अकल्पिता भाग अंतिम

कुटुंबासाठी धडपडणाऱ्या स्त्रीची गोष्ट

अकल्पिताने आता माहेरची चौकशी करणे जवळ जवळ बंदच केले. रचनाला तिची अनुपस्थिती जाणवत होती.

"अहो, मी काय म्हणते..पैसे संपत आले आहेत. थोडे ताईंकडे मागता का? मला तर वाटतं सासरी जाऊन ताई पूर्णपणे बदलल्या आहेत. दोन महिन्या पाठीमागे थोडे पैसे हातावर काय टेकवले आणि पुन्हा आपल्या भावाची चौकशी देखील केली नाही. त्याच्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे, हे त्यांना माहिती नाही की काय?"

यावर नचिकेत काहीच बोलला नाही.

"अजून किती अपेक्षा कराल ताईकडून? वहिनी, तुला पैसेच हवे आहेत ना? मग हा चेक घे आणि हवी तेवढी रक्कम भर यावर. मी सही करते." आरोही घरात येत म्हणाली.

"नको गं. पैसे नकोत मला. यांच्या नोकरीच काही होत नाही तोवर हे असंच चालायचं." रचना सांभाळून घेत म्हणाली.

"मग तुला हात -पाय दिले आहेत ना देवाने? त्याचा वापर कर. स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न कर. आज दादाला नोकरी मिळत नाही. मग तू हे घर सावरण्याचा प्रयत्न का करत नाहीस?
आम्ही दोघी आज कमावत्या आहोत. स्वतःच्या हक्काचे पैसे आमच्या जवळ आहेत. देव न करो. पण उद्या 'तशी' वेळ आली तर कोणाकडे हात- पाय पसरण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. याची खात्री आहे मला."

"धाकट्या वन्स, तोंड सांभाळून बोला. आता तुमच्या ताईने हात वर केले. त्या इकडची चौकशी देखील करत नाहीत. लग्न काय झालं नि त्यांचा स्वभाव पूर्णपणे बदलला."

"ते साहजिकच आहे. जसा माझा स्वभाव बदलला तसा ताईचाही बदलणारच. आणखी किती दिवस तिने तुम्हाला सांभाळायचं? स्वाभिमान नावाची गोष्ट तुमच्याजवळ नाहीच मुळी!"

शब्दाला शब्द वाढत गेला नि आरोही आणि रचनामध्ये मोठा वाद झाला. या वादाचा परिणाम असा झाला की, रचनाने अकल्पिता आणि आरोही या दोघींना माहेरी येण्यास बंदी घातली.

"वन्स, आता तुम्ही इथे येण्याचा प्रश्नच येत नाही. हे घर फक्त माझं आहे. इथली कुठलीच जबाबदारी तुम्हाला घ्यायची नसेल तर पुन्हा इथे पाऊल टाकायचं नाही. हवं तर बाबांना सोबत घेऊन गेलात तरी चालेल."
हे ऐकून आरोहीने मागचा -पुढचा कुठलाही विचार न करता बाबांना आपल्या सोबत घरी नेले.

नचिकेतच्या माघारी झालेल्या या वादाचा परिणाम त्याच्यावर झाला नसता तर नवलच! तो बाबांना आणायला आरोहीच्या घरी गेला. त्याने आरोही आणि अकल्पिताची माफी देखील मागितली. मात्र आरोहीने बाबांनी घरी जायला नकार दिला.

घरी येऊन नचिकेतने रचनाला चांगलेच धारेवर धरले.
"आजवर मी तुझा सगळं काही ऐकून घेतलं. पण आता नाही. तुला या घरात राहायचे असेल तर घराबाहेर पडून काहीतरी कामधंदा करावाच लागेल. संसार दोघांनी सावरायचा असतो. ते फक्त पुरुषाचे काम नाही. बायकोनेही त्याला साथ द्यावी लागते.स्वतःची जबाबदारी ओळखायला शिक.
इथे राहायचं असेल तर माझ्या बहिणींची आणि बाबांची माफी मागावी लागेल. नाहीतर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सताड उघडे आहेत."

आपल्या नवऱ्याचा हा नवीन अवतार पाहून रचना चांगलीच सटपटली. नचिकेतची माफी मागू लागली.

"माझी माफी मागून काही उपयोग नाही. आधी ताईची माफी माग. या घरासाठी तिने आपलं आयुष्य पणाला लावलं आणि त्या बदल्यात तिला आपल्याच माणसांकडून उपेक्षित राहावं लागलं."

रचना आणि नचिकेत अकल्पिताच्या घरी आले. "ताई, मला माफ करा. आजवर मी तुम्हाला फक्त गृहीत धरलं. त्या बदल्यात मी माझी सगळे कर्तव्य विसरले. पण आता मला माझी चूक कळली आहे. मागचं सारं विसरून तुम्ही घरी या..अगदी कधीही. आता माझ्याकडून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही."

"वहिनी, मी आईच्या जागी तुला पाहिलं होतं. पण मला ती माया तुझ्याकडून कधीच मिळाली नाही. तू फक्त आपलं कर्तव्य करत राहिलीस.

तिथे घडलेला सारा प्रकार आरोहीने माझ्या कानावर घातला. आमच्या दोघींचे हेच म्हणणे असेल, आम्ही कारणाशिवाय माहेरी फिरकणार देखील नाही आणि यायचं झालंच तर फक्त आमच्या भावासाठी येऊ.

तूच सांग, मागचं सारं विसरण इतकं सोपं असतं का? आता ते घर फक्त तुझं आहे, तुझ्या हक्काचं घर! त्या घरावर आम्हा दोघींचा काही एक हक्क नाही. आता तू तुझ्या हक्कानुसार ते घर सजवू शकतेस, तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतेस. आम्हा दोघींची लुडबुड तेथे आता कधीच व्हायची नाही."

"असे बोलू नका ताई. त्या घरावर तुमचा हक्क आधी. मग माझा हक्क. त्याच हक्काने कधीही घरी या. काय हवं ते करा. मी काही बोलणार नाही." रचना हात जोडून म्हणाली.

"आणि एक सांगायचं म्हणजे बाबा आता आम्हा दोघींकडे आळीपाळीने राहतील. दादाला त्यांची कधी आठवण आली तर तो त्यांना भेटायला येईल इथे. त्यामुळे तुला आता त्यांची अडचण होणार नाही." आरोही आत येत म्हणाली.

"नको वन्स, बाबांना आम्ही घेऊन जाऊ. ते आमच्याकडेच राहतील. हो ना बाबा?" रचनाच्या डोळ्यात आपली माणसं गमावल्याची भीती दाटून आली होती.

बाबा काहीच बोलत नाहीत हे पाहून नचिकेत पुढे आला.
"बाबा, तुम्ही तुम्हाला हवं तिथं राहा. पण मला तुम्ही कायम माझ्याजवळ हवे आहात. हे मात्र नक्की." नचिकेत बाबांच्या मिठीत शिरून ओक्साबोक्शी रडू लागला.
"मी सगळ्याच बाबतीत कमी पडलो बाबा. याची शिक्षा मला व्हायला हवी आणि हेच योग्य आहे." मनात साठवलेले सारे दुःख जणू नचिकेतच्या डोळ्यातून वाहत होते.
"पण मी जिद्द हरणार नाही. नोकरीसाठी नव्या दमाने प्रयत्न करेन. भरपूर कष्ट करेन आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरात घेऊन जाईन. मी शब्द देतो तुम्हाला."

बाबा नचिकेतच्या पाठीवरून हात फिरवत राहिले. "माझ्या हातूनही काही चुका झाल्या. त्या तू पुन्हा करू नयेस असे मला वाटते. तुमच्या आईच्या माघारी मुलांचं मन जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही.
मात्र माझ्या छकुलीच्या बाबतीत हे होता कामा नये, लक्षात ठेव. सुनबाईंना त्यांची चूक कळाली, यातच सारे आले.
अरे, म्हाताऱ्या बापाने असे मुलींच्या घरी राहणे बरे दिसते का? तेही स्वतःचे घर असताना? चला, मीही येतो घरी."
बाबा सर्वांचा निरोप घेऊन नचिकेत आणि रचनाच्या सोबत बाहेर पडले. रचनाने पुन्हा एकदा सर्वांची माफी मागितली.

अकल्पिताच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू होतं.
'जे झालं ते चूक की बरोबर? काहीतरी हरवलं होतं. पण त्यापेक्षा काहीतरी गवसल्याचा आनंद खूप मोठा होता.
सारंग म्हणतात तेच खरे, आपण आपल्या माणसांना सतत काही ना काही देत राहिलो तर त्यांना त्याची सवय होते. कधीतरी स्वतःसाठी जगून पाहा. आपल्या माणसांना धडपडण्याची संधी द्या.. त्याचा आनंद काही औरच असतो.'
अकल्पिता जाणाऱ्या नचिकेत, बाबा आणि रचनाकडे पाहत होती. साऱ्या आशा,अपेक्षा संपल्या होत्या. तिचं माहेर हरवलं होतं. पण तिची आपली माणसं तिच्या सोबत होती..अगदी कायमसाठी!


समाप्त.
©️®️✍️सायली जोशी



 

🎭 Series Post

View all