Login

आजच्या युगातील सावित्री (भाग - ३) अंतिम

नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या बायकोची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

जलद कथा लेखन

©®नम्रता जांभवडेकर

विषय - आजच्या युगातील सावित्री (भाग - ३) अंतिम

"माझं रेझिग्नेशन लेटर आहे." आदित्य एक नजर उमा बाईंकडे बघत शांतपणे म्हणाला

"आई, पण तुला हे कुठे सापडलं?" आदित्य

"मगाशी बाहेर जाताना तुला तुझं पाकीट सापडतं नव्हतं म्हणून मला हाक मारलीस ना, तेव्हा तुझ्याच कप्प्यात असणार पाकीट काढताना मला हे लेटर दिसलं. कसलं लेटर आहे हे वाचण्यासाठी म्हणून हातात घेतलं पण लेटर इंग्लिशमध्ये होतं म्हणून मी त्याचा फोटो काढून अश्विनीला पाठवला आणि तिला विचारलं. आधी तर ती काही सांगतच नव्हती जेव्हा मी खडसावल तेव्हा कुठे सांगितलं तिने. आदित्य तू आता नोकरीवर नाहीस. मग सगळं घरखर्च कसा भागणार रे." उमा बाई काळजीयुक्त स्वरात म्हणाल्या

"आई, आदित्य नोकरीवर नसला म्हणून काय झालं? माझी नोकरी आहे ना आता, तुम्ही नका टेंशन घेऊ. सगळं होईल व्यवस्थित." आकांक्षा उमा बाईंना धीर देतं समजावत म्हणाली

"काही गरज नाहीय तुझ्या नोकरीची. आज ह्याचं नोकरीमुळे वटपौर्णिमेची पुजा केली नाहीयेस तू." नाराज झालेल्या उमा बाई फणकारत म्हणाल्या.

"आई, एक विचारू? बायका वटपौर्णिमेची पुजा का करतात ग?" आदित्यने अचानकपणे उमा बाईंना प्रश्न केला

"का करतात म्हणजे? नवऱ्याला निरोगी दीर्घायुष्य लाभावं, तो सदा सुखी राहावा म्हणून करतात पण आजकालच्या मुलींना कुठे कळतंय ते!" एक नजर आकांक्षाकडे बघत उमा बाई म्हणाल्या

"आणि त्याच्या आनंदाचं काय?" आदित्य

"सुखी राहणारा माणूस आनंदी असतोच!" उमा बाई

"चुकतेयस तू आई. सुखी राहणारा माणूस आनंदी नसतो, तर आनंदी असणारा माणूस सुखी राहतो. आई आधीच्या काळात बायका वटपौर्णिमेची पुजा नवऱ्याच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी करायच्या पण आता काळ बदललाय. स्पर्धा खूप वाढल्यात. नवऱ्याचा जॉब गेला म्हणून त्याला बोल न लावता, त्याला सावरून स्वतः नोकरी करायला हिंमत लागते. आई लग्नानंतर मी नको म्हणत असताना सुद्धा फक्त तुझ्या हट्टाखातर आकांक्षाने तिचा चांगल्या पदावरचा जॉब सोडला; कारण तिला आपल्या घराला, आमच्या संसाराला वेळ द्यायचा होता. जेव्हा माझा जॉब गेला तेव्हा मी खूप खचलो होतो. डोळ्यांसमोर घरखर्च फेर धरत होते. मी तुलाही सांगणार होतो पण तिचं म्हणाली, 'आईंना त्रास होईल, वाईट वाटेल.' तेव्हाही आकांक्षाने मला धीर दिला आणि स्वतः जॉबसाठी इंटरव्ह्यू दिला आणि मलाही माझा छंद जोपसण्यासाठी बळ दिलं. आपला नवरा एखाद्या अडचणीत असेल, तर त्याला भक्कम साथ देऊन पुन्हा उभारी घ्यायला लावणारी माझी बायको आजच्या युगातील सावित्री आहे आणि मला अभिमान आहे माझ्या बायकोचा!" आदित्य आकांक्षाच्या खांद्यावर हात ठेवून अभिमानाने म्हणाला. आकांक्षा मात्र आदित्यकडे पाहतच राहिली.

तसे उमा बाईंचे डोळे सुद्धा पाणावले

"आई, ह्यावर्षी माझी पहिली वटपौर्णिमा असताना मी पुजा करणार नाही असं कसं होईल?" आकांक्षाने एका
पिशवीतून वडाच छोटं रोपट असलेली कुंडी बाहेर काढली.

"मी आलेच." आकांक्षाने पर्स ठेवली आणि हात पाय धुवून आली आणि तांब्याच्या कलशाने त्या कुंडीत थोडंसं पाणी घातलं. तसं ते रोपट टवटवीत दिसू लागलं.

"आता ह्या रोपट्यासारखाच आमचाही संसार बहरेल." आकांक्षा रोपट्याकडे बघत म्हणाली आत निघून गेली

काहीवेळाने, ती बाहेर येताच उमा बाई तिच्याकडे बघतच राहिल्या. तिने त्यांनी घेतलेली साडी नसली होती आणि तिच्या हातात पूजेचं ताट होतं.

आकांक्षाने वडाची पूजा केली आणि पहिलं वान आदित्यला देऊन त्याच्या पाया पडली. दुसर वान आदित्यच्या बाबांच्या फोटोपाशी ठेवलं आणि त्यांच्याही पाया पडली आणि मग उमा काकूंच्या हातात वान देऊन त्यांच्या पाया पडणार तेवढ्यात, त्यांनी तिला अडवलं आणि मिठीत घेतलं आणि तिच्या ताटात बटव्यातले हजार रूपये घातले.

"आदित्य, पहिली वटपौर्णिमा आहे. बायकोच गिफ्ट कुठे आहे?" उमा बाई

तेवढ्यात, त्याचा फोन वाजला. काहीवेळ बोलून त्याने फोन ठेवला. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता तर डोळे पाणावले होते.

"काय रे कोणाचा फोन होता?" उमा बाई

आकांक्षाने सुद्धा नजरेनेच विचारलं

"आठवड्या भरापूर्वी मी एका वेब साईटवर एका हॉटेलची बातमी वाचलेली. त्यांच्या हॉटेलमध्ये न्यू शेफ हवे आहेत. मी दुसऱ्याच दिवशी शेफच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू दिलेला तिथूनच फोन होता. त्यांनी उद्यापासूनच मला बोलवलं आहे. आधी सहा महिने ट्रेनिंग असेल आणि त्यानंतर मेन किचनमध्ये एन्ट्री." आदित्य बोलला

"काँग्रॅज्युलेशन्स दादा!" अचानकपणे आलेल्या आवाजाने सगळे दरवाजाकडे बघू लागले. अश्विनी आणि तिचा नवरा अवधूत उभे होते. अश्विनीने आदित्यला मिठी मारली तर आकांक्षा दोघांसाठी पाणी घेऊन आली.

"अश्विनी, जवाईबापू या ना." उमा बाई

अश्विनीने एक वान देवापुढे आणि एक वान बाबांच्या फोटोपुढे ठेवलं आणि नमस्कार केला. नंतर उमा बाईंना वान देऊन त्यांच्याही पाया पडली आणि नवऱ्याने दिलेला चांदीचा छल्ला उमा बाईंना दाखवला.

नंतर आदित्यला वान देतं त्याच्या पाया पडायला वाकली पण आदित्यने तिला मिठीत घेतलं.

"दादा, मी आज खूप खूष आहे तुझ्यासाठी. फायनली तुझं स्वप्न पूर्ण होतंय. तू हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत असताना अचानक बाबा गेल्यामुळे घराची आर्थिक जबाबदारी तुझ्यावर पडली आणि ती जबाबदारी तुझं कर्तव्य म्हणून तू निस्वार्थपणे पार पाडलीस. अगदी स्वतःची आवड बाजूला ठेवून. माझं शिक्षण थांबू नये म्हणून तू तुझं शिक्षण थांबवून नोकरी करत होतास पण तू तुझी आवड जपावी हे देवाच्या मनात होतं म्हणून त्याने हे सगळं घडवून आणलं आणि तुला मार्ग दाखवला माझ्या वहिनीने. थँक्यू वहिनी!" अश्विनीने पाणावलेल्या डोळ्यांनी आकांक्षाला मिठी मारली

"मग मेव्हणे साहेब वहिनींना काय गिफ्ट दिलं?" अवधूतने विचारलं

"माझं गिफ्ट मला मगाशी आलेल्या कॉलमधूनच मिळालं." आकांक्षा आदित्यकडे बघत कौतुकाने म्हणाली.

"ओ.. हो.. आदित्य लकी आहेस बाबा!" अवधूत बिचारा चेहरा करत म्हणाला. त्यावर अश्विनी बारीक डोळे करत त्याच्याकडे बघू लागली

तसे सगळे हसू लागले.

"अश्विनी ताई आणि भाऊजी आता जेवूनच जा." आकांक्षा

"हो. आकांक्षा तुम्ही दोघं सुद्धा जेवून घ्या. आदित्यने सुद्धा सकाळपासून काहीचं खाल्ल नाहीय. तुझ्यासाठी उपवास धरलाय त्याने." उमा बाई हसतच म्हणाल्या

"अरे व्वा! लकी आहे बाबा माझी वहिनी." अश्विनी अवधूतला खुणावत होती.

आदित्यने तिच्यासाठी उपवास धरणं. हा तिच्यासाठी सुखद धक्का होता. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. तो मात्र गालात हसत तिच्याकडे बघत होता. तिच्या ओठांवर कौतुकाच हसू होतं अन् डोळे मात्र पाणावले होते आनंदाश्रुंनी!