Login

आईपणाच्या सावल्या (भाग १)

मातृत्व हे प्रत्येकास स्त्री आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग कदाचित स्त्री जीवन मातृत्व मिळाल्यानंतरच परिपूर्ण होतो ही व्याख्या कदाचित चुकीची ठरणार नाही पण हेच मातृत्व जेव्हा स्त्री अनुभवते प्रत्यक्षात त्यावेळेस तिला खूप अशा शारीरिक तसेच मानसिक आजारातून देखील जावे लागते त्यावरच आधारित ही एक काल्पनिक कथा.
कथा : आईपणाच्या सावल्या ( भाग १)

चॅम्पियन्स ट्रॉफी : 2025
----------------------
गर्भारपणाची बातमी कळल्यापासूनच संध्याच्या आयुष्याला जणू नवा रंग चढला होता. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघताना तिला आपलं शरीर बदलताना दिसत होतं.

कधी थोडं फुगलेलं पोटं, कधी अचानक सुजलेले पाय, तर कधी नकळत आलेला थकवा पण त्या सगळ्या त्रासांमागे एक अपार आनंद लपलेला होता
"माझ्यात एक नवा जीव जन्म घेतोय " , हा विचार तिला प्रत्येक वेळी बळ देत होता.

घरात प्रत्येक जण तिच्यावर जीव ओवाळून टाकत होते. सासूबाई देखील वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवून देत होत्या,तर विवेक संध्याचा नवरा हा तिला रोज फिरायला घेऊन जात होता.
"तुला काहीही त्रास नको", हे त्याचा आवडतं वाक्य झालं होतं. संध्या ही समाधानी होती. गर्भारपणाची नऊ महिने तिने प्रेमाने ,आशेने आणि बाळाच्या स्वप्नांनी जगली होती.शेवटी तो क्षणा आला, ज्या क्षणाशिवाय स्त्री जीवन जणू अधुरेच.मध्यरात्र उलटल्यानंतर संध्याला प्रसवपिडा सुरू झाल्या. काहीसा तणाव, विवेकचे घाबरलेले डोळे, डॉक्टरांची धावपळ ..... आणि पहाटेचं सोनसळी ऊन खिडकीतून आत येत होतं, आणि संध्याच्या बाहू पाशात एक छोटसं गुलाबी चेहऱ्याचं बाळं आलं. "मुलगी झाली आहे", डॉक्टरांनी सांगितलं. हे ऐकताच विवेकचे डोळे आनंदाने भरून आले.

संध्याने पहिल्या क्षणी बाळाकडे पाहिलं, तिचं लहानसं नाक, बंद डोळे, इवलेसे हात, बारीक बोटं.. सगळं काही स्वप्नवत वाटत होतं. हे सर्व काही फार काळ तग धरू शकले नाही कारण काही दिवसानंतरच तिच्या मनात एक विचित्र शून्याने आपलं घर मांडलं.संध्या आई झाली होती,पण तिच्या आत आनंदाच्या जागी एक अव्यक्त भीती घर करू लागली होती.

रुग्णालयातून घरी आल्यावर घरात जणू सणच सुरू होता. नातेवाईक, शेजारी,ओळखीचे सगळे येऊन बाळाला उचलून घेत होते फोटो काढत होते. "कायं गोड आहे गं तुझी मुलगी!"
"बापावर गेली आहे की आईवर ?" अशा गप्पांनी घर गजबजून गेलं होतं.

डिलिव्हरीला दहा दिवस उलटले नव्हते संध्याला मात्र हे गजबज त्रासदायक वाटू लागली. बाळ रडत असेल तर लोक म्हणत ,"आई आहेस ना,हे उचलून.तुला कळलं पाहिजे तिच्या रडण्याचे कारण कायं ते".

हे असे सर्व एकूण संध्याला अपराधीपणाचे जाणीव व्हायची.खरंच तिला कळत नव्हतं बाळ का रडतंय. दूध प्यायलं की नाही, भूक लागली की पोट दुखतंय, काहीही समजत नव्हतं.
संध्या बाळाला जवळ घ्यायची, पण मनात कुठेतरी एक भिंत उभी राहत होती. जणू त्या लहानशा जीवाशी तिचं नातं अजून जुळलंच नव्हतं.

