Login

आंधळी न्यायदेवता भाग ५ अंतिम भाग

ही एक सामाजिक कथा..आंधळ्या न्यायव्यवस्थेची..

आंधळी  न्यायदेवता भाग-५ (अंतिम भाग)


 

पुर्वाध

मागील भागात आपण पाहिलं की, आरतीच्या कुटुंबियांनी स्वतः हुन आरतीला मारहाण करून आकाश आणि त्याच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करून पोलीस कोठडीत दाखवली. आकाशच्या भावाच्या मित्रामुळे त्यानां जामीन मिळाला आणि त्यांची सुटका झाली. आता पुढे..



 

आंधळी  न्यायदेवता भाग- ५ (अंतिम भाग)

आकाश आणि त्याच्या कुटुंबियांची जामिनावर सुटका झाली. पहिल्यांदा एखादया गुन्हेगारांना डांबून ठेवावं तसा भास त्यांना झाला.. समाजात, नातेवाईकांत शरमेने मान खाली झुकवावी लागली. सोसायटी मध्ये छि थू झाली. घरातले वाद चव्हाट्यावर आले.. या सगळया संकटामुळे तो उदास राहू लागला.सतत दारू पिऊ लागला. दारूचं व्यसन वाढत चाललं होतं. सतत घरीच बसून राहू लागला.त्यामुळे त्याची चांगली नोकरी गेली.

इकडे आरती पुण्याला आईकडे राहू लागली.. तीने कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल कोर्टात दोन केसेस फाईल केल्या. घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जामध्ये महिन्याला  पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी दहा लाख रुपये मागितले. इतके रुपये कुठुन आणायचे? इतकी मोठी रक्कम देण्याची  त्याची ऐपत नव्हती.  आणि काहीही चूक नसताना त्याने ही शिक्षा का भोगावी? 

आज केस चालू होऊन दोन वर्षे होऊन गेली. आकाश कोर्टाच्या बाहेर त्याच्या वकिलाची वाट पहात बसून होता.. एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते.आज लग्नाला पाच वर्षे झाली. आरती कधीही सलग तीन महीने सासरी राहीली नव्हती. आकाशच्या आयुष्यात सुख आलं नाहीच.. काव्या चार वर्षाची झाली होती. बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता.  त्या निरागस बाळाला ना आपले वडील कळत होते ना त्यांच्या विषयी प्रेम होतं. 

दोन केसेसच्या तारखेला हजर राहता राहता जीव हैराण झाला. गाडीखर्च, वकीलाची फी, कुटुंबियांना मनःस्ताप..आकाश हताश झाला.. आत्महत्येचा प्रयत्नही केला पण ईश्वराच्या कृपेने वाचला किंबहुना अजून भोग  भोगायचे होते म्हणून की काय देवानेच वाचवले.. कोर्टाच्या  वाऱ्या वाढल्या होत्या. अजूनही न्याय मिळालेला नव्हता..मिळणार की नाही कोणास ठाऊक!!! आकाश पुरता कोसळला होता. काय करावं समजत नव्हतं. काय चूक होती त्याची?? काय चूक होती त्याच्या कुटुंबियांची?  या प्रश्नांचा अजूनही त्याला मिळाली नाहीयेत.. ही एक शोकांतिका..

ही कर्मकहाणी एका आकाशची.. न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास असलेल्या गरीब मुलाची.. न्यायासाठी चाललेल्या संघर्षाची.. मानसिकरित्या खचलेल्या एका हरहुन्नरी मुलाची.. आपल्या चिमुकल्या मुलीसाठी तडफडणाऱ्या एका बाबांची..

ही कथा आहे घटस्फोटामुळे वडिलांच्या प्रेमाला दुरावलेल्या मुलीची.. तुझ्या बाबांनी तुझ्या आईवर अन्याय केला हे विष पेरणाऱ्या नातेवाईकांची..

आजही आपल्या समाजात असे अनेक आकाश अशीच एखादी कर्मकहाणी घेऊन फिरत आहेत.. न्याय मिळवण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारत आहेत पण अजूनही न्याय मिळत नाही कधी कधी ही  लढाई दहा-दहा वर्ष चालू राहते. पण न्याय होत नाही.. न्यायालयीन कामकाजाच्या विलंबामुळे सारी हयात कोर्टाची पायरी झिजवण्यात जाते..

कथेतील आरती कधीच वाईट नव्हती..आजारी होती.. तिच्यावर ट्रेटमेंट झाली असती तर ती यातून बाहेर आली असती.. पण ती सासरी राहिलीच नाही.. आणि माहेरच्या लोकांना आपली मुलगी आजारी आहे हे मान्यच नव्हतं.. तिच्या बाळंतपणात झालेल्या त्रासामुळे ती सैरभैर झालेली..आणि हे आरतीच्या कुटुंबियांनीही मान्य केलं होतं.  

ही कथा लिहत असताना मी एक स्त्री म्हणून खूप अस्वस्थ झाले.. कथेचे विविध पैलू समोर आले..चांगल्या वाईट प्रतिक्रिया आल्या.. एका ऑटिझम मुलीचे लग्न, तिला मूल होऊ शकत नाही असं बरंच काही.. कथेतील आरती मतिमंद नव्हती तर ती मनोरुग्ण होती.. मानसिक धक्का पोहचलेली.. हे वारंवार सांगूनही कथा कशी चुकीची हे दाखवुन दिलं गेलं.. वाचक मित्र मैत्रिणींच्या मताचा आदर करत मनातलं थोडंस….

वाचक मित्रमैत्रिणींच्या म्हणण्यानुसार मी कथेतील आरतीच्या भूमिकेत जाऊन विचार करत होते. समजा आरती नॉर्मल मुलगी होती. आरती शांत होती.. संसार म्हणजे काय कळत नसावं?.. आकाशच्या घरचे खूप वाईट होते.. तिला त्रास देत होते.. पण मग स्मिता जीव तोडून सांगत होती," नको पडू घराच्या बाहेर.. मुलीच्या भविष्याचा विचार कर.. मी आहे तुझ्या सोबत कायम.एकