आजी

This is poem about our childhood friend-" grandmother"

पूर्वी घराघरांत एक आजी असायची...
जरासं दुखलं खुपल  नातवंडांना तरी 
डोळ्यात पाणी येणारी...
जाड भिंगाच्या चष्म्यातून प्रेमाने पाहणारी...!!

बाबा ओरडले की तू लहान होतास तेव्हा हेच करत होतास म्हणून पाठिशी घालणारी...
पण त्या चुका प्रेमाने सुधारून घेणारी...
संध्याकाळी शुभंकरोती शिकवणारी...!!

आई-बाबांपेक्षा कांकणभर जास्त प्रेम करणारी..
पूर्वी घराघरांत एक आजी असायची...
आजी तुझ्या हातावर इतक्या सुरकुत्या कश्या??
म्हटल्यावर गोड हसून पापा घेणारी...!!

कधी आपल्या वयाची होऊन भातुकलीचा डाव खेळणारी...
बाहुलाबाहुलीच्या लग्नात अन्तरपट धरणारी
परिक्षेला जाताना हातावर दही देणारी...
पूर्वी घराघरांत एक आजी असायची
पांढऱ्या मऊ केसांची....!!

झोपताना परीच्या गोष्टी सांगणारी...
पण खरतर आपल्या बालवयातली तीच असते सोनपरी...
रडवेल्या चेहऱ्यावर क्षणात हसू आणणारी...!!

अशी आजी एक दिवस न सांगता जाते कुठेतरी..
विचारलं तर सगळे सांगतात आजी गेली देवाघरी....
ती जाते...
पण मनात एक आजी नेहमी असते...
हाक मारली की ओ देणारी...!!!!!!
नात्याचा गुंता अलगद सोडवणारी..!!