Login

आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 9

समलैंगिक प्रेमकथा
आली माझ्या घरी दिवाळी ! पार्ट 9

प्रसंग जे म्हणला ते ऐकून रौनक घाबरला आणि लगेच यशला जाऊन बिलगला.

" काय झाले चॅम्प ?" यशने विचारले.

" पप्पा , कौतुकदादाची हेल्प करा प्लिज !" रौनक घाबरत म्हणाला.

" तू का सांगितले रौनकबाबाला सर्व ?" ललिता प्रसंगवर रागावली.

कौतुक हा तोच मुलगा ज्याने रौनकला " छक्क्याचा मुलगा " म्हणून चिडवले होते. दुसऱ्या गॅंगच्या मुलाने त्याची बेदम मारहाण केली होती. शिवाय कुणीही जर याची मदत केली तर त्याची खैर नाही अशी चेतावणी भांडणाच्या आधीच दिली होती. प्रसंग आणि ललिता ही चेतावणी ऐकूनच लपूनछपून यशच्या घरी दिवाळी साजरी करायला आले. प्रसंगला मात्र जाणीव झाली की कदाचित कौतुक यावेळी वाचणार नाही.

" साहेब , तो कौतुक गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याची मदत करण्याची काही गरज नाही. " ललिता यशला म्हणली.

" हो दादा. हे गुंडे नंतर तुला टार्गेट करतील. " पुष्कर म्हणला.

" नको यश. उगाच लोकांच्या भानगडीत नको पडू. " यशचे वडील म्हणाले.

जवळपास सर्वानीच यशला काही न करण्याचा सल्ला दिला. मग यशने माझ्याकडे बघितले.

" तो कौतुक जर गतप्राण झाला तर त्याच्या घरी मयत उठेल. आपल्यामुळे जर कुणाचे प्राण वाचत असतील तर आपण वाचायवाला हवे. किमान माणुसकीच्या नात्याने ! आपल्या घरी दिवाळी आणि दुसऱ्याच्या घरी सुतक नको पडायला. चल यश मी पण येतो सोबत. " मी यशला म्हणालो.

" दादा , मी पण येतो !" पुष्कर म्हणाला.

" नको. तू आणि महेशजीजू घरीच थांबा. घरच्या स्त्रिया आणि रौनक घाबरला आहे. तू पोलिसांना हॉस्पिटलमध्ये पाठव. " यश सर्वांच्या चेहऱ्यावर उमटलेली चिंतेची लकेर बघून पुष्करला म्हणाला.

माझे बोलणे ऐकून यशला बरे वाटले. त्याने पटकन कार काढली. इकडे पुष्करने पोलीसांना फोन केला. आम्ही प्रसंगलाही सोबत घेतले. गल्लीत गेलो तेव्हा कौतुक सुदैवाने जीवंत होता. त्याची आई ओक्साबोक्शी रडत होती. मदतीची याचना करत होती. पण भीतीने कुणीच पुढे येईना. कुणीच त्या माऊलीच्या आर्त हाकेला "ओ" देईना. आमची कार थांबली तर तिला मुलाला वाचवायचा शेवटचा आशेचा सापडला. ती आशेने पाहू लागली. त्या माऊलीने पदर फाडून जखमी मुलाच्या कपाळाला बांधले होते. कदाचित माऊलीच्या आक्रोशामुळे आलेला यमराजही दोन पावले मागे सरला असावा. मी तो रक्ताळलेला देह पाहून घाबरलो. पण स्वतःमध्ये धीर निर्माण केला. जर त्या दिवशी माझ्या भाईलाही कुणीतरी वाचवले असते तर आज तोही जिवंत असता या विचाराने मी पुढे आलो. मी आणि यशने कौतुकला कारमध्ये बसवले. कौतुकची आई पण सोबत होती. प्रसंग तिथेच थांबला. सुदैवाने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होईपर्यंत कौतुक तग धरून होता. आम्ही वेळेत कौतुकला ऍडमिट केले.

" तुम्ही देवाप्रमाणे धावून आलात !" आमचे पाय पकडण्यासाठी ती माऊली रडतच वाकली.

आम्ही रोखले.

" प्लिज. आम्ही जे केले ते माणुसकीच्या नात्याने केले. " यश म्हणाला.

" खूप समजवले त्याला मी. गुंडगिरी नको करू. पण ऐकले नाही. त्याचा मोठा भाऊ पण असाच एका भांडणात गेला. आज दुसरा मुलगापण मरतो असे वाटले मला. " ती माऊली रडत म्हणाली.

" पोलिसात नाही गेले तेव्हा ?" मी विचारले.

" न्यायालय , पोलीस व्यवस्था गरिबांसाठी नसते साहेब. आम्हाला न्याय परवडत नाही. आणि आधीच सेटिंग होती त्यांची. खूप वर्षे झाली या गोष्टीला. धाकटा सुधरेल वाटले तरी तोही तसाच निघाला. " त्या म्हणाल्या.

लगेचच हॉस्पिटलमध्ये पोलीस आले. ते पोलीस यशच्या ओळखीचे होते. त्या पोलिसाला पाहून यशच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. एरवी लहानपणीचा मित्र भेटल्यावर कडकडीत मिठी मारून लहानपणीच्या आठवणीत रममाण झाला असता यश पण हा प्रसंग बाका होता.

" पार्थ , हा माझा शाळेचा मित्र चरणसिंग !" यश मला म्हणाला.

त्याने लगेच चरणला मिठी मारली.

" काकू , तुम्ही न घाबरता सांगा तुमच्या मुलाला कुणी मारले ?" यश म्हणाला.

कौतुकच्या आईने सर्वकाही सांगितले.

" तू टेन्शन नको घेऊ. मी सर्वाना पकडून जेलमध्ये टाकेल. दोन अधिकारी ठेवतो इथे. कौतुकच्या आईच्या जवाबावरून एफआयआर नोंदवतो. हल्ली गल्लीबोळात गुंडगिरी खूपच वाढलीय. हे छोटे गुंडेच पुढे मोठे गुन्हेगार बनतात. " चरणसिंग म्हणाला.

" अगदी बरोबर. थँक्स मित्रा. तुझ्या घरी पण दिवाळी असेल ना. " यशने विचारले.

चरणसिंग हसला.

" भाई , पोलीस सैनिक आणि डॉक्टरांच्या नशिबी होळी दसरा दिवाळी नसतात. " चरणसिंग म्हणाला.

एवढे बोलून तो पोलीस कौतुकच्या आईला घेऊन निघून गेला. आम्ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसलो. थोड्या वेळाने कौतुकची आई परत आली. आम्ही हॉस्पिटलची सर्व फिस भरली होती. त्या माऊलीला एकटे सोडणे आम्हाला कठीण जात होते. म्हणून घरी येणार नसल्याचे आम्ही कळवले. तसेच आम्ही हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून जेवण केले असे खोटेच सांगितले. शिवाय इकडे कुणीच येऊ नका असे बजावून सांगितले. रडून रडून कौतुकच्या आईचे डोळे सुजले होते.

" काकू , तुम्ही प्लिज काळजी नका घेऊ. चरण तुमच्या मुलाच्या गुन्हेगाराना पकडेल. " यश म्हणाला.

" काही जेवण कराल का ?" मी विचारले.

त्यांनी नकार दिला. मुलगा मृत्यूच्या दारात असताना कोणत्या माऊलीच्या घशाखाली घास उतरला असता ? असो. झोप येत असल्यामुळे मी आणि यश खाली चहा प्यायला गेलो. हॉस्पिटलबाहेरच कुलहडच्या चहाचे दुकान होते. ते पाहून मन प्रसन्न झाले.

" नकटु , दिल्लीत असताना तुला कुलहड किती आवडायचा आठवते का ?" यश म्हणाला.

" हो. चल पटकन. आज तर मस्त पोटभरून चहा पिणारे !" मी म्हणालो.

" पोटभरून चहा. बापरे. माझा चहाप्रेमी नवरा. " यश हसला.

आम्ही चहा घेतला.

" इथे जवळच लक्ष्मीचे मंदिर आहे. वॉक करत तिथे जाऊ. आशीर्वाद घेऊ आणि परत येऊ. मूड फ्रेश होईल. " यश म्हणाला.

आम्ही हातात गरम चहाने भरलेले कुलहडचे मटके घेत मंदिराच्या दिशेने चालू लागलो.

" यशु , लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर अशी अशुभ घटना कशी घडली ?" मी विचारले.

" नकटु , प्रत्येक अशुभ घटनेमागे ईश्वराचे काही शुभसंकेत असतात. आपल्याकडून कोणाचे तरी प्राण वाचले हे चांगले काम नाही का ? यापेक्षा चांगले काय झाले माहीती. रौनकने आपल्याला कौतुकची मदत करायला सांगितले. त्या कौतुकची मदत ज्याने त्याला हर्ट केले होते. हीच गोष्ट पालक म्हणून आपण यशस्वी ठरतोय , रौनकला एक संवेदनशील व्यक्ती बनवतोय हे सिद्ध करते. " यश म्हणाला.

लक्ष्मीचे मंदिर दृष्टीक्षेपात पडू लागले. चारपाच कुत्रे तिथे भुंकत होते. एक कुत्रा अचानक आमच्या अंगावर आला. मी घाबरलो. त्या कुत्र्याने यशचा शर्ट पकडला. मला कुणाच्यातरी रडण्याचा आवाजही ऐकू येऊ लागला.