Login

आनंदवन

मेघा,कधीतरी आयुष्यात तूही आई होशील.तेव्हा तुला कळेल, घरात माणूस टिकवायचा असेल,तर आधी मन मोकळं ठेवावं लागतं.

पत्र

सुनबाई मेघा,

हे पञ लिहिताना मनात कोणताही राग नाही. उलट, खूप शांतता आहे. कदाचित कारण निर्णय झाल्यावर माणूस हलका होतो. आम्ही निघून आलो, त्याचा अर्थ पळ काढला असा नाही; तर स्वतःकडे परत आलो, एवढाच आहे.

तू वाईट आहेस असं मला कधीच वाटलं नाही. घर नीटनेटके ठेवणं, शिस्त पाळणं, गोष्टी आपल्या पद्धतीने चालाव्यात असं वाटणं, हे सगळं स्वाभाविक आहे. प्रत्येक पिढीचं जगणं वेगळं असतं, आणि त्यातून मतभेद होणं साहजिक आहे. पण मेघा, घर म्हणजे फक्त फरशी, भिंती, फर्निचर आणि नियम नसतात; घर म्हणजे त्या भिंतींमध्ये श्वास घेणारी माणसं असतात.

हळूहळू आम्ही लक्षात येऊ लागलो की आपण आवाज कमी करायला लागलो आहोत, आपली पावलं जपून टाकत आहोत. कुणाला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचं अस्तित्वच कमी करत गेलो. हे सगळं मुद्दाम कुणी केलं नाही, पण ते घडत गेलं. आणि जेव्हा तुझ्या एका वाक्यामुळे आईच्या डोळ्यांत पाणी आलं, तेव्हा मला आतून खूप काही तुटल्यासारखं वाटलं. त्या क्षणी ठरवलं, आता थांबायला हवं.

आईसाठी मी नेहमी तडजोड करत आलो. कारण तिचं सुख माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. पण तिच्या अश्रूंवर तडजोड करणं मला मान्य नव्हतं. म्हणून आम्ही घर सोडलं. तुला शिक्षा द्यायला नाही, तर स्वतःचा स्वाभिमान वाचवायला.

हे घर आम्ही समाजासाठी दिलं, कारण जिथे माणसाला ओझं वाटतं, तिथे तो घर नसतं. आम्हाला असं घर हवं होतं, जिथे वय, आवाज, सवयी यांवर मर्यादा नसतील. आमच्या निर्णयामागे राग नाही, तर अनुभव आहे.

मेघा, कधीतरी तूही आई होशील. तेव्हा तुला कळेल की, घर चालवताना नियमांपेक्षा नात्यांची काळजी जास्त घ्यावी लागते. स्वच्छता आवश्यक असते, पण माणसांच्या भावना त्याहून जास्त मौल्यवान असतात. त्या वेळेला हे पञ तुला आठवेल, एवढीच माझी अपेक्षा आहे.

आमच्यासाठी चिंता करू नकोस. आम्ही सुखात आहोत, शांत आहोत. मनात तुझ्याबद्दल कटुता नाही. फक्त हीच इच्छा आहे की, तू समजून घेशील, शिकशील आणि पुढे कुणालाही आपल्या घरात परकं वाटू देणार नाहीस.

आम्ही तुझ्यावरचा विश्वास सोडलेला नाही.
फक्त घर सोडलं आहे.

बाबा (सासरे)
पत्र लेखन; सुनिल जाधव पुणे TM 935 985 0065


0