# उत्सव नात्यांचा थीमवर आधारित
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 6
दुपारची वेळ होती. ललिता धावतच बंगल्यात शिरली. सोबत सात वर्षाचा तिचा मुलगा "प्रसंग" होता. ललिता जवळच छोट्या खोलीत रहायची. ती यशच्या घरी नुकतीच कामाला लागली होती.
" माफ करा. आज उशीर झाला यायला. " ललिता हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या दादीला म्हणाली.
" असो. पटकन फरश्या पुसायला घे. उद्या लक्ष्मीपूजन आहे. खूप खोळंबा झालाय. हा कोण ?" दादीने विचारले.
" प्रसंग. माझा मुलगा. काही काम असेल तर द्या त्याला पण !" ललिता आशेने दादीकडे म्हणाली.
" अग आमच्या रौनकच्या वयाचा आहे. आम्ही काम कस लावणार ? तू तुझे काम कर. प्रसंग , तू किचनमध्ये चल. तुला खाऊ देते. " दादी प्रेमाने म्हणाली.
प्रसंग खुश झाला. एरवी रागावणारे मालक बघितलेल्या ललिताला इतके मायाळू मालक पाहून आश्चर्य वाटले. प्रसंग किचनमध्ये आला तेव्हाच रौनकपण काही कारणाने तिथे आला. पहिल्यांदाच त्याच्या वयाच्या कुणालातरी भारतात बघत होता. रौनकला डेन्मार्कचा विद्युत आठवला.
" हाय. माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार ?" रौनकने हात पुढे केला.
" हो. " प्रसंग म्हणाला.
दोघांनी हातमिळवणी केली. काही वेळेतच दोघे जुने मित्र असल्यासारखे वागू लागले. यशचे वडील मंदीरात गेले असल्याने रौनकला असेही करमत नव्हते. प्रसंगमुळे रौनकला कंपनी भेटली. रौनकचे महागडे कपडे , घड्याळ , शूज वगैरे पाहून प्रसंगला थोडा न्यूनगंड जाणवत होता. पण रौनक त्याच्याशी मनमोकळेपणाने वागत होता. तो त्याला स्वतःच्या खोलीत घेऊन गेला. दोघे व्हिडीओ गेम खेळू लागले.
" तू किती नशीबवान आहेस. तुला इतकी मोठी खोली. इतके गेम्स. इतके कपडे. इतक्या खेळण्या. " प्रसंग रौनकला म्हणाला.
" का ? तुझे घर खूप छोटे आहे का ?" रौनकने कुतूहलाने विचारले.
" छोटे ? या खोलीच्या अर्धेही नसेल. आणि जेवायला पण नुसते डाळ भात. " प्रसंग लटक्या सुरात म्हणाला.
" डोन्ट वरी. आता आपण फ्रेंड्स बनलोत ना. तर मी तुला रोज नवीन गेम्स आणि टॉयज देत जाईल. माझ्या बाबांनी मला कृष्णा-सुदामाची स्टोरी सांगितली होती. त्यात कृष्णा सुदामाला बिग हाऊस देतो. मी कृष्णा आणि तू सुदामा. " रौनक म्हणाला.
" काय करतात तुझे बाबा ?" प्रसंगने विचारले.
" डेन्मार्कला मोठी कंपनी आहे आमची. " रौनक अभिमानाने म्हणाला.
" प्रसंग. " खालून आवाज आला.
आईचा आवाज ओळखून प्रसंग लगेच खाली धावला. रौनकपण पाठीमागे गेला.
" घरी पैशाचे पाकीट विसरले मी. तुझे बाबा परत ते पैसे दारूत उडवतील याआधीच जाऊन घेऊन ये. " ललिता कळवळीने म्हणाली.
" बर जातो. " प्रसंग म्हणाला.
" मी पण येऊ सोबत ? मला पण तुझे घर दाखव. " रौनक म्हणाला.
मी आणि यश एक ऑनलाइन मिटिंग संपवून खाली येत होतो. आम्ही हे संवाद ऐकले.
" नको रौनक. तू घरीच बस. " मी म्हणालो.
" पार्थ , जाऊदे ना त्याला त्याच्या मित्राच्या घरी. असे पण पप्पा मंदिरात गेलेत. त्याला करमत नाहीये. " यश म्हणाला.
माझ्या मनात एक भीती दडलेली होती पण यशला ती कळली नाही आणि सर्वासमोर मी बोलूही शकलो नाही.
" थांब , मी अद्वैतला बोलवतो. तो सोबत येईल. " मी म्हणलो.
अद्वैत , रौनक आणि प्रसंग कारने तिकडे गेले. प्रसंगच्या गल्लीत जेव्हा पांढरीशुभ्र मोठी कार थांबली तेव्हा गल्लीचे मुले क्षणभरातच त्या कारभोवताली जमा झाली. प्रसंगची छाती तर अभिमानाने फुलून आली. आज त्याची गल्लीत वेगळीच हवा झाली होती. प्रसंगने त्याचे घर रौनकला दाखवले. दोन खोलीचे असे ते छोटेसे जुने घर होते.
" कसे वाटले आमचे घर ?" प्रसंग म्हणाला.
" खूप छान आहे. " रौनक स्माईल देत म्हणाला.
" खोट बोलतोय ना. मी गरीब आहे मित्रा. माझे घर तुझ्याइतके मोठे नाही. " प्रसंग उतरलेला चेहरा करून , मान खाली टाकत म्हणाला.
" माझे पप्पा म्हणतात की घर नाही मन मोठे पाहिजे." रौनक प्रसंगच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
" जायचे का रौनक ?" अद्वैतने विचारले.
" हा. " रौनक म्हणाला.
पण तेव्हाच दारात प्रसंगचे मित्र गोळा झाले. अद्वैतला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला त्यामुळे तो तात्काळ घराबाहेर गेला. प्रसंगच्या मित्राला रौनकची वेशभूषा पाहूनच तो श्रीमंत घरचा असल्याचे कळून चुकले.
" प्रसंग , कोण आहे हा ? मोठ्या घरचा वाटतो !" एकजण म्हणाला.
" हा माझा नवीन मित्र रौनक. डेडे कसल्यातरी देशातून आलाय. " प्रसंग म्हणतो.
रौनकला हलकेसे हसू आले.
" डेन्मार्क ब्रो. हॅलो एव्हरीवन. " रौनक सर्वाना म्हणतो.
" काय करतात तुझे आईवडील ?" एकजण विचारतो.
" माझे पप्पा आणि बाबा डेन्मार्कमध्ये बिजनेस करतात. " रौनक म्हणाला.
" पप्पा आणि बाबा म्हणजे ?" एकजण म्हणतो.
" माझे पॅरेंटस गे कपल आहेत. म्हणून मला आई नाही. " रौनक आत्मविश्वासाने म्हणाला.
एक अद्वैतहून थोडा वयाने मोठा मुलगा ज्याचे नाव कौतुक होते तो तिथून मित्रांसह सिगरेट ओढत जात होता. त्याच्या कानावर हा शब्द पडला. तो लगेच प्रसंगच्या घराकडे वळला. तो येताच त्याच्या दहशतीमुळे बाकीचे मुले बाजूला हटली. तो रौनकसमोर गुडघे टेकून बसला.
" काय तुझे पॅरेट्स गे आहेत ?" कौतुक म्हणाला.
" हो. " रौनक म्हणाला.
" आबे हे छक्क्याचा पोरगा आहे. हा पण मोठेपणी छक्काच बनेल. हे घे दहा रुपये आणि स्वतःच्या बापाला दे. " कौतुक कुत्सितपणे टाळी वाजवत म्हणाला.
बाकीचे सर्वजण हसू लागले.
" छक्क्याचा मुलगा !" असे म्हणून सर्वजण चिडवू लागले. रौनकचे डोळे अश्रूंनी भरून आले. तो त्या घोळक्यातून वाट काढत त्याच्या कारमध्ये जाऊन बसला. तो जाताच मुले चिडवायची शांत झाली. अद्वैत रेंज येत नव्हती म्हणून थोडा दूर उभा होता. रौनक कारमध्ये बसून रडू लागला. प्रसंग अद्वैतकडे गेला आणि त्याने सारी हकीकत सांगितली. अद्वैत धावत कारपाशी गेला आणि तो कारमध्ये रौनकच्या बाजूला जाऊन बसला. त्याला पाहताच रौनक त्याला बिलगून रडू लागला.
" डुग्गू , तू स्ट्रॉंग बॉय आहेस ना. रडायचे नाही. लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. " अद्वैत रौनकचे अश्रू पुसत म्हणाला.
" छक्का म्हणजे काय असते ?" रौनकने रडतच विचारले.
" काही नाही. तू चॉकलेट आईस्क्रीम खाणार का ?" अद्वैतने प्रेमाने विचारले.
" नाही घरी चल !" रौनक रडत म्हणाला.
मग तिघेही परत घरी आले. रौनकने घरी येताच धावत जाऊन स्वतःला रूममध्ये कोंडवून घेतले. ते शब्द त्याच्या कानात घुमत होते. अद्वैतने घरी सर्वाना घडलेली हकीकत सांगितली.
" तुला कळत नाही का ? रौनकच्या जवळ रहायचे सोडून गर्लफ्रेंडला बोलत बसलास. " निवूदी रागाने ओरडली.
" त्याची काय चूक ? आपलेच चुकले रौनकला बाहेर पाठव. यश , तुला मी नको म्हणलो होतो ना. पण तू ऐकला नाही. रौनक माझ्या मित्राचा मुलगा आहे. त्याच्या डोळ्यात माझ्यामुळे एकही अश्रू आलेला मला चालणार नाही. " मी यशला म्हणालो.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा