दिवाळी जवळ येऊन ठेपली. त्यामुळे त्याची शॉपिंग , साफसफाई यामुळे वेळ भेटणार नाही म्हणून सोसायटीच्या बायका आज पाखीच्या घरी एकत्र जमल्या. पाखी चांगली सुगरण स्त्री होती. तिने सर्वांसाठी मस्तपैकी समोसे बनवले. समोसे खात बायकांच्या गप्पांचा फड रंगू लागला.
" काय मग ? यावेळी मिळूनच शॉपिंग करायची का ?" सखी म्हणाली.
" हो चालेल. एखाद्या मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करू. तेवढंच फिरणे होईल. " राखीने सहमती दर्शवली.
" मला काही हरकत नाही. फक्त जवळची डेट फिक्स करा. माझे सासुसासरे गावाहून इथं येतात. त्यामुळे ते आल्यावर मला बाहेर पडता येणार नाही. " पाखीने तिची अडचण सांगितली.
" बच्चेकंपनी तर उद्याच निघणारे फटाके विकत घ्यायला. " रेखा म्हणाली.
हे ऐकून जयाचा चेहरा हिरमुसला.
" तुम्ही कसे पाठवले मुलांना फटाके घ्यायला ? हल्ली फेसबुकवर पोस्ट नाही वाचत ? बॉलिवूड सेलेब्रिटीही या विषयावर किती जागरुक आहेत. " जया म्हणाली.
" म्हणजे ?" रेखाने विचारले.
" फटाक्यांमुळे किती प्रदूषण वाढले आहे. हल्ली ग्लोबल वॉर्मिंग किती वाढले आहे. मी तर माझ्या मुलांना चक्क नकार दिला. नकोच हवेचे प्रदूषण. " जया म्हणाली.
" जया , दिवाळीच्या चार दिवसात फटाके उडवले तर कितीसे प्रदूषण होते ग ? फक्त 6 टक्के. वर्षभर जेव्हा क्रिकेट मॅच जिंकल्यावर फटाके उडवतो तेव्हा कुणी काही बोलत नाही. युक्रेन-रशियात युद्ध चालू आहे तेव्हा त्याचे किती प्रदूषण झाले असेल. ग्लोबल वॉर्मिंग आणि वायू प्रदूषण या गंभीर समस्या आहेत हे मान्य पण त्याचे खापर फक्त दिवाळीवर फोडणे अमान्य. जेव्हा जेव्हा हिंदू सण उंबरठ्यावर येतो तेव्हा तेव्हा काही टिपून बसलेले लोक अचानक जागी होतात. त्यांना प्रदूषण दिसू लागते. संक्रांती आली की पतंग उडवू नका कारण पक्ष्यांना त्रास होतो. हा मेसेज फॉरवर्ड करून हेच लोक चिकन बिर्याणी झोमॅटोवरून ऑर्डर करतात. किती हा दुहेरीपणा ! एका तर अभिनेत्रीने मुद्दाम श्वानांच्या शेपटीला फटाके लावून व्हिडीओ बनवला दिवाळीच्या फटाक्यांविरुद्ध संदेश देण्यासाठी. म्हणजे कोर्टात तुम्ही चापट कशी मारली ते सांगण्यासाठी चारपाच चापटा मारून दाखवताय. बर एक गोष्ट समजत नाही. ही जागृती फक्त हिंदू धर्मासाठीच का? इतर धर्माचे सण असताना तर तुम्ही फक्त शुभेच्छा देतात. शुभेच्छेच्या पुढे हे करू नका , ते करू नका असे निर्बंध लावत नाहीत. मग हिंदूच्याच मनात अपराधीपणाची भावना मुद्दाम का पेरली जाते ? दिवाळीत फटाके नाही उडवले म्हणून हवा शुद्ध होईल असे नसते. त्यासाठी वर्षभर काम करावे लागेल. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर , झाडे लावणे , वायु प्रदूषण कायद्यांना पाठींबा देणे व त्यांचे पालन करणे असे अनेक उपाय आहेत. पंजाबच्या शेतात स्टबल बरनिंग होते म्हणून दिल्लीत प्रदूषण वाढते. त्यासाठी दिवाळी जबाबदार नाही. तिथे ग्रीन क्रॅकरस प्रोमोट करणे एकवेळ समजू शकतो. त्या शहराची अवस्था नाजूक आहे. पण इतर ठिकाणी का असे निर्बंध ? मुळात हिंदू लोक उत्सवप्रिय लोक आहेत. आपले प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येला परतले होते. हा आपला सण आहे आणि तो आपण साजरा करायलाच हवा. कसलेच अपराधीपण मनात न ठेवता आणि पूर्ण उत्साहात. " पाखी म्हणाली.
सर्वांनी तिचे म्हणणे पटले.
©® पार्थ धवन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा