चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलद कथा लेखन
संघ - वनिता शिंदे
©® नम्रता जांभवडेकर
विषय - आजच्या युगातील सावित्री (भाग - १)
"या.. आलात! सकाळी बाहेर गेलेलीस ते आता उगवतेयस." उमा बाई तिरसटपणे म्हणाल्या
त्यांच्या बोलण्यावर काहीचं प्रतिसाद न देता आकांक्षा शांतपणे घरात येऊन हातातल्या पिशव्या समोरच्या टेबलावर ठेवत सोफ्यावर विसावली.
उमा बाईंचा आवाज ऐकून आदित्य बेडरूम मधून बाहेर आला आणि त्याने आकांक्षाला पाणी दिलं. बाहेरच्या गर्दीने थकलेला जीव पोटात गार पाण्याचे दोन घोट गेल्याने शांत झाला.
"हे कसले कपडे आहेत? आणि मी सांगितलेलं सामान कुठे आहे?" उमा बाईंनी पिशव्या चाळत विचारलं
"कसलं सामान?" आदित्यने विचारलं
"उद्या तुझ्या बायकोची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे. म्हणून मी तिला फोन करून वटपौर्णिमेच सामान आणायला सांगितलं होतं. तेही तुझ्या बायकोला जमलं नाहीय. खरेदी तेवढी बरोबर केली." उमा बाईंनी नेहमीप्रमाणे तोंडसुख घेतलं
"आई, मला उद्या वटपौर्णिमेची पूजा करायला जमणार नाहीय म्हणून मी सामान आणलं नाहीय आणि हे कपडे माझ्या कामाचे आहेत." शेवटी आकांक्षा बोललीच.
"कामाचे.. कसल्या कामाचे?" उमा बाईंनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं
तसं आकांक्षाने एक नजर आदित्यकडे पाहिलं. तो नजरेनेच तिला "सांग" असं खुणावत इशारा होता.
"आई, गेल्या महिन्यात मी एका कंपनीत इंटरव्ह्यू दिला होता. माझ्या कामाचा एक्सपेरियन्स आणि पद्धत बघून त्यांनी मला आज सकाळीच ऑफिसमध्ये बोलवून अपॉईटमेंट लेटर दिलं आणि उद्यापासून जॉईन व्हायला सांगितलं. त्याच मी खरेदीला गेलेले." आकांक्षा
"असं मध्येचं नोकरीच खुळ कुठून आलं तुझ्या डोक्यात आणि आदित्यची नोकरी आहे ना. त्याचा पगार पुरतो आपल्या घरात. तुझ्या पगाराची काही गरज नाही आपल्याला. ते काही नाही. तू राजीनामा देऊन टाक." उमा बाई त्यांचा निर्णय सांगून मोकळ्या झाल्या
त्यावर आदित्य काही बोलणार तेवढ्यात,
"आई, मला उद्या लवकर ऑफिसला जायचंय. मी जेवणाच बघते." आकांक्षा
"जेवण तयार आहे. तू फ्रेश होऊन ये. तोपर्यंत मी पानं घेतो." आदित्य किचनमध्ये तर आकांक्षा रूममध्ये निघून गेली
तशा उमा बाई नाक मुरडतच जेवणाच्या टेबलावर जाऊन बसल्या. जेवणाच्या टेबलावरही सगळे शांतपणे जेवत होते.
*****
"तू आईला मला खर का सांगू दिलं नाहीस. का थांबवलंस मला?" झोपेच्या वेळी आदित्यने विचारलं
"तू आईंना खर सांगितलं असतं तर काय निष्पन्न झालं असतं. आधीच त्या माझ्या पुन्हा नोकरी करण्यामुळे नाराज झाल्या आहेत. त्यात ही गोष्ट सांगितली तर त्यांना वाईट वाटेल. योग्य वेळ आल्यावर सांगू आपण त्यांना." आकांक्षाने बोलतच बेडवर पाठ टेकली. दिवसभराच्या थकव्याने ती लवकरच झोपी गेली पण आदित्यला काही झोप लागेना. त्यामुळे तो बाजूच्या टेबलावरचा लॅपटॉप घेऊन समोरच्या सोफ्यावर बसून त्यात काहीतरी करत बसला. बऱ्याच वेळाने त्याला झोप लागली.
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजल्या बरोबर आकांक्षाला जाग आली. तशी ती अंघोळ आवरून बाहेर आली.
