आनंदी हे जग सारे (भाग-९)
©®स्मिता भोस्कर चिद्रवार.
सुरभीने आनंदीला 'आधार' संस्थेत घातलं खरं! पण एक दिवस गेल्यानंतर आनंदी तिकडे जायला तयारच नव्हती. पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' असं होतं की, काय असं वाटत असतानाच दुसऱ्या आठवड्यात आनंदीचा पॉझिटिव रिस्पॉन्स यायला लागला. ती हळू हळू तिकडे रमू लागली.
सिंधूताईंशी तिची गट्टी जमली. 'आजी, आजी' करत ती त्यांच्यासोबत आनंदाने राहायला लागली. बाकी मुलांशी सुद्धा तिचं जमायला लागलं. आधार संस्थेत सगळी मुलं ही स्पेशल होती. त्यांच्यासाठी अनेक ॲक्टिविटीस तिकडे असायच्या. ही मुलं सामान्य मुलांसारखी तर होऊ शकत नाहीत पण त्यांना स्वावलंबी बनवणं, त्यांच्या आवडीच्या कला त्यांना शिकवणं हे मुख्यतः तिथे केलं जात असे.
मुलांना काय शिकवायच, कसं शिकवायच ह्यासाठी अनेक काउन्सलर तिथे येत असत. मुलांचा कल ओळखून त्यांच्याशी प्रेमाने सगळे वागायचे. इथलं वातावरण खूपच छान होतं. कोणीही एकमेकांना हिणवत नव्हतं किंवा चिडवत नव्हतं. घरी आनंदीला नेहमी उपेक्षित वागणूक मिळायची पण इथे मात्र तिचं कौतुक होत होतं. प्रत्येकजण आपल्यावर प्रेम करतोय, हे बघून ती पण मोकळेपणाने वावरत होती.
सिंधूताईंच्या रूपाने तिला तिची आजी गवसली होती. खूप मित्रमैत्रिणी, दादा - ताई आणि तिकडे येणारे अनेक काका - काकू, मावशी सगळेच तिला आवडू लागले होते. लेकीला आनंदात बघून सुरभी सुद्धा खुश होती.
आधार संस्था तशी घरापासून थोडी दूर असल्यामुळे सुरभी सुरुवातीला आनंदीला तिथे सोडून परत घरी न येता तिथेच थांबायची.
"आनंदी एकटी राहील का? रडायला लागली एकदम तर? तिला काय होतंय हे तिलाच सांगता येत नाही मग दुसऱ्यांना कसं कळणार? जेवतांना खूपच नखरे करते. कधी कधी काही केलं तरी जेवत नाही. वयाने वाढत असली तरीही मनाने अगदी लहान बाळच आहे माझी आनंदी. तिला एकटीला कसं सोडू?"
असं करत करत काही दिवस गेले. सुरभी घरी न येता संस्थेत थांबू लागली. तसंही घरी जाऊनही तिचं मन लागत नव्हतं. आई, बाबांचे टोमणे सुरूच असायचे. तिकडे जाऊन जीवाला घोर लावण्यापेक्षा घरी लवकर उठून, सगळं आवरून ती आनंदीला घेऊन निघायची आणि येताना तिला घेऊनच परतायची.
तिथे राहून सुरभी हळू हळू मुलांना कसं शिकवायच, कसं हँडल करायचं हे समजून घेऊ लागली होती. तसा तिला स्वतःला अनुभव होताच, त्यामुळे जी काही मदत करता येईल ती करत होती. तिचा वेळ चांगला जाऊ लागला. आनंदी बरोबरच सुरभी सुद्धा तिकडे रमली होती.
समरचं मात्र वेगळंच चाललं होतं.
"सुरभी, आता आनंदी जातेय ना तिकडे मग त्यावेळेत जरा कामात मदत कर मला. हवं तर जास्त वेळ ठेवून घ्या म्हणा तिला तिकडे. म्हणजे तुला वेळ मिळेल. नाहीतर गंज चढेल तुझ्या बुद्धीला. तिच्यावर वेळ आणि पैसा घालवून तसाही काय उपयोग आहे?" त्याने टोमणा मारला
आई, बाबा सुद्धा तयारच होते
"हो, बरोबर आहे समरच. तिकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा जरा घरात आणि ऑफिसमध्ये वेळ दे. आमचं काय सून आली, आता जरा आराम मिळेल असं वाटलं होतं तर कश्यात काय? सूनेच लक्ष भलतीकडेच. नवऱ्याकडे लक्ष नाही, घरात लक्ष नाही, कामातही लक्ष नाही. अजूनही विचार कर. घराण्याला वंश हवा की आणि कोण जाणे एखादं भावंडं आलं तर आनंदी पण सुधारेल." आई सगळ्या तऱ्हेने सुरभीला आपलं म्हणणं ऐकायला भाग पाडत होत्या.
"मी कितीवेळा सांगितलं तुम्हा सगळ्यांना हे शक्य नाहीये. आनंदीला आपली गरज आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर तिचं नक्कीच काहीतरी चांगलं भविष्य तिला देता येईल. आधारमध्ये जाऊन किती बदलली आहे ती. खूप आशा वाटते आहे मला तर! तिकडे ना.." सुरभी आनंदी बद्दल भरभरून बोलत होती पण कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. सुरभीने येणारा हुंदका दाबला.
सुरभी 'आधार' मध्ये होईल तशी सगळ्यांना मदत करत होती. हळूहळू ती तिकडे काऊन्सिलिंग करायला लागली. तिकडच्या मुलांमध्ये ती स्वतःचा आनंद शोधत होती. आनंदीला शिकताना बघून आपण योग्य तो निर्णय घेतल्याची तिची खात्री पटली.
तिकडे बरेच लोक मार्गदर्शन करण्यासाठी यायचे. त्यामुळे मुलांना कसं घडवायचं यासाठी खूप मदत व्हायची. सुरभीने जबरदस्तीने बोलवलं तरीही समर काहीतरी कारण काढून सेशनला यायचं टाळायचा.
संस्थेचे ट्रस्टी गोरे काका एक खूप चांगलं, मोठं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा आणि पत्नी एका अपघातात दगावले होते. आपली सगळी पुंजी त्यांनी या संस्थेसाठी दान केली होती. ते जातीने सगळीकडे लक्ष द्यायचे. या मुलांसाठी जे जे काही करता येईल ते करण्यात गोरे काका नेहमी तत्पर असत. सुरभीला त्यांचा खूप आधार होता.
सिंधू ताई सुद्धा अगदी पोटच्या मुलांप्रमाणे सगळ्या मुलांवर माया करायच्या.
गोरे काका आणि बाकी बरेच लोक देणग्या द्यायचे पण तरीही ट्रीटमेंट आणि बाकी गोष्टी यासाठी बराच खर्च यायचा.
"फालतू खर्च करतायेत त्या पोरीवर.. काही कळत कसं नाही? इतके शिकून सवरून काय फायदा? कोणाला काही मुलं होत नाहीत का पण यांचं बघावं तर नवलच! अक्कल गहाण ठेवली आहे.. आपण काय करणार..?" आई बडबडत होत्या बाबा त्यांना साथ देत होते. समर सरळ निघून गेला.
आपल्या घरातल्यांचं वागणं बघून सुरभी हेलावली.
"हे तर आपले घरचे ना? आनंदीची हक्काची माणसं पण कोणालाच ती नको आहे. तिकडे ते परके लोक किती समजून घेतात आपल्या लेकराला आणि इथे तिचे आपले लोक असे वागतात. देवा मला शक्ती दे! माझ्या लेकीसाठी मला सगळं काही एकटीनेच करायचं" सुरभी स्वतः ला रोखू शकली नाही
छोटी, निरागस आनंदी तिच्याजवळ आली. आपल्या छोट्या छोट्या हातांनी ती सुरभीला थोपटत होती, तिचे डोळे पुसत होती. आपली मम्मा रडतेय हे बघून तिच्याही डोळ्यात पाणी येतं होतं.
"नो मम्मा! तू गुड गर्ल आहे. ते बॅड लोक आहे. बाप्पा शिक्षा करेल.." बिचारी आपल्या परीने मम्माला समजावण्याचा प्रयत्न करत होती. आनंदीला दुःखी बघून सुरभीने डोळे पुसले. आनंदीला तिने कुशीत घेतलं.
"मम्मा मी बॅड गर्ल आहे का? बाप्पाने मला गुड गर्ल का नाही केलं? इथे मला सगळे बॅड म्हणतात पण तिकडे आधल शुल मध्ये सगळे मला गुड गर्ल म्हणतात. मी इथे बॅड आणि तिकडे गुड असते का मम्मा? बोल ना मम्मा. तू पण इकडे रडते. मला नाही आवडत इथे. हे घर छान नाही. लोक छान नाही. मला आणि मम्माला रडवतात. बाप्पा सगळ्यांना मोठी शिक्षा कर." निरागस आनंदी आपल्या मनातलं आईला सांगत होती.
"नाही बाळा, ते बॅड नाहीत. सगळे गुड आहेत. तुझ्यावर खूप प्रेम करतात. असं नाही बोलायचं." सुरभी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती.
"नो मम्मा... तू खोटी बोलते." आनंदी आपल्या मतावर ठाम होती. त्या निरागस जीवाला प्रेम आणि तिरस्कार यायला फरक नक्कीच कळत होता.
आनंदीला कितीही समजावण्याचा खोटा प्रयत्न केला, तरी ती म्हणते हे खरंच होतं. आता इथे राहणं तर खूपच अवघड होतं पण आनंदीला घेऊन कुठे जाणार होती ती? बाहेर नोकरी करायची म्हटली तरीही ते शक्य नव्हतं. कोणाचाच आधार नव्हता. आई बाबा कधीच सोडून गेले होते. सोहम परदेशी होता. त्यामुळे ती खऱ्या अर्थाने एकटीच होती पण ते काही नाही, काहीतरी विचार करायलाच हवा होता. इथे राहून होणारी आनंदीची कुचंबणा तिला सहन होणारी नव्हती.
सुरभी काय करता येईल याचा विचार करत होती. तिने गोरे काकांशी आणि सिंधूताईंशी बोलायचं ठरवलं.
इतके दिवस लपवून ठेवलेली गोष्ट दुसऱ्यांपुढे उघड करतांना खरंतर तिला लाज वाटत होती पण आता पर्याय नव्हता पण ते तरी काय मदत करू शकणार होते? पण सुरभीने धीर सोडला नव्हता. आपल्या आनंदीच्या भविष्यासाठी यातून ती काहीतरी मार्ग नक्कीच काढणार होती.
(पुढे काय होईल? सुरभी काही मार्ग काढू शकेल का? आनंदीचा भविष्यकाळ कसा असेल?)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा