Login

आंधळी न्यायदेवता भाग २

ही एक सामाजिक कथा..

आंधळी न्यायदेवता भाग- २


 

पुर्वार्ध:


 

मागील भागात आपण पाहिलं की आकाश एक हरहुन्नरी मुलगा, मुंबईत स्थायिक,आपल्या कुटुंबासोबत गुण्यागोविंदाने राहत होता. त्याच्या लग्नासाठी स्थळ पाहणं सुरू होतं. पुण्यात आपल्या बहिणीच्या घरी आल्यानंतर आरतीच स्थळ सांगून आलं. दोघांनाही मुलगी आवडली होती. आरतीची घरची परिस्थिती हलाकीची. आकाशच्या घरच्यांनी सामंजस्याने लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेऊ असं ठरवलं. आकाश आणि आरतीच्या साखरपुडा संपन्न झाला. लग्नाची तारीख ठरवण्यात आली आता पुढे.


 

आंधळी न्यायदेवता भाग- २



 

लग्नाचा दिवस जवळ येत होता.. लग्नाची लगबग दिसू लागली.. आकाशही खूप उत्साहात होता.. आकाशची बहीणही ऑफिसच्या कामातून वेळ काढत आरतीच्या घरच्यांना मदत करत होती.. स्मिताने आरतीच्या बहीणीला सोबत घेऊन पाच सहा कार्यालये पाहिले.. त्यापैकी साधं आणि दोन्ही कुटुंबाला परवडेल अश्या एका कार्यालयाची निवड केली. ऍडव्हान्स पेमेंटचा चेक स्मितानेच दिला. पुढे जाऊन  साधी फुलांच्या सजावटीची ऑर्डर दिली.  लग्नातल्या पंगतीला साधा मेनु निश्चित केला.. तिच्या सर्वात धाकट्या आणि लाडक्या भावाचं लग्न होतं..ती खूप आनंदानें प्रेमाने सगळं पहात होती..

आकाश आणि आरती दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत होते. लग्नाच्या दिवसाची वाट पहाण्यात गुंग होते.. आकाशच्या आईनेही आरतीसाठी छान मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याच्या बांगड्या केल्या.. आरतीच्या घरच्यांची परिस्थिती  नाजूक असल्याने आकाशासाठी सोन्याची साखळी, अंगठीही केली.. लग्नाचा बस्ता बांधला. आकाशच्या वहिनीचीही तिच्या लग्नात तिची फारशी हौस झाली नव्हती म्हणून तिने छान साडी घेतली. मुलांसाठी कपडे, नणंदासाठी छान साड्या, सासू सासऱ्यांसाठी कपडे घेतले. नवऱ्यासाठी सूट घेतला.. सगळी तयारी झाली.. मेहंदीसाठी पार्लरमध्ये जाऊन आली.. हळदीच्या दिवशी आकाशने मोठी जंगी पार्टी दिली.बॅंडबाजा डीजे, गाणी लावून सगळे खूप नाचले. आनंदाला जणू उधाण आलं होतं..

अखेर लग्नाचा दिवस उगवला. सकाळी लवकर मुंबईवरून बस करून आकाशचं कुटुंब नातेवाईक, मित्रपरिवार सगळे कार्यालयात हजर झाले.. लग्नातही आरती शांतच होती, उत्साह दिसत नव्हता. नव्या नवरीचं तेज चेहऱ्यावर दिसत नव्हतं. आकाशच्या घरच्यांना वाटलं लग्नाच्या दगदगीमुळे दमली असेल म्हणून चेहरा कोमजला असेल. ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी न झाल्यामुळें आकाशच्या पाहुण्यांची गैरसोय झाली.. नीट व्यवस्था होऊ शकली नाही. वरपक्षा कडून आलेले अर्ध्याहून अधिक पाहुणे लग्न होईपर्यंत उभेच…आकाशच्या घरच्यांनी तरीही समजून घेतलं.. घरात कर्ता पुरुष नाही, आरतीची आई एकटी कुठे कुठे पाहणार..!! थोडं घेऊ संभाळून..  अखेरीस लग्न पार पडलं.. आरतीच्या घरच्यांचा निरोप घेऊन सगळी वरपक्षातली मंडळी मुंबईला  निघाली..

आरतीने माप ओलांडून गृहप्रवेश केला.. आकाशच्या घरच्या मंडळींनी नव्या नवरीचे मोठ्या थाटात स्वागत केले.. आरती बरोबर तिची धाकटी बहीण पाठराखीण म्हणून सोबत आलेली.. लग्नानंतरच्या विधी आटपून घेतल्या.. सगळे देवदर्शनासाठी, कुलदेवतेची पूजेसाठी त्यांच्या गावी जाऊन आले. गावचं घर,  शेतीवाडी पाहून झालं. देवदेव झालं. आणि सगळे मुंबईला घरी परतले. स्मिताने लग्नात भेटवस्तू देण्यापेक्षा  आकाश आणि आरतीसाठी केसरी टूरकडून गोवा ट्रिपची दोन तिकिटं काढून दिली. आकाश आणि आरती फिरायला गोव्याला निघून गेले.

आकाश आणि आरती गोव्याला फिरायला गेले दोन दिवसांतच परत आले. घरातले सगळे विचारत होते. का लवकर आलात? आकाशने कामावर लवकर रुजू होण्याचं कारण सांगितलं. पण दोघेही शांतच.. दुसऱ्या दिवशी आरतीला माहेरी पाठवणी करायची होती. आकाशच्या आईने आरतीच्या बहिणीला नवीन ड्रेस घेतला, आहेर देऊन पाठवणी केली.. सोबत आकाशही पुण्याला आला..आरती माहेरी आली.. तिला माहेरी सोडून आकाश स्मिताला भेटायला आला. 

आकाश घरी आल्यापासून शांतच होता..स्मिताची बडबड सुरू होती..लग्नातल्या गंमतीजंमती सांगत होती. पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्षचं नव्हतं.. काहीतरी बिनसलंय हे स्मिताच्या लक्षात आलं. आकाशच्या खांद्यावर हात ठेवत तिने त्याला विचारलं,"काय झालंय रे आकाश?" तसा आकाशचा बांध फुटला.. त्याच्या डोळ्यांत पाणी होते.. स्मिताला काळजी वाटत होती..ती पुन्हा पुन्हा त्याला विचारू लागली.. तेव्हा कुठे आकाश बोलता झाला.तो सांगू लागला," ताई!! आरतीचं काहीच समजत नाही ग!! कधी प्रेमाने बोलते, कधी उगीच चिडते.. आम्ही गोव्याला गेलो तेंव्हाही तसंच.. कुठेतरी एकटक शून्यात बघत असते.. बाहेर जेवायला गेलो तरी तिथेही तसच..इतका वेळ ताटात हात घालून उगीच अन्न चिवडत बसली.. माझं जेवण होऊन एक तास बसून राहिलो होतो तरी तीच संपत नव्हतं. शेवटी मी कंटाळुन म्हटलं आवर लवकर..किती हळूहळू जेवतेस..तिला त्याचा राग आला...तशीच अर्धवट जेवण टाकून उठली. रात्री तिला जवळ घेतलं तर दूर केलं..ढकलून दिलं.. आणि मग मी झोपी गेल्यावर मध्यरात्री उठून अंगाशी लगट करू लागली.. आम्ही खूप जवळ आलो.. सकाळी उठलो तर परत तशीच एकटीच बसुन काहीतरी पुटपुटत होती. कुठेतरी शून्यात पहात होती.मी तिला हात लावला तशी माझ्यावर जोरात धावून आली विचित्र डोळे करू लागली..मी घाबरलो आणि ट्रिप अर्धवट सोडून परत घरी निघून आलो"

स्मिता आकाशकडे आश्चर्याने पाहू लागली.. तिच्या साठी सगळं हे नवीनच होतं.. तरी त्याला धीर देत म्हणाली,"मी बोलते आरतीशी.. तुम्ही एकमेकांसाठी अनोळखीच.. नवीन असताना असं होऊ शकतं. तिला आपल्यात सामावून घ्यायला थोडा वेळ लागेल..थोडा वेळ जाऊ दे.. सगळं ठीक होईल" बहिणीच्या शब्दांनी आकाशला धीर आला.सगळं ठीक होईल ही आशा मनात जागवून गेली..

आकाशच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. स्मिताने धीर दिला खरा पण तीही मनातून थोडी घाबरली होती.. भावाचं लग्न करून आपण चूक केली नाही ना?? मनात शंका येऊन गेली. हे देवा!! माझ्या भावाचं रक्षण कर" असं म्हणत तिने देवापुढे हात जोडले. 

दोन दिवसांनी स्मिता आणि आकाश आरतीच्या माहेरी तिला परत घेऊन जाण्यासाठी आले.तिच्या घरच्यांनीही छान आदरातिथ्य केले. स्मिताने  आरतीच्या आईजवळ  आरतीचा विषय काढला.. त्या म्हणाल्या,"नाही तसा काही प्रॉब्लेम नाही. फक्त ती कमी बोलते शांत आहे.. लग्नाच्या दगदगीने दमली असेल म्हणून चिडचिड केली असेल.. काळजी करण्याचं काही कारण नाही" त्यांचं बोलणं स्मिताला पटलं. ती आरतीला घेऊन तिच्या घरी आली. स्मिता आरतीला म्हणाली," आरती, मी तुझी नणंद नसून बहिणीसारखीच आहे. तू माझ्या सोबत सगळं शेअर करू शकते. तुझं हे लग्न तुझ्या मर्जीनेच झालंय ना? आकाश आणि तुझ्यात काही मतभेद नाही ना?" आरती शांत होती. ती हळू आवाजात बोलली," नाही तसं काही.. हे लग्न माझ्या मर्जीनेच झालंय. आमच्यात काहीच वाद नाही". 

आकाश आणि आरती स्मिताचा निरोप घेऊन  मुंबईला परतले. आकाश नेहमीप्रमाणे लवकर कामावर जात असे. आकाशचा मोठा भाऊ व वहिनी दोघेही लगेच त्याच्या मागोमाग कामावर निघून जात. मुलांची सकाळची शाळा. दिवसभर घरी फक्त आकाशचे आईबाबा आणि आरती तिघेच. मुलं दुपारी शाळेतून घरी यायचे थोडा वेळ जेवण करून झोपी जायची परत संध्याकाळी क्लासला.. आकाशचे भाऊ वहिनी रात्री आठ वाजता घरी यायचे.. आणि आकाश दहा वाजता.. खाजगी कंपनी असल्याने खूप काम असायचं. त्यात लग्नामुळे आकाशच्या बऱ्याच रजा झाल्या होत्या त्यामुळे कामाचा व्याप जास्त होता. 

सुरुवातीचे काही दिवस आकाशाची आई, वहिनी आरतीला काम सांगत नसत. नवीन आहे अजून सासरच्या पद्धती अंगवळणी पडायला वेळ लागेल म्हणून तिला समजून घेत होत्या. लहान आहे जेवण बनवता येत नसेल म्हणून आकाशची आई तिला जेवण बनवायला शिकवत होती.. पण त्यांच्याही लक्षात आलं की आरती फार संथ गतीने काम करते.. नवीन असेल म्हणून होत असेल. असं स्वतःचीच समजूत घालत होत्या. पण त्याही थकल्या होत्या. त्यांचही वय झालं होतं. घरातली सर्व कामं झेपत नव्हती. आणि सून घरात असूनही त्यांनाच सर्व काम करावे लागायचे. 

हळूहळू सगळ्यांच्याच हे लक्षात येऊ लागलं.आरती फारशी कोणाशी बोलायची नाही. एकटीच तिच्या खोलीत बसून राहायची. एकटक शून्यात पाहत.. कितीही आवाज दिला तरी तिला ऐकूच जायचं नाही. मग एकदम ओ द्यायची झोपेतून जागं व्हावं तसं.. आकाशच्या आईला वाटायचं निदान आकाशचं, आपल्या नवऱ्या कडे तरी तीने बायको म्हणून लक्ष द्यावं. पण तसं घडायचं नाही. त्याचे कपडे, त्याचा डब्बा सगळं आईच करायच्या. आरती कोणत्याच कामाला स्वतःहून हात लावत नसायची... सांगेल तितकंच करायची. जेवण बनवता येत नसल्यामुळे सगळा भार आकाशच्या आई आणि वहिनीवर पडू लागला. घरात आरती असतानाही ऑफिसवरून येऊन घरातलंही तिलाच पहावं लागल्यामुळे घरात दोघा नवरा-बायको मध्ये कुरबुर होऊ लागली. त्याचे पडसाद सर्व कुटुंबावर उमटू लागले. 

घरातली शांतता भंग पावली.. आकाशच्या आईने स्मिताला सांगितले. त्याचबरोबर आरतीच्या आईलाही सांगितले. स्मिताने तिच्या आईला घरी बोलवून घेतले.  सगळं सविस्तर सांगितलं. त्या ही गोष्ट मान्य करतच नव्हत्या. ती शांत आहे फक्त बाकी काही प्रॉब्लेम नाही असचं बोलत राहिल्या. स्मिता म्हणाली," ती कामाला चपळ नाही. खूप सावकाश काम करते. तिला घरातलं काहीच काम येत नाही. तुम्ही आम्हाला सर्व खोटं सांगितलं की आरतीला सगळं येतं. कामाचं जाऊ दे निदान घरात सर्वांशी मिळून मिसळून तरी राहायला हवं ना.एकटीच आपल्या खोलीत बसून असते.  सगळ्यांच नको कमीत कमी नवऱ्याचं तरी पाहायला हवं ना. थोडी मंद आहे जशी. काही बोललेलं समजत नाही. स्वतःच्या धुंदीत असते.. असं कसं चालेल?" 

झालं!!!  भांडण करण्यासाठी इतकंच कारण पुरेसं झालं. त्या तावातावाने भांडू लागल्या.,''तुम्ही चंचल मुलगी पहायची होती. माझ्या मुलीला मोलकरीणीची कामे देता.  धुणीभांडी करायला सांगता.माझी मुलगी काय वेडी आहे का??  असं कसं तुम्ही बोलता?" आणि त्या रागाने निघून गेल्या.स्मिता गोंधळून गेली..

तिला असल्या वादाची सवय नव्हती. त्या तिलाच खूप काही बोलून गेल्या.. एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं आपण चुकीच्या लोकांशी सोयरीक केलीय.. कोणाशी बोलणार.. सगळ्यांच बायका बोलायला गेलं की भांडायला उठायच्या..  काय करावं तिला काय कोणालाच समजत नव्हतं.


 

आकाश दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता.काळजीने प्रकृती ढासळत चालली होती. बायको म्हणून त्याला आरती कडून कोणतेच सुख मिळत नव्हतं. बाहेर ऑफिसची चिंता आणि घरी आल्यानंतर आईकडून आरती विषयी ऐकायला मिळायचं.. तो खूप वैतागला होता. कोणी मित्राने त्याला सांगितलं की दारू पिल्याने दुःख कमी होतं. म्हणून तो दारू पिऊ लागला.  चांगला मुलगा असा देशोधडीला लागला होता. दारू पिऊन आला की तो कोणाशीच न बोलता न जेवता झोपी जायचा. तो कोणालाच त्रास देत नव्हता पण स्वतःलाच त्रास करून घेत होता..

लग्नाला तीन महिने झाले होते पण  घरात आनंद नव्हता. आरती तशीच वागत होती.. तिला इथे राहायचं नव्हतं तिने तसं आकाशला सांगितलं.. त्यालाही वाटलं रोज वाद घालण्यापेक्षा तिला तिच्या घरी सोडून आलेलं बरं म्हणून तो तिला तिच्या माहेरी सोडून आला.

पुढे काय होईल?? पाहूया पुढच्या भागात…

0

🎭 Series Post

View all