Login

आनंदाची शाळा

संसार,नोकरी यात गुरफटलेली ती
आजची सकाळ तिच्यासाठी उजाडली ती …नकोशी वाटणारीच.रात्रीच तिचं आणि नवऱ्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं….झोपही म्हणावी तशी लागली नाही.
त्यामुळे उठायला उशीर झाला आणि मुलीचा डबा वेळेत तयार झाला नाही…ती रागानेच उपाशीपोटी निघून गेली.नवऱ्याशीही अबोला धरलेला होताच.
स्वतःवर वैतागत तिने कशीबशी कामं आवरली कारण शाळेत तर जायचं होतचं .हाडाची शिक्षिका होती ती.
घरचं सगळं आवरुन तिने डबा भरून घेतला.लेकीसाठी छान पुरी आणि श्रीखंडही करुन ठेवलं ..उपाशीपोटी शाळेत गेलेली लेक आठवताच उर भरुन आला तिचा ..डोळ्यांत आलेलं पाणी परतवत तिने देवाला नमस्कार केला आणि निघाली शाळेत जायला.
दुचाकीवर सुद्धा तिच्या मेंदूत विचारांची आवर्तने चालूच होती.नोकरी,संसार यात आपण भरडून जातोय असं तिला वाटतं होतं..आयुष्य नीरस होत चाललंय अशी जाणीव क्षणोक्षणी होत होती.विचारांचा गुंता गडद होत जातानाच ती शाळेपाशी पोचली आणि दुचाकी बरोबरच विचारांनाही ब्रेक लागला.
“गुड मॉर्निंग टिचर”एक मंजुळ आवाज कानावर पडला आणि तिने वर पाहिलं.पहिलीतली एक गोडुली तिला हाक मारत होती.तिचं निरागस हास्य बघताच ती इतकी खुश झाली..तिला क्षणभरच आपली रुसलेली लेक आठवली.तिने तिचा एक गालगुच्चा घेतला आणि तिला गुड मॉर्निंग म्हटलं.वर्गात जाताच तिच्या विद्यार्थ्यांनी तिच्या भोवती गलका केला.त्यांना ती रोज भेटत होती ..पण ..ती मुलं मात्र रोज तिला जणू नव्याने भेटत होती.तिला तिच्या रोजच्या दिनक्रमाचा कंटाळा आला होता..पण तिच्या वर्गातल्या मुलांना ती रोज हवीशी वाटत होती.ती मुलांवर ओरडली..रागावली तरी दुसऱ्या दिवशी ती सगळं विसरून तिच्या भोवतीच रुंजी घालायची.याच विचारात दंग असताना तिला आवडता हवाहवासा सुगंध तिच्या अवतीभवती दरवळला.’चाफ्याचा वास ‘असं म्हणत तो सुगंध तिने उरात भरून घेतला.”टिचर ,तुम्हांला आवडतात ना ही फुलं,म्हणून आज मुद्दाम तुमच्या साठी आणली.”छोटीशी काव्या तिला सांगत होती.माझी आई म्हणाली,अगं,पहिलाच फुललाय चाफा ..आधी देवाला वाहू पण मी हट्टच केला,मी माझ्या टिचरनाच देणार ही फुलं..त्यांना खूप आवडतात.आवडली ना तुम्हाला टिचर? तिचा प्रश्न ऐकताच तिला भरुन आलं.हो गं कावू खूप आवडली..तिचं उत्तर ऐकून काव्या खुदकन हसली.
सकाळी तिला जीवन नीरस वाटतं होतं..पण आता तेच तिला सुखद वाटतं होतं..चाफ्याचा सुगंध मनाशी दरवळायला लागला आणि तिने नवऱ्याला फोन केला.त्याचा नेहमीचा प्रेमळ आवाज ऐकून तिला उगीचच कससं वाटलं.दिवसभर मुलांत रमून गेली आणि संध्याकाळी आनंदी होऊन घरी गेली.लेकीला मिठी मारली तशी लेकं म्हणाली,आज काय आनंदाच्या शाळेत जाऊन आलीस की काय? लेकीचं बोलणं ऐकून खुदकन हसली आणि स्वतःशीच म्हणाली…हो तर माझी शाळा आनंदाची शाळा.

0