रात्रंदिवस झोपेचा ताळमेळ बसत नव्हता.बाळ दर दोन-तीन तासांनी जागा व्हायचं,रडायचं. संध्या थकून जायची,डोळे लाल व्हायचे. विवेक ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा परत यायचा. त्यालाही थकवा असायचा, पण संध्याला त्याची उपस्थिती हवी होती.
"मला जरा झोपायचं,आराम हवा आहे" ,ती म्हणाली तर विवेक चिडून म्हणायचा,"सगळ्या बायका हे करतात,तूच एवढे जड का घेतेस?"
हे ऐकून संध्याच्या मनात खोलवर घाव बसायचा. आणि या सर्वांमुळेच ती स्वतःला कमजोर, अकार्यक्षम, अपुरी आई समजू लागली होती.

एक दिवस सहज ती आरशात स्वतःकडे बघत उभी होती.पोटावरच्या रेषा, काळवंडलेले डोळे, चेहऱ्यावरचं तेज हरवलेलं..
"ही मी आहे का ? आधीसारखी तर अजिबात दिसत नाही", तिच्या मनात विचार आला आणि डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले.

त्या रात्री बाळ सतत रडत होतं.संध्या त्याला सांभाळू शकली नाही,आणि थकून ती जोरात ओरडली. बाळ आणखी रडू लागलं. विवेक जागा झाला आणि वैतागून म्हणाला,
"काही नाही जमत तुला,आई झाल्यावर असं वागतं का कोणी?"
हे ऐकूण संध्या दुखी झाली. ती बाळाला पाळण्यात ठेवून कोपऱ्यात बसली आणि रडू लागली.तिच्या मनात एक भयानक विचार चमकून गेला
"मी नाही जोडू शकत या सगळ्यांशी, कदाचित माझ्या शिवाय यांच बरं होईल ..."

दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई आल्या आणि म्हणाल्या "इतकं रडणं बरं नाही.आई झाली आहेस म्हणजे जबाबदारी घ्यावी लागतेच.आम्हीही झेललं आहे. तू कायं वेगळी आहेस ?"

हे शब्द संध्याच्या कानात ठणकून वाजले. तिला कुणाशी बोलायचं होतं,पण बोलले की सगळ्यांना वाटायचं ते केवळ तक्रारी करते.

त्या रात्री तिने विवेकला हळूच विचारलं
"मला काहीतरी होतंय,मला रिकामं रिकामं वाटतं, काही समजत नाही. कदाचित मला डॉक्टरांना दाखवायला हवं."
विवेक मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला "हे सगळं नॉर्मल आहे.ताण घेऊ नकोस काही दिवसांत ठीक होशील".

संध्याला मात्र कळलं होतं हे फक्त थकवा किंवा फेज नाही तिच्यात काहीतरी खोलवर तुटत होतं.

रात्री झोपेत तिला भयानक स्वप्न पडू लागली.बाळ तिच्या हातातून निसटून खाली पडतंय,ती स्वतः काळोखात अडकली आहे ,कोणीही तिच्या मदतीला येत नाही.
तेव्हा ती घामाघुम होऊन जागी व्हायची. पुढच्या दिवशी बाळाकडे पाहता नाही तिच्या मनात एक काळी भीती दाटून यायची "मी या बाळाची योग्य आई आहे का ? जर मीच त्याला धोका दिला तर ?"

अशी अवस्था होत असताना देखील घरच्यांना शेजाऱ्यांना आणि समाजाला ती हसतमुख चेहरा दाखवत राहिली."आई झालीस,हसत रहा,आनंदी राहा," हेच सगळ्यांचं म्हणणं होतं.

पण सध्याच्या मनात मात्र एक गडद पोकळी निर्माण होत चालली होती ज्याचं नाव तिलाही माहिती नव्हतं.

(भाग १ समाप्त )

संध्याला नेमकं काय झालं ? भूत बाधा की आणखी काही ? आणि हे का घडत होतं ?