आज ऑफीसला जायचं असल्याने नेहमीपेक्षा लवकर लवकर उठली होती ती. लग्नाआधी ती ऑफीसला जायची पण लग्नानंतर, 'आदित्य चांगला कमवतो. तू सुद्धा ऑफीसला गेलीस तर घरातलं कोण बघेल? अश्विनीला अभ्यासात मदत कोण करेल? आणि मलाही एकुलत्या एक सुनेचे लाड करायचेत.' हे कारण पुढे करून उमा बाईंनी तिला तिची नोकरी सोडायला लावली होती. तिनेही सासूबाईंच्या आग्रहाखातर आदित्य नको म्हणत असतानाही नोकरीला हसत हसत राजीनामा दिला होता पण आजची परिस्थिती वेगळी होती.
ती देवघरात गेली. उमा बाई देवघरात हातात माळ जपत मंत्र पुटपुटत होत्या. तिने देवाला नमस्कार केला आणि किचनकडे वळली. नाश्त्याची तयारी केली आणि पुन्हा आवरायला बेडरूममध्ये निघून गेली.
"अश्विनी, किती सुंदर दिसतेयस ग तू ह्या साडीमध्ये." उमा बाई व्हिडिओ कॉलवर स्वतःच्या लेकीला पाहत म्हणाल्या
"थँक्यू आई. अग सासूबाईंनी खास वटपौर्णिमेनिमित्त घेतलीय मला ही साडी. माझी लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा ना. आई तू पण वहिनीला साडी घेतलेलीस ना वट पौर्णिमेसाठी. नेसली वहिनीने? दाखव ना.." अश्विनी उत्साहाने विचारलं
तेवढ्यात, समोरून उमा बाईंना आकांक्षाची चाहूल लागली.
"माझं कुठे एवढं नशीब की माझी सून मी दिलेली साडी नेसून वट पौर्णिमेची पूजा करेल." उमा बाई तिरप्या नजरेने आकांक्षाकडे पाहत म्हणाल्या
"का ग? काय झालं? वहिनीने दुसरी साडी नेसली का?" अश्विनी
"तेही एकवेळ चाललं असतं ग पण साधं पूजा करणं सोडा. इथे माणस शर्ट पँट घालून ऑफीसला चाललेत." उमा बाईंनी त्यातल्या त्यात टोमणा मारलाच.
"आई, काय बोलतेस तू. मला समजेल असं बोलशील का?" अश्विनी
"तुझी वहिनी आजपासून ऑफिसला जाणार आहे." उमा बाई आश्चर्याने म्हणाल्या
"आई, ती लग्नाआधी सुद्धा ऑफीसला जायची पण तुझ्या आग्रहाखातरच तिने जॉब सोडला होता. त्यात एवढं आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काय आहे." अश्विनी उमा बाईंना आठवून करत देतं म्हणते
"अग हो पण आता काहीचं गरज नसताना जॉब कशाला करायचाय हिला. काल अचानक मला म्हणाली, मला जॉब लागलाय आणि उद्यापासून ऑफीसला जायचंय." उमा बाई
"दादाचं काय म्हणणं आहे ह्यावर?" अश्विनी
"तो काहीच बोलला नाही. त्याला सुद्धा माहिती असावं बहुतेक पण मला सांगणं दोघांनाही गरजेचं वाटलं नाही. आधी आदित्य सगळ्या गोष्टी मला सांगायचा पण बायको आली अन् सार बदललं." उमा बाईंनी मनातली नाराजी बोलून दाखवली
टेबलावर नाश्ता मांडताना आकांक्षा सगळं ऐकत होती पण त्यावर प्रत्युत्तर देण्यापेक्षा तिला आणखीही महत्वाची काम असल्याने ती शांत होती.
"तसचं काही कारण असेल म्हणून नसेल सांगितलं. बाकी काही असूदे. वहिनीने पुन्हा जॉब जॉईन केला हे ऐकून फार छान वाटलं. बर चल, मी करते परत तुला फोन." असं म्हणत अश्विनीने फोन ठेवून दिला. अश्विनीच्या तोंडून आपल्या विषयी कौतुक ऐकून आकांक्षाला दिलासा मिळाला.
तितक्यात आदित्यही त्याचं आवरून बाहेर आला. आकांक्षाने आदित्य आणि उमा बाईंना नाश्ता वाढला.
"आकांक्षा, तू पण बस ना." आदित्य
"अरे नको. ऑफिसचा पहिलाच दिवस आहे. उशीर नको व्हायला." असं म्हणत आकांक्षा किचनमध्ये गेली आणि तोंडात साखर टाकत पुन्हा बाहेर येतं दोघांचा निरोप घेऊन निघूनही गेली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा