अलिप्त

गोष्ट कौतुकाची
सवाष्ण म्हणून माईंनी पुन्हा आपल्या मैत्रिणीला फोन केला.
"जया, तू आणि तुझी सून दोघी जेवायला या उद्या."

"बरं." म्हणून जया ताईंनी फोन ठेवला आणि आपल्या सुनेकडे वळून त्या म्हणाल्या,
"आता माईला होत नाही तरीही जेवणाचा घाट कशाला घालते कोणास ठाऊक! तिचं वय आता साठीच्या आसपास आहे. कामं करायला घरी दोन मुलं, सुना, नातवंड सगळी आहेत. शिवाय वर कामाला दोन मावशाही आहेत. मग ही सगळं का अंगावर घेते? याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही."

आता काय बोलणार म्हणून उत्तरादाखल जया ताईंची सून, मुक्ता नुसतीच हसली. कारण माईंच्या दोन्ही सुना तिच्या मैत्रिणी होत्या. स्वभावाने त्या कशा आहेत, हे तिला चांगलचं माहिती होतं.
----------------------------------

दुसऱ्या दिवशी जया ताई आपल्या सूनेसह माईंच्या घरी पोहोचल्या. त्यांना आलेलं बघून माईंना कोण आनंद झाला!
"जवळ जवळ वर्षभराने भेटतो आहोत आपण. नाही म्हणायला या मुली बाहेर भेटतात. पण घरी येणं -जाणं होत नाही. बरं झालं जया, तू आलीस. माझा मान राखलास." माई म्हणाल्या.

माईंनी पट्कन दोन पानं वाढली.
"तुम्ही दोघी आधी जेवून घ्या. सवाष्णीने जेवल्याशिवाय घरच्या माणसांनी जेवायचं नाही. असा नियम आहे या घरचा."

आमटी, कोबीची भाजी, काकडीची कोशिंबीर, भजी, चटणी, चपाती, खीर असे बरेच पदार्थ माईंनी स्वतः बनवले होते.

"अगं, इतका घाट कशाला घातलास?" जया काकू पानावर बसत म्हणाल्या.

"इतक्या वर्षांची सवय अशी लगेच सुटत नाही गं." माई.

"माई, सगळे पदार्थ अगदी छान झाले आहेत. खीर आणि कोबीची भाजी उत्तम.." मलाही शिकवा हे सगळं." मुक्ता.

"हो. गं. माईच्या हातचं सगळं छान असतं. तिच्या स्वयंपाकाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे!"
हे ऐकून माईंच्या डोळ्यांत पाणी आलं.

जया काकू आणि मुक्ताचं जेवण होत आलं. तसं माईंनी आपल्या नातवंडांना जेवायला वाढलं.
"हे काय केलंय आजी? मला कोबीची भाजी नाही आवडत." माईंचा मोठा नातू, जयेश म्हणाला.

"आणि मला ही खीर.." छोटी अद्विका ओरडून म्हणाली.

"अगं, छान झाली आहे खीर. खाऊन तरी बघ. आमचा छोटा विहान सगळं खातो हं. कशाला नाही म्हणत नाही आणि पानात जे वाढेल ते सगळं व्यवस्थित खातो." मुक्ता अद्विकाला सांगू लागली.

"माई, तिला आवडत नाही तर कशाला वाढता?
आणि जयेश ती कोबीची भाजी बाजूला काढून ठेव बरं. नंतर उगीचच तुझी कटकट नको." माईंची मोठी सून खोलीतून बाहेर येत म्हणाली.

"अगं, खाऊन तर बघू दे. मुलांना पदार्थांची चव कळाली नाही तर ती मोठेपणी काहीच खात नाहीत." जया ताई मध्येच म्हणाल्या. "आत्तापासूनच सवय लागायला हवी त्यांना. माझा नातू सगळं खातो."

"तुमचा नातू असेल जगावेगळा." माईंची सून तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
"तरी मी माईंना सांगत होते, हा इतका घाट नको घालायला. आजकाल कोणी असल्या भाज्या खात नाहीत आणि हे सवाष्ण वगैरे जेवायला घालायच्या प्रथा आता जुन्या झाल्या."

"उत्तरा.." माई कितीतरी मोठ्याने ओरडल्या. तशी उत्तरा आपल्या खोलीत निघून गेली.

"मोठी सून म्हणून घरची रीतभात सांभाळणं राहिलं बाजूला. लग्न करून आली आणि घरचे सगळे नियम धाब्यावर बसवले हिने. मी पुढे होऊन काही करायला गेले, तर आजही आमच्या दोन्ही सुना नाकं मुरडतात. कुठल्याही गोष्टीचं कौतुक म्हणून नाही यांना. माझ्या सासुबाईंचा स्वभाव फार कडक असल्याने कौतुकाचा एखादा शब्द देखील त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडला नाही.
तुला तर माहितीच आहे जया, ह्यांचा स्वभाव अजिबात बोलका नाहीय. जे काही मागायचं, ते सगळं मुक्यानेच. आमच्या दोन्ही मुलांनी सुद्धा आई म्हणून माझं कधीही कौतुक केलं नाही.
नंतर सून आल्या, नातवंड झाली. पण कौतुकाचे दोन शब्द माझ्या कानावर पडलेच नाहीत. प्रत्येक बाबतीत मला गृहीत धरलं गेलं. मी वाट पाहत राहिले, जे पुढ्यात येईल ते, ते करत गेले. असं वाटतं, सगळी सुखं असूनही त्यापासून मी अलिप्त राहिले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसे निर्विकार भाव!

तुला सवाष्ण म्हणून बोलवण्याचं कारण माहिती आहे? तू माझ्या स्वयंपाकाचं जे कौतुक करतेस ते मला मनापासून आवडतं. मनाला उभारी येते. खूप आनंद होतो. असं वाटतं, याच कौतुकाच्या दोन शब्दासाठी मी आयुष्यभर धडपड केली की काय!
आणि केवळ त्यासाठीच मी तुला दरवर्षी बोलवते.
एखाद्या बाईला आणि काय हवं असतं गं? फक्त कौतुकाचे दोन शब्द तिच्यासाठी पुरेसे असतात. यामुळे तिला जगण्याचं, परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळतं."


एव्हाना दोघींचं जेवण झालं होतं. मुक्ता उठून माईंच्या जवळ आली.
"माई, कौतुक करण्याचा सगळ्यांचाच स्वभाव नसतो. ते कधी नजरेतून व्यक्त होतं. कधी चेहऱ्यावरून तर कधी देहबोलीतून. नका इतकं मनाला लावून घेऊ."

"हे बोलणं खूप सोपं असतं. पण चाळीस वर्षे संसार केल्यानंतर निदान एखाद्या वेळेस कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडली तर किती प्रोत्साहन मिळतं! हे तुम्हा आज-कालच्या मुलींना काय कळणार?" माई म्हणाल्या आणि इतका वेळ थोपवून धरलेलं डोळ्यातलं पाणी अखेर गालावर ओघळलंच. दोन्ही नातवंडे अजूनही आपल्या पलीकडे बसलेली आहेत याचं भान देखील माईंना राहिला नव्हतं.

"आजी, काय झालं?" अद्विका माईंचे डोळे इवल्याश्या हाताने पुसू लागली. "मी खीर खाल्ली नाही म्हणून तू रडतेस का? नको ना रडू. मी खाते ही खीर." अद्विकाने खिरीची वाटी तोंडाला लावली.

"माई, झाल्या गेल्या गोष्टी आता विसरून जा. या वयात समाधानाने जगता यायला हवं. सगळा कारभार सुनांवर सोपव आणि तू निवांत रहा. मुलांनी कधी सल्ला मागितला तर दे. नाही मागितला तर त्यांच्या संसारात ढवळाढवळ मुळीच करू नको आणि सारं काही तुझ्या पद्धतीप्रमाणे व्हायला हवं, असा अट्टाहास तर मुळीच नको." जया ताई समजुतीच्या स्वरात म्हणाल्या.

"मी कधीही कोणावर सक्ती केली नाही. इथून पुढेही करणार नाही. आता खऱ्या अर्थाने या साऱ्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेन."

माईंनी जया ताई आणि मुक्ताची खणा -नारळाने ओटी भरली. दोघेही जायला निघाल्या.
"माई, येत्या शाकंभरी नवरात्रात सवाष्ण म्हणून तू यायचं आहेस." जया ताई निघताना म्हणाल्या.
"हो." म्हणत माईंनी समाधानाने मान डोलावली.

इतक्यात जयेशने कोबीची भाजी संपवून आणलेले ताट माईंच्या पुढ्यात धरले. मगाशी वारंवार कौतुक हा शब्द कानावर पडल्याने तो एकदम म्हणाला, "आजी, या कोबीच्या भाजीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे." हे ऐकून माईंनी आपल्या नातवाला पोटाशी धरलं आणि त्या मनापासून हसल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून जया ताई आणि मुक्ताही त्यात सामील झाल्या नसत्या तर नवलच!

समाप्त.
©️®️सायली जोशी.
(सदर कथा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ( यू ट्यूब चॅनल) वापरण्यास परवानगी नाही.)