Login

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 8

समलैंगिक प्रेमकथा

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 8

दुसऱ्या दिवशी अभ्यंगस्नान होते. पहाटे चार वाजता रौनकने आमच्या बेडरूमचे दार आपटले.

" उठा उठा दिवाळी आली , मोती साबणाची वेळ झाली !" रौनक बाहेरून म्हणाला.

नक्कीच त्याच्या पुणेरी आजीने म्हणजे माझ्या आईने त्याला शिकवले असणार. सर्वांचेच दरवाजे आपटल्यानंतर साहेब हॉलमध्ये परतले. त्याची परदादी आणि आजी तिथे तयारी करत होत्या. चार पाट ठेवले होते. भोवताली रांगोळी मांडली होती. एक समयी पेटती ठेवली होती. काही वाट्यांमध्ये गरम तेल होते. त्यात कापसाचा गोळा बुडालेला होता. काही वाट्यांमध्ये आईने उटणे बनवले होते. हळूहळू घराचे सर्व सदस्य जमा झाले. पहिली आंघोळ अर्थातच रौनकची होती. तोच या दिवाळीची खरी रौनक होता. रौनकला आम्ही सर्वांनी मिळून उटणे लावले. आईने गरम गरम कापूस त्याच्या कानात टाकला. मग निवूदीने त्याला आंघोळ घातली. आंघोळ झाल्यावर प्रितीने त्याला ओवाळले. यशच्या पप्पांना दादीने उटणे लावले. यशचे पप्पा , पुष्कर , महेश जीजू , अद्वैत आणि यश यांना उटणे लावून झाले. यशला उटणे लावून झाल्यावर त्याची नजर मला शोधत होती. मी एका खोलीत लपलो होतो. कुणास ठाऊक कसे पण यश मला तिथे शोधत आला. त्याने जसा अचानक मागून माझ्या खांद्यावर हात ठेवला तसा मी दचकलो. यश शर्टलेस होता आणि त्याने टॉवेल गुंडाळले होते. त्याच्या पूर्ण देहावर उटणे लावलेले होते. उटणे लागलेला यशु खूपच क्युट दिसत होता.

" इथे काय करतोय नकटु ?" यशने विचारले.

" अरे माझे डोके दुखत आहे. " मी चेहरा पाडून म्हणालो.

" खोट बोलतोय ना. तुला उटणे नाही लावायचे ना ?" यश म्हणाला.

जगात दोनच व्यक्ती आहेत जे माझे खोटे पकडू शकतात. एक यश आणि दुसरा माझा मित्र इशांत जो या जगात नव्हता. इशांतला चॅटिंगमध्येही खोटे बोलले तरी कळायचे.

" अरे नकटु , त्यात लाजायचे काय ? थांब मीच शुभारंभ करतो. " यशने असे म्हणत खोलीचे दार लावले. मला भिंतीकडे ढकलले. दोन्ही हात माझ्या बाजूला टेकवून त्याने त्याचे गाल माझ्या गालावरून घासले.

" यश , हा रोमान्स लग्नापूर्वीच्या हळदीला करतात. " मी म्हणालो.

" नकटु , दिवाळीच्या अभ्यंगस्नानावेळी पण करतात. करत नसतील तर आजपासून करतील. " यश म्हणाला.

यशने त्याच्या बोटाला चिकटलेले थोडेसे उटणे माझ्या नाकाला लावले.

" हॅपी दिवाळी नकटु !" यश म्हणाला.

" थँक्स यशु !" मी म्हणालो.

यशच्या जबरदस्तीमुळे मी खाली आलो.

" दादा , उटणे लावलेले दिसत आहे कुणीतरी !" प्रितीने चिडवले.

सर्वजण हसले.

" आई , पटकन लाव ना उटणे. मला पण फटाके उडवायचे आहेत. " मी ओरडलो.

