आजीची पैठणी अंतिम भाग

एका आईला समजून घेणारी गोष्ट.

आजीची पैठणी अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले की अनघाने समजवल्यावर नित्या आणि देवांश दोघेही आजीचा स्वाभिमान जपायचे ठरवतात. त्यामध्ये सगळ्या भावंडांना सहभागी करून घ्यायचे ठरते. त्यात एनजीओ मार्फत आलेली अनघाची मैत्रीण आजीच्या मैत्रिणीची नात असते. आता ही नातवंडे आजीचा स्वाभिमान कसा जपतात पाहूया.


अनघा आणि देवांश दोघे मिळून सगळया भावंडांना फोन केले. आजवर आपले लाड करणारी आजी आणि आपण आजीला तिच्या परिस्थितीला कसे गृहीत धरत गेलो हे आठवून सगळ्यांना खूप वाईट वाटले. सर्वांनी एक ऑनलाईन मीटिंग घेतली.

"नमस्कार मी अनघा,तुमच्या म्हणजे आपल्या घरात लवकरच मी तुमची वहिनी म्हणून येणार आहे."

त्यानंतर पुढची सगळी योजना तिने सगळ्या भावंडांना समजावून सांगितली.


सोहम,स्नेहा तसेच जय आणि विजय चौघेही सगळे ऐकून आनंदी झाले.

"दाद्या यार,आपण आजीला इतकं कसं गृहीत धरत गेलो?"
जयचा आवाज भरून आला.

"अरे, देर आए दुरुस्त आए. आता आपण आजीला निदान काही आनंदी क्षण देऊ शकतो."
सोहम बोलला.

तेवढ्यात स्नेहा जॉईन झाली. सगळ्या भावंडात ती मोठी होती. अमेरिकेत मेडिकलचे शिक्षण तिने नुकतेच पूर्ण केले होते.

"किती योग्य वेळेत विषय काढला अनघा. देवांश,मागे तू विचारले होतेस की अमेरिकेत डॉक्टर झालीस मग भारतात प्रॅक्टिस करायची परीक्षा का दिलीस?

तर आता त्याचे उत्तर देते. आजीचा सहवास सर्वात जास्त मला मिळाला आहे. मी तिथे माझे संशोधन केंद्र सुरू करणार आहे."
स्नेहा थांबली.

सगळी भावंडे प्रचंड आनंदी होती. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला आलेली रक्कम जमा केली आणि मग आजीच्या घराचाआणि वाडीचा कायापालट झाला. सोबत स्नेहाच्या सल्ल्याने काही बांधकाम सुद्धा सुरू होते.


दुसरीकडे जोमाने लग्नाची तयारी चालू होती. देवांशच्या आईने आपल्या दादाला आग्रह करून अमेरिकेतून बोलावले. तसेच बहिणीला काही दिवस राहायला बोलवले. नित्या आणि देवांश गुपचूप आजीच्या प्रोजेक्टचे काम पूर्ण करत होते.

लवकरच आजीच्या पर्यटक निवासाचे काम पूर्ण झाले. आजीने आपल्याच गावातील गरजू महिला मदतीला घेतल्या. घरचे जेवण,आदरातिथ्य आणि आपुलकी ह्यामुळे आजीचा बिझनेस लवकरच छान चालू लागला.

आता लग्नाला महिना राहिला होता. भाऊ आणि बहीण येणार म्हणून देवांशची आई आनंदी होती. मामा आणि मावशी सोबत ह्यावेळी त्यांची चारही मुले आली होती.

"हे काय मावशी,आजीला नाही. बोलावले का?"
स्नेहा घरात येतानाच म्हणाली.

"अग आता तिला कुठे? एकतर तिचे ते साधे कपडे,गबाळेपणा पाहून पाहुणे काय म्हणतील?"

मामी स्नेहाला हळूच म्हणाली.

"दादा,आपण जाऊन यायचं का आजीकडे?" जय पटकन बोलून गेला.

"कशाला? तिकडे कोकणात किती धूळ,खराब रस्ते." मावशीने नकार दिला.
सगळी भावंडे गप्प बसली.

