तू तिच्यावर ओरडतेस, टोमणे मारतेस... त्यामुळे तिची अवस्था आणखी बिघडते."

नंदा चिडून म्हणाली, "हे कसले नवे आजार काढलेत! आमच्या काळात आम्ही सगळं केलं, आम्हाला काही नाही झालं ते."

रुची, "त्यावेळी कुणी लक्ष दिलं नाही म्हणून किती स्त्रिया आतून तुटल्या असतील, आपल्याला माहीतही नाही. आता मात्र डॉक्टर सांगतात की प्रसूतीनंतरचं नैराश्य धोकादायक आहे. आकाश, तुला बायकोचं आयुष्य पाहिजे असेल तर तिच्यासोबत उभं राहिलं पाहिजेस."

आकाश गप्प बसला. त्याला पाठचं सगळं आठवायला लागलेलं.

रुचीने दुसऱ्या दिवशीच सोनालीला शहरातल्या डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तिचं समुपदेशन केलं, औषधं दिली आणि सांगितलं, "ही काही सोनालीची चूक नाही. बऱ्याच स्त्रिया या टप्प्यातून जातात. घरच्यांनी आधार दिला तर ती लवकर बरी होईल."

रुचीने हे सगळं आकाशला सांगितलं. आकाशच्या मनात अपराधगंड दाटून आला.
त्या दिवसापासून आकाश बाळ सांभाळायला पुढे यायला लागला. रात्री बाळ रडल्यावर तो उठून सोनालीला मदत करायचा.

यामुळे नंदा सुरुवातीला रुसली होती.

रुचीने पण तिला समजावले की, "माझ्या सासूनी जर असं केलं असतं तर मी कशी राहिले असते."

पण नंदा काहीच म्हणाली नाही.

एक दिवस सोनाली झोपेत रडत होती. नंदानी ते पाहिले आणि तिचं मन पिळवटून गेलं.

नंदा हळूच म्हणाली, "बाळा मी तुला समजून घेतलं नाही. मला माफ कर."

सोनालीच्या डोळ्यांतून अश्रू आले; पण त्यात आता एक वेगळी ऊब होती.

काही महिन्यांत सोनाली पूर्वीसारखी झाली. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. बाळाशी तिचं नातं आणखीन घट्ट झालं होतं.

एका संध्याकाळी ती फोनवर रुचीशी बोलत होती.

सोनाली, "तू आली नसती तर मी काय माहिती काय केलं असतं. मी सगळंच गमावलं असतं."

रुची, "हे तुझं धैर्य आहे सोनाली आणि स्त्रिया यातून जातात; पण लोक समजून घेत नाही. या पोस्टपार्टम डिप्रेशनला औषधांपेक्षा आपल्या माणसांची साथ लागते. मी फक्त तुला सावलीतून प्रकाशाकडे ढकललं इतकंच."


घरात आता हसण्याचे आवाज घुमत होते. आकाशला पत्नीचं खरं महत्त्व कळलं होतं. नंदालाही जाणवलं होतं की सून म्हणजे फक्त घरकाम करणारी व्यक्ती नाही, तर भावना असलेली माणूस आहे.

नंदाने ठरवलं होतं की 'जे आपल्यासोबत झाले मी सोनालीसोबत होऊन देणार नाही. मी नेहमी तिच्यासोबत ठामपणे उभी राहणार.'

सोनाली जणू नव्याने जन्मली होती. तिच्या अनुभवातून ती गावातल्या इतर महिलांनाही समजावू लागली की "प्रसूतीनंतर नैराश्य येणं लाजिरवाणं नाही, अशावेळी मदत मागणं हेच खरं धैर्य आहे."

समाप्त.
©® निकिता पाठक जोग
0