आईने आणि दोन बहिणींनी मला उटणे लावले. कानात गरम तेलाचे बोळे टाकले. मग मी मोती साबणाने आंघोळ केली. आईने माझे औक्षण केले. आम्ही सर्व तयार झालो. पिवळ्या कुर्त्यांत यशूच्या कपाळावर असलेले लाल टिळा शोभून दिसत होते. सर्वांनी फटाके उडवले. काही गरीब मुले दुरूनच आमचे फटाके बघत होती. रौनकने त्यांना काही फटाके वाटली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची कळी खुलली आणि आमच्या चेहऱ्यावर समाधानाची ! थोडे फटाके उडवल्यानंतर आम्ही सर्वांनी फराळ केला. दुपारी गरम गरम व्हेज पुलाव खाल्ला. संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनाची भव्य तयारी सुरू झाली. यशच्या कुटुंबाकडे लक्ष्मीची चांदीची मुर्ती होती. आम्ही सर्वजण नवीन कपडे घालून तयार झालो. मधोमध चौरंग्यावर लक्ष्मीची प्रसन्न मूर्ती होती. बाजूला गणपतीची छोटीशी मूर्ती होती. एका कलशात नारळ ठेवला होता. त्यावर लाल कुंकूने स्वस्तिक काढला होता. दोन ठिकाणी तांदूळ पसवरवून त्यात सुपाऱ्या ठेवल्या होत्या. उदबत्तीचा वास सर्वत्र घुमत होता. झेंडूच्या फुलांच्या हारांनी सारे घर सजले होते. प्रितीने खूप सुंदर रांगोळी काढली होती. त्या रांगोळीत पेटते दिवे ठेवले होते. घराबाहेर मोठा आकाशकंदील बसवला होता. दिव्यांमुळे वातावरण अधिकच मांगल्यमय झाले होते. सर्वप्रथम घरातली तिजोरी , खातेवह्यांची पूजा झाली. आईने सर्व पुरूषांना टोप्या दिल्या.

" यश आणि पार्थ , आरती करा. " दादी म्हणाली.

मग मी आणि यश पुढे आलो.

" मला पण करायची आहे. " रौनक म्हणाला.

मग आम्ही तिघांनी एकत्रच आरती हाती घेतली. रौनकला हे सर्व नवीन असल्यामुळे त्याला वेगळाच आनंद भेटत होता. मी कापूर लावला. आरती सुरू झाली. सर्व आरत्या झाल्यानंतर "घालीन लोटांगण" ही आरती सुरू झाली.

सर्वजण गोलाकार फिरले. पूजा विधिवत संपन्न झाली. बाकीच्यांनीही आरती केली. सर्वांनी देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेतले. मग आम्ही बाहेर फटाके उडवायला गेलो. रौनक फटाके उडवण्यात आणि प्रीती सेल्फी काढण्यात व्यस्त झाली. मला रॉकेट उडवायचे होते. वातीला उदबत्ती टेकवायचो तर एकदोन ठिणग्या उडायच्या. मी मागे हटलो की लगेच विझायच्या.

" दादा , किती वेळ ? आमची बारी कधी येईल असे केले तर ?" प्रीती ओरडली.

कुणीतरी मागून येऊन माझा हात पकडला. तो उबदार स्पर्श माझ्या यशूचा होता.

" घाबरू नको. मी आहे सोबत !" यश म्हणाला.

" असाच रहा कायम सोबत !" मी मनोमन म्हणालो.

यशने माझा थरथरणारा हात पकडून उदबत्ती वातीवर ठेवली. ती वात पेटली. आम्ही मागे हटलो. धूमकेतूप्रमाणे एक ठिणग्यांची ओळ आकाशाकडे झेपावली. नभाकडे जाऊन ती ज्वाला जणू नभाचीच झाली. पावसात मोराने पिसारा फुलवावा तसा त्या धूमकेतूतून चमकणाऱ्या ठिणग्यांचा सुंदर पसारा सर्वत्र विखुरला गेला. यशने माझा हात हातात घेतला आणि दोघांच्या नजरा नभाकडे गेल्या. काही क्षण का होईना पण नभ सुंदररीत्या चमचमत होते. त्याला सोनेरी झालर चढली होती. चित्रकाराने सुंदर रंग पांढऱ्या कागदावर टाकावे तसे वाटले. थोड्या वेळाने तिथे ललिता प्रसंगसोबत आली. रौनक धावतच आनंदाने तिथे गेला. प्रसंग थोडा घाबरलेला होता. रौनकने हे चटकन ओळखले. ललिता दादीचे आशीर्वाद घ्यायला गेली तेव्हा रौनकने प्रसंगकडून सारेकाही वदवून घेतले.

क्रमश..
0

🎭 Series Post

View all