दुसऱ्या दिवशी खरेदिला जायचे होते. स्नेहा,नित्या आणि अनघा तिघी आपल्या आयांसोबत खरेदीला बाहेर पडल्या. अनघाने हळूच विषय काढला.

"आई,तुझे लग्न ठरले तेव्हा आजीसोबत खरेदी केलीस असशील ना तू?"
अनघाने मुद्दाम हा प्रश्न विचारला.

"अग माझे बाबा साधे कारकून. गरीब होती परिस्तिथी. आई माझ्या लग्नात तिची जुनी साडी नेसली. खूप वाईट वाटलेले.

पण लग्न झाल्यावर शिवणकाम सुरू केलं. त्या बचतीमधून माझ्या पैशांनी आईला सुंदर पैठणी घेतली."

अनघाच्या आईच्या डोळ्यात पाणी होते. अनघा हळूच तिच्या सासूबाई आणि त्यांच्या भावंडांकडे पहात होती.

देवांशची आई क्षणभर शांत झाली. तेवढ्यात खरेदीची गडबड सुरू झाली. खरेदी आटोपून सगळे घरी आले. मुले बाहेर फिरायला गेली. घरात आता फक्त मागची पिढी होती.

"दादा,तुला आठवत! तुझ्या लग्नात आईला एक साडी आवडली होती."
देवांशची आई बोलली.

"हो, डाळिंबी रंगाची पैठणी. पण काकू लगेच म्हणाली,"अंथरूण पाहून पाय पसरावेत."
मावशीच्या डोळ्यात सांगताना पाणी आले.

"आपण कधीच आईला काय आवडत असेल? याचा विचार केला नाही. तुला आठवते ताई,आईकडे मोजक्याच दोन साड्या असतं. ती बिचारी कुठेही त्याच साड्या नेसायची."
मामा डोळ्यात पाणी येऊन बोलले.


"माफ करा,मी मध्ये बोलते. पण त्यानंतर आपल्या आईला काही घ्यावे,तिची हौस पुरवावी असे तुम्हाला वाटले नाही?"
अनघा आता येत बोलली.

तिघेही गप्प झाले.

"पोरी,आज तू आमचे डोळे उघडलेस. आपली आई काय आहे त्यात आनंदी. असाच विचार करत राहिलो. ती त्या वाडीत कसे रहात असेल? स्वतः ला कसे जपत असेल याचा विचारच केला नाही."

अनघाच्या सासूबाई भरल्या डोळ्यांनी बोलत होत्या.

"दादा,चल आत्ताच्या आत्ता बाजारात. आईला आवडली अगदी तश्शी पैठणी तिला घेऊ."
मावशी रडत बोलत होती.

तेवढ्यात सगळी मुले आत आली.

"मावशी,तुमचं काम तुमच्या सुनेने आधीच केलेय बरं."
असे म्हणून देवांशने व्हिडिओ कॉल लावला.

"अग,मला मेलीला कशाला पाठवली एवढी महाग साडी? आधीच ह्या पोरांनी इथे काय काय केलं आहे." आजी तिकडून बोलत होती.

पण ते बोलताना आपल्या मुलींनी आपली छोटीशी इच्छा उशिरा का होईना जाणली ह्याचा आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता.


फोन संपला. तिघा भावंडांना अनघा आणि देवांश दोघांनी सगळे काही सांगितले.

"पोरांनो,तयारी करा. आपण आजच रात्री घरी जायला निघतो आहोत."

तिनही भावंडे एका सुरात म्हणाली. आज एका आईला तिचा स्वाभिमान आणि आनंद पुन्हा परत मिळाला होता. अनघा दूर उभी राहून तिचे आनंदी सासर पहात होती.


आई! सर्वाधिक गृहीत धरली जाते. तिच्या छोट्या छोट्या इच्छा ती सहज मागे टाकत जाते. मग आईला काहीही चालते असे तिची पोटची मुलेही समजायला लागतात. पण तिच्या छोट्या अपूर्ण इच्छा शक्य झाल्या तर नक्की पूर्ण करा. एवढेच ह्या कथेच्या निमित्त सांगणे.