आंधळी न्यायदेवता भाग-४
पुर्वाध
मागील भागात आपण पाहिलं की, मानसोपचारतज्ञाकडे जाऊन आल्यानंतर आरतीला उपचाराची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितले. त्यांनतर दोन दिवसांत आत्महत्येची धमकी देत आरती माहेरी परत आली. आता पुढे..
आंधळी न्यायदेवता भाग-४
आरती माहेरी आली होती.. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती.. एकटी आई कमावती होती. आणि आता लहान बाळही घरात.. घर चालवणं कठीण झालं होतं. परी एक वर्षाची झाली होती. आरतीच्या घरच्यांनी तीचं नाव 'काव्या' ठेवलं. पहिला वाढदिवस झाला. त्यांनी आकाशला त्याच्या घरच्यांना निमंत्रण सोडा साधं कळवलंही नाही.. आकाश खूप दुःखी झाला. वडील म्हणून तो आपल्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता. त्या छोटयाश्या बाळाला तिचे बाबा सुध्दा माहीत नव्हते..
आरतीच्या घरच्यांच्या वागण्याचा आकाशला खूप त्रास झाला. वादाच्या वेळीस वापरलेले अपशब्द त्याला सारखे आठवत राहायचे.. मुलीशी बोलण्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता.. जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा.. ती झोपलीय. ती फोन घेत नाही.. असं त्याला सांगितलं जायचं. आकाशला खूप वाईट वाटायचं... कशी घेणार ती फोन.?. तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही तर तिला प्रेम कुठून वाटणार..?? त्याचेच त्याला पडलेले प्रश्न..येईल परत कधीतरी.. रक्ताचं नातं आहे.. इतक्या सहजासहजी कसं तुटेल?? तो स्वतःचीच समजूत काढायचा.
आणि एक दिवस एक वादळ आलं.. सगळं नेस्तनाबूत करण्यासाठी.. आकाशला उध्वस्त करण्यासाठी.. आकाश आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देण्यासाठी.. ,त्यांच्याकडून पैसे उखळण्यासाठी आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली. कोर्टाची नोटीस आकाशच्या हातात पडली.. आरतीच्या घरच्यांनी आकाशवर आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल केली. त्याच बरोबर महिला मानव अधिकार मंडळातही केस दाखल केली. यात आकाश, आकाशाची आई, स्मिता, धाकटी बहीण आकाशची वहिनी या सगळ्यांना गोवण्यात आलं. पहिली नोटीस स्थानिक पोलीस चौकीत गेली.. तिकडून आकाशला फोन आला. आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं..कधीही पोलीस चौकीत पाऊल न ठेवलेले कुटूंब आज पोलीस स्टेशन मध्ये उलट सुलट प्रश्नामुळे हैराण झाले होते… आणि कोर्टाच्या तारखा पडू लागल्या.. सारखं पुणे- मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या..
काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं.. काय त्रास होतोय हे आरतीला सांगताच येत नव्हतं.. खरंतर तिची मोठी बहीण तिचा झालेला खोटा त्रास सांगत होती.. न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीस मध्ये होता.. मुलगी झाली म्हणून सासू त्रास देते..मोलकरणीची कामे सांगतात.. नवरा दारू पिऊन मारहाण करतो, अनैसर्गिक शारीरिक संबंध.. मोठी नणंद त्रास देते.. जाऊबाई कामावरून बडबडत असते आणि बरंच काही.. हे सगळं वाचून, ऐकून आकाशचा संयम सुटत चालला होता. ज्या मनोरुग्ण मुलीला आपण इतकं संभाळून घेतलं ती अशी बोलतेय..?? त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती. वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास.. काही मार्गच सापडत नव्हता.
सन्मानिय न्यायालयासमोर आरती आणि आकाशला प्रश्न विचारले गेले. चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुशिक्षित, मोठी नणंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्यावर.. पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल? आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली. तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नणंदेचं नाव सांगितलं. आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेली तीन दिवसांची पोलीस कस्टडी बद्दल सांगितले. तशी बातमी छापून आलेलं वर्तमानपत्रातलं कात्रण दाखवलं.. त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघडं पडलं. आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचे आदेश दिले.
न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला? असा प्रश्न विचारला.. ती गोंधळून गेली. ती काय त्रास झाला हे सांगू शकली नाही.. न्यायालयाने आरतीला नांदायला जायला तयार आहेस का? असा प्रश्न विचारला. आरतीने होकारार्थी मान हलवली. आकाशलाही विचारलं,"ही परत नांदायला आली तर तुमची काही हरकत नाही ना..?" मुलीसाठी आकाशही हो म्हणाला. न्यायाधीशांनी सुनावणी करताना म्हणाले," आरतीला नेमका त्रास काय आहे हे सांगता आले नाही. आरतीच्या घरच्यांमुळे तिचा संसार तुटतोय. तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये. आरतीने नांदायला जावं. तीन महिने देखरेखीखाली ही केस राहील.. तेंव्हाही आरतीला त्रास झाला आणि तिने तसं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे चालू राहील" न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचे आदेश दिला.
आकाशने आरती मनोरुग्ण आहे हे त्याच्या वकिलाला सांगितले पण वकिलांनी पुरावा मागितला. ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का? असं विचारलं.. ती घटना एक वर्षापूर्वी घडलेली.. ना कोणते रिपोर्ट्स ना कोणता पुरावा.. काय सांगणार.??.तो नाही म्हणाला.. आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला परत घेऊन जायला तयार झाला.
आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली. स्मिताने तिच्या आईला, मोठ्या वहिनीला आणि आकाशला समजावून सांगितलं,"जे झालं ते विसरून जा.. आपल्या बाळासाठी सगळं सहन करा.. सोन्यासारख्या मुलीचा यात काय दोष??.. आई तू तिला काहीच बोलू नको..चिडचिड करू नको तुला जितकं जमत तितकं काम कर..नाहीतर कामाला बाई ठेव. पण आरती कडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस." सगळ्यांना तिचे म्हणणे पटले. सगळे त्या चिमुकल्या बाळाकडे बघून सहन करत राहिले.
घरकामात आरतीची कोणतीच मदत होत नव्हती. आकाशची आई तिला जमेल तितकी कामे करत होती. नातीच्या बालकिमया पाहण्यात रमून जायची. जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला.
तीन महिन्यांनी आरती आणि आकाशला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागले. तेंव्हा आरतीला विचारण्यात आले. आरतीला कोणताच त्रास नव्हता. काय सांगणार होती? आरतीने सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मी आनंदात आहे असं सांगितलं. त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले. न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली..
आरती पुन्हा घरी मुंबईला आली. काव्या अडीच वर्षाची झाली होती.. लग्नानंतरच्या तीन वर्षांच्या काळात आरती सलग सहा महिनेही सासरी नांदली नव्हती.. वारंवार माहेरी जाणंयेणं होतच. आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता..वैवाहिक सुख तर कधीच संपुष्टात आलं होतं. ते विसरण्यासाठी जडलेलं व्यसन..त्याची प्रकृती ढासळत चालली होती. पण त्याचं स्वतःकडे लक्षच नसायचं.. मुलीच्या सुखासाठी सगळं सहन करत होता..
काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं. घरा शेजारीचं एक छोटी शाळा होती. तिथे आकाशाची आई पैसे भरून ऍडमिशन करून आली. पिल्लू शाळेत जाणार होतं. नवीन शाळेचा युनिफॉर्म, बूट, दप्तर पाटी पेन्सिल सगळी खरेदी झाली. फोटो काढण्यात आले. सगळे खुश होते.
स्मिता वरचेवर घरी फोन करायची. आरतीची विचारपूस करायची. आरती फक्त तिच्याशीच बोलायची.,"काम जमत नाही. मोठं कुटुंब असल्यामुळे गडबड होते माझी. मला वेगळं राहायचं आहे. मी नीट राहीन सगळं नीट सांभाळेल".. स्मिता तिला धीर द्यायची. आकाशला स्मिताने समजावून सांगितलं," नाही जमत तिला मोठ्या कुटुंबात. तू वेगळा संसार कर.. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याने घर घेऊन रहा. काही प्रोब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणंच चांगलं"
आकाशलाही ते पटलं. स्मिताने आरतीला समजावून सांगितलं," हे बघ आरती.. तुला मोठ्या कुटुंबात काम जमत नाही म्हणून आपण भाड्याने राहू.. तुला जमेल ना!! नीट राहशील ना..काव्याला नीट संभाळशील ना." आरती हो म्हणाली. मग आकाशने त्याच्या भावाच्या घराजवळच भाड्याने घर शोधायला सुरुवात केली.. म्हणजे आई वडिलांना येता येईल. दोन्ही घरावर लक्ष ठेवता येईल. आकाशचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर शोधण गरजेचं होतं.. घराचा शोध सुरू होता.
काव्या शाळेत जायचं म्हणून खुश होती. उद्यापासून शाळा सुरू होणार होती. वरवर पाहता सगळं छान शांत होतं. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. कोणती तरी गोष्ट आरतीच्या मनात धुमसत होती..
आकाश रात्री कामावरून दमून घरी आला होता.आराम करण्यासाठी थोडा पलंगावर आडवा झाला. आरती खोलीत आली त्याला म्हणाली," मला आईकडे जायचं.. मला तिची आठवण येतेय". आकाशने ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला," उद्यापासून काव्याची शाळा सुरू होईल.. नंतर जा.." आरती ऐकायलाच तयार नव्हती.. आकाश चिडला आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंडवडे काढल्याने तो त्यांच्याविषयी रागातच होता. सगळं ठीक असताना का जायचं हिला? त्याने आईला आवाज दिला म्हणाला,"हिला आईकडे जायचं.. एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला. हिने केलेले आरोप पोटात घेतले.., फक्त आणि फक्त माझ्या मुलींसाठी,.. आता तिचंही नुकसान करायला निघालीय.. मी फक्त इतकंच म्हणतोय की तिला सुट्टी असते शनिवार रविवार तेंव्हा जाऊ पण हिला आता ताबडतोब जायचंय... हा काय खेळ आहे का?? दर दोन महिन्यांत माहेरी जाते. सासरी सलग सहा महिने तरी राहिलीय का? ही जर आत्ता गेली तर मी हिला परत घेऊन येणार नाही"
आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला. स्मिताने आरतीला फोन द्यायला सांगितलं. तिने आरतीला विचारलं," काय झालं?? का जायचं तुला? कोण काही बोललं का?" ती नाही बोलली. पण तिला आईकडे जायचं होतं. स्मिताने खुप समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला.,"आता गेलीस तर आकाश तुला परत आणणार नाही. मुलीची शाळा सुरू होतेय. तिच्या भविष्याचा विचार कर.. एकटं राहणं इतकं सोप्प नाहीये ग!! आकाशचा राग शांत झाल्यावर जा. मी सांगेन त्याला. वाटल्यास माझ्याकडे या" जवळ जवळ तासभर ती फोनवर आरतीला समजावून सांगत होती. पण आरती काही ऐकायला तयार नव्हती. तिला घरी जायचंच होतं.
स्मिताने आरतीच्या मामाला फोन केला. तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला. प्रोब्लेम ऐकून घेतला. त्यांना माहीत होतं चूक आकाशची किंवा त्याच्या कुटुंबियांची नाहीच. त्यानेही आरतीला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सगळं व्यर्थ!!! मग तोही दमला. त्याने आकाशला सांगितलं,"ती ऐकत नाहीये.तुम्ही तिला गाडीला बसवून द्या". त्याच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीला बसवून दिले. त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले. त्यांना त्याचा नंबर घेतला.पोहचल्या नंतर कॉल करायला सांगितलं..
अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला. आईने तिला तिथेच थांबायला सांगितले. आणि पुण्याहून तिची आई, मावशी, तिची मोठी बहीण खासगी गाडी करून मुंबईला निघाले. आरती थांबली होती तिथे सर्वजण पोहचले.. तिची मोठी बहीण म्हणाली,असं नाही सोडायचं त्याला. सगळ्यांना दाखवून देते काय आहे ते? आणि तिने अचानकपणे आरतीच्या कानाखाली मारली..तिला ढकलून दिले. तिला बोचकारले. तिचे कपडे फाडले. डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली.. आरतीला डोक्यावर टेंगुळ आलं.
आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली. आणि पुन्हा एकदा आकाश आणि त्याच्या कुटुंबियांविरुध्द कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली.आणि त्यांची कारवाई सुरू केली
आकाश घरात बसला होता. पोलिसांनी त्याला कॉल करून पोलीस स्टेशनमध्ये यायला सांगितले. आकाश हताश होऊन पटकन खाली बसला त्याला घेरी आली. त्याचे सगळे कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहचले. आरतीच्या नातेवाईकांनी तिथेच आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना बाहेर बसायला सांगितले. पोलिसांनी आरतीचे मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्ट मध्ये झालेल्या जखमांची नोंद केली. आरतीच्या घरच्यांनी आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला होता तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला. आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे दोन वाजेपर्यंत बाहेर बसून होते. आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतरच ते घरी पुण्याला परत गेले.
आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर.. आकाश च्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलवून घेतले. आणि जामीन करून घेतला. आकाश आणि त्यांच्या घरच्यांची जामिनावर सुटका झाली.
पुढे काय होते..आरती परत घरी येईल का? आकाशला न्याय मिळेल का पाहूया पुढील भागात..
क्रमशः
©निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा