Login

आंधळी न्यायदेवता भाग ३

ही एक सामाजिक कथा आंधळ्या न्यायदेवतेची..

आंधळी  न्यायदेवता भाग-३


 

पुर्वाध

मागील भागात आपण पाहिलं की  आरतीच्या विचित्र वागण्याचा आकाशला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास होऊ लागला होता. तिच्या माहेरच्या लोकांना सांगूनही ते मान्य करत नव्हते. या सगळ्या गोष्टींमुळे आकाश दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला..आरतीच्या इच्छेनुसार तो तिला तिच्या माहेरी सोडून आला.. आता पुढे..

आंधळी  न्यायदेवता भाग-३


 

आरती माहेरी आली.. काही दिवसांनी तिच्या आईचा आकाशच्या घरी फोन आला आरतीला बरं वाटत नव्हतं.. आकाश लगेच आरतीला भेटायला आला.. स्मिता बरोबर होतीच. आरतीला जवळच्या क्लिनिक मध्ये घेऊन गेला. तिच्या काही टेस्ट झाल्या..आरतीला दिवस गेले होते.. लग्नानंतर दुसऱ्याच महिन्यात ही बातमी..खरंतर बातमी आनंदांची होती.. पण आकाश चिंताक्रांत झाला.. आरतीला स्वतःला नीट सांभाळता येत नव्हतं ती अजून एक जबाबदारी घेऊ शकेल का?? प्रश्नांचं काहूर माजलं होतं.. 

स्मिताने आकाशला पुन्हा एकदा धीर देत सगळं नीट होईल अशी खात्री दिली.. ती म्हणाली," लग्न झालंय  आता निभावून नेलं पाहिजे.. एखादं मुल झालं, जबाबदारी पडली की सुधारेल.. आई झालं की सगळंच बदलतं बाळा!" तिच्या बोलण्याने आकाशला पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला.. कदाचित सुख येईल असं वाटू लागलं.. 

आरती आणि आकाश काही दिवस स्मिताकडे राहिले.. स्मिता नेहमी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची.. स्मिताच्या आयुष्यात काही वाईट घटना घडून गेलेल्या.. समाजात वावरताना आलेले वाईट अनुभव आरतीला सांगायची.. आताही घरात फक्त चार माणसंच होती सगळे कामानिमित्त बाहेर असायचे.. ती एकटीच घरात… फक्त चार माणसाचं काम करावं लागायचं.. पण तरीही ती निरुत्साही असायची.. स्मिता तिला समजावून सांगायची, "छान दिसावं नवऱ्याला आवडेल असं राहावं," पण सगळं जैसे थे.. सुधारणा नव्हतीचं

आरतीला सहावा महिना सुरू झाला होता.. तिची आई घरी येऊन आरतीला घेऊन गेली.. तेही वाद करून.. गणपतीच्या दिवसात घरी देव बसलेले.. तरीही वाद झालाच.. अगदी आकाशची बायको सांभाळण्याची लायकी काढण्यापर्यंत.. भाड्याने घर घेण्याची ऐपत नाही.. बऱ्याच गोष्टी बोलून गेल्या.. आता मात्र स्मिता संतापली.. तिच्या भावाची लायकी काढण्या पर्यंत मजल गेली होती.. म्हणून तीही वादाला पेटली.. शब्दाने शब्द वाढत गेला.. एकमेकांच्या घराण्यावर, चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले...आणि नात्यात दुभंग पडत गेला.. 

आरतीची आई आरतीला तिच्या घरी घेऊन गेली.. पण त्याही अवस्थेत आकाशने आरतीची साथ सोडली नाही.. त्याने स्मिताशी वाद घातला..गरोदर बायकोला झालेला त्रास पाहून त्यालाच वाईट वाटले होते..तो रागाने स्मिताच्या घरातून परत मुंबईला निघून गेला..

बरेच दिवस दोघे भाऊ बहिण एकमेकांशी बोलत नव्हते.. सगळी नाती एक नातं जपण्यासाठी विस्कळीत झाली होती..एकत्र कुटुंब विभाजित झालं होतं..घरातला आनंद शांतता लोप पावली होती..

आरतीने एका मुलीला जन्म दिला..गोड सुरेख मुलगी..सोनपरी जन्माला आली.. इवलेसे डोळे, गोरा रंग.. सोन पावलांची नाजुक जिवनीची सुंदरी..सोन चाफ्याची पाकळी जशी.. आरतीच्या घरची परिस्थिती नाजूक म्हणून आकाशने हॉस्पिटलचा खर्च म्हणून तिला दहा हजार रुपये दिले.. आई आणि बाळ दोन्ही सुखरूप होते.. 

सगळं ठीक झाल्यानंतर आरती हॉस्पिटल मधून घरी आली…घरीं आल्यावर तिला परत त्रास होऊ लागला.. म्हणून त्यांनी तिला दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेतलं.. तेंव्हा लक्षात आलं की आरतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळीस काही अडचणी आल्या.. आणि शस्त्रक्रिया चुकीची झाली..  हे कळल्यावर तर तिच्या घरच्यांचा पारा अजूनच चढला आणि त्यांनी रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनाचं मारहाण, तोडफोड केली.. हॉस्पिटलमधल्या स्टाफ ने पोलिसांना फोन केला.. पोलिसांनी त्या सर्वांना पोलीस कोठडीत तीन दिवस बंद केले..पेपर मध्ये बातमी छापून आली 

आता काही दिवसांनी आकाश त्याचे आई वडील मोठा भाऊ वहिनी सगळे जण आरतीला परत मुंबईला घेऊन जायला आले..  आरतीने आपलं सगळं समान पॅक केलं आणि  छोट्या बाळाला घेऊन मुंबईला आली..

आकाश आपल्या कुटुंबासोबत आरती आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला.. लहान मुलीच्या येण्याने घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं.. सोनपरी ती..तीचं गोड लोभसवाणे हसणं अगदी भुरळ पाडण्यासारखं.. आकाशच्या भावाची मुलंही लहान बाळाच्या येण्याने खुश होती.. आजी आजोबा नातीच करण्यात व्यस्त झाली.. सगळं छान झालं असं वाटत होतं.. पिल्लू च्या येण्याने स्मिता ही राग विसरून आपल्या भाचीच्या गोड किमया पाहण्यात गुंग झाली.. मागचं सगळं विसरून परत आकाशशी बोलू लागली..


 

सर्वांना वाटलं आता आरतीमध्ये सुधारणा होईल.आईची जबाबदारी अंगावर पडली की बरोबर तिला समजू लागेल..पण तस काहीच घडलं नाही.. उलट ती जास्तच वेंधळेपणा करू लागली.. मुलीला भरवणं, तीच आवरणं तिला जमेना..  ती कोणाला मुलीला हात लावू देईना.. दोन दोन दिवस मुलीला आंघोळ नसायची.. दोघी मायलेकींच्या केसात ऊवा झालेल्या.. स्वतःची बेडरूमही आवरण्याचं भान तिला नसायचं. आता मात्र आकाश च्या आईची चिडचिड होऊ लागली.. 

आरतीच्या एकंदरीत वागणुकीला सगळेच  कंटाळून गेले होते.. अमेय आकाशचा जीवलग मित्र.. नेहमी हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला. खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळी कर्मकहाणी सांगितली. अमेयने त्याला धीर दिला तो म्हणाला," घाबरून जाऊ नकोस. काही झालेलं नाही तू  वहिनीला मानसोपचारतज्ञाकडे  का घेऊन जात नाहीस?" हे ऐकून आकाश अमेयवर खूप चिडला. रागावून म्हणाला," तुला काय म्हणायचं माझी बायको वेडी आहे?.. डोकं फिरलंय का तुझं??" अमेय शांतपणे म्हणाला," आकाश तिथे उपचार घेणारी माणसं वेडी असतात असं कोण म्हणतं? मनावर कधी कधी आघात होतो. आणि संयम सुटतो.. भान हरपतं.. काही नसेल तर ठीक आहे.. दाखवून घ्यायला काय हरकत आहे?" आकाशला त्याचं म्हणणं पटलं.अमेयने त्याच्या माहितीतल्या मानसोपचारतज्ञाचा पत्ता दिला.

आकाश आरतीला घेऊन मानसोपचारतज्ञाकडे आला.  त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केल्या. एकांतात तिच्याशी चर्चा केली.. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितले..दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाश क्लिनिक मध्ये पोहचले.. त्यांनी रेपोर्टस पुन्हा एकदा शांतपणे तपासले.. दीर्घ श्वास घेत म्हणाले,"आकाश शांतपणे ऐक, आरती मतिमंद नाही.. स्वमग्न स्वरूपातील हा आजार.. ही मुलं शांत असतात..स्वतः मधेच मग्न असतात.. पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे ते समजतं.  वरवर शांत दिसणारी ही मुलं कधी कधी उद्विग्न होतात.. तेंव्हा आपल्याला सांभाळून घ्यावे लागते. आरती औषधोपचाराने ठीक होऊ शकते घाबरण्याचं कारण नाही" हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला समजेना. आता त्याला आरतीच्या आतापर्यंतच्या वागण्याचा अर्थ समजू लागला. डोळ्यात पाणी होतं. त्याने डॉक्टरांच्या निरोप घेतला. मेडिकल मधून लिहुन दिलेली औषधे घेतली आणि रिक्षा करून आरतीला घेऊन घरी आला.

आकाश घरी आला. शांतपणे आपल्या खोलीत बसून होता.. आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षातच आले नाही.आईने मायेने पाठीवरून हात फिरवत विचारलं,काय झालं बाळ ??"  त्याला खूप भरून आलं होतं..," आई आपण फसलो ग!!" एवढेच शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले. आणि तो आईला पोटाशी घट्ट मिठी मारून  धाय मोकलून रडू लागला.  आकाशने सारा वृत्तांत आईला सांगितला.. आईला कळून चुकलं होतं. आपली फसगत झालीय. चुकीच्या लोकांशी सोयरीक केलीय. तिने आकाशला समजावले धीर देत म्हणाली," बाळ आकाश..!! लग्न झालंय.. एक  मुलगी आहे.. ती तुझी बायको आहे..त्या लोकांनी  फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक..समज लग्नानंतर झालं असतं तर स्वीकारलं असतं ना.. मग तसच समज. आपण तीच्यावर उपचार करू ती बरी होईल. स्वामी आपल्या पाठीशी आहेत काही काळजी करू नकोस.सगळं ठीक होईल". आईच्या शब्दांनी त्याला धीर आला.

त्यानंतर दोन तीन दिवस शांतपणे गेले. सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटोपलं.. भांडीकुंडी घासून आकाशची आई, वहिनी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले.. आकाशची छोटी चिऊ शांतपणे गाढ झोपली होती.. गोड पिल्लू ते..निरागस.. आकाशलाही झोप लागतच होती.. अचानक आरती रडू लागली..,"मला माझ्या आईकडे जायचं आहे.. आताच्या आता..मला घरातलं काहीच जमत नाहीये.. नाहीतर मी इमारती वरून उडी टाकून आत्महत्या करेन.. माझी मुलगी आहे कोणी हात लावायचा नाही..सोडा मला माझ्या आईकडे.."ती खरंच खूप उद्दिग्न झाली होती..आकाशने खूप आवरण्याचा प्रयत्न केला पण ती आवरत नव्हती.. शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं. आणि  अमेयला बोलवून घेतलं आणि त्याच्याचं कारने आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला.

आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या.. पण त्या ते मान्य करायला तयार नव्हत्या.." तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल म्हणून ती अशी वागत असेल..इथे ती व्यवस्थित होती." आणि  त्या वाद घालू लागल्या..आकाशने समजावून सांगितले..," तिला मुंबईला राहायचं नाहीये. तुम्हीच विचारा तिला.," आरतीने मान हलवली.. तिच्या आईचा मग नाईलाज झाला..आणि त्यांनी आरतीला  घरी ठेवून घेतले. 


 

पुढे काय होते..आरती परत घरी येईल का? पाहूया पुढील भागात..

0

🎭 Series Post

View all