आम्ही जिजाऊच्या मुली अंतिम भाग
मागील भागात आपण पाहिले की गनिमी काव्याने लढू असे ठरवून गावकरी तयरीला लागले. आता पाहूया पुढे.
तुळसा आणि जना दोघी ग्रामदैवत असलेल्या शिरकाईच्या देवळात गेल्या.
तिथे देवीची ओटी भरताना तुळसा म्हणाली,"आई,आता तूच पाठीराखी हायेस बग. सत्वाला जाग आन गावाला जप."
सगळ्यांनी आपापल्या जागा धरल्या.
इकडे सुभेदार अहमद त्याच्या सैन्याला म्हणाला,"आज रात गाव मे घुसके लुटेंगे. खुबसुरत औरते, जानवर, आधे जवा बच्चे सबको पकड लेना. जिसे जो पसंद आये लूट लो."
सगळे सैन्य आता अर्धी रात्र उलटायची वाट बघत होते. रात्रीच्या गर्भात सगळा परिसर गुडूप झाला आणि जवळपास सव्वाशे सैनिक गावाकडे सरकू लागले. उरलेले सैन्य छावणीवर होते.
गावाची वेस लागली. वेशीच्या आधी एक ओढा होता आणि त्याच्या कडेने दाट झाडी होती. सैन्य सावकाश पुढे आले.
वेशीचा दरवाजा जाळायचा हुकूम दिला. त्या सरशी जाळाचे गोळे बरसू लागले. वेशीवर काहीच प्रतिकार झाला नाही.
त्या आनंदात म्होरक्या ओरडला,"चला पाटलांचा वाडा आधी लुटा."
वीस पंचवीस जण तिकडे सरकले. बाकीचे पुढे निघाले. वाड्यावर जना सावध होती.
वाड्याच्या दरवाजावर थाप पडली तशी वरून उकळत्या तेलाची कढई पलटी झाली. आठ दहा जण जखमी झाले.
दरवाजा तोडून सैन्य आत घुसू लागले तसा मसाला डोळ्यात उधळला जाऊ लागला.
तिकडे गावच्या मध्यभागी वडाच्या झाडावर लपलेल्या पोरांनी गोफणी हातात घेतल्या. अंधारात कुठून दगड येतोय काहीच कळेना. दुसरीकडे तुळसा आणि गावातील बायका एकेकाला गाठून मारू लागल्या.
सगळीकडून होणारे हल्ले बघून सैन्य घाबरले. तेवढ्यात तुळसावर हल्ला झाला.
तुळसा मागे फिरली नाही. तिने तलवारीचा वार झाला तरी कोयत्याने सैनिक कापला.
रात्री अंधारात अहमदच्या सैन्याला पळून जात येईना. वेस पेटलेली होती. दुसरीकडून पळावे तर कोण कुठून येईल आणि मारेल कळत नव्हते.
शेवटी उरलेले पंधरा वीस सैनिक जीव मुठीत घेऊन मारुतीच्या मंदिरात लपले.
सगळे गावकरी मंदिराला वेढा घालून बसले. इकडे जोत्याजी आणि त्याचे साथीदार गावाजवळ पोहोचत होते.
जळणारी वेस बघून जोत्याजी म्हणाला,"गड्यांनो घात झाला. गनिमान डाव साधला. आता आऊसायबाना काय सांगू?"
तरीही त्यांनी गावात प्रवेश केला. जागोजाग यवन सैनिक मरून पडले होते.
जोत्याजी म्हणाला,"गड्यांनो,आई जगदंबा साक्षात आली असणार ह्याना शिक्षा कराया."
मध्यभागी पोहोचताच गावकरी दिसले. महाराजांचे सैन्य पाहून जना पुढे आली.
रक्ताने न्हालेली ती तरुण पोर पाहून जोत्याजी खाली उतरला,"पोरी भले बहाद्दर."
जना म्हणाली,"हे समद जमल ते तुळसामूळ."
गावाच्या वेशीवर असणारी छावणी हलली. कारण झालेला हल्ला पाहून राजांचा कोणीतरी मातब्बर योद्धा लढत आहे असेच वाटले होते.
जोत्याजीने राजगडावर खबर पोहोचवली. असेच आठ दिवस गेले. एक दिवस गावात दोन शाही मेणे आले.
त्याबरोबर आलेला स्वार म्हणाला,"आऊ साहेबांनी मानाचा शालू पाठवला हाय."
जना आणि तुळसा दोघींना मानाचे कडे पाठवले होते. सोबत एक खलीता होता.
त्यात साक्षात आऊसाहेबांनी लिहिले होते,"लेकीनो,आज तुम्ही गनीम कापलात. इथून पुढे स्वराज्यातील लेकी उठणारा हात कापतील याची खात्री झाली."
तुळसाने खलीता हातात घेतला आणि म्हणाली,"साक्षात जगदंबेचा आशीर्वाद हाये. आऊसाब तुमी शिकिवल तेच आमी केलं."
स्वार त्यांना घेऊन राजगडाची वाट चालू लागला आणि जना आणि तुळसा आऊसाहेब भेटणार ह्यानेच हरकून गेल्या.
टीप: सदर कथा काल्पनिक आहे. तरीही आऊ जिजाऊ आणि शिवरायांनी रयतेत स्वराज्याचे प्रेम पेरले. त्यामुळे असे अनेक प्रसंग नक्कीच घडले असतील ज्यांची नोंद घ्यायला इतिहास विसरला असेल.
©® प्रशांत कुंजीर
©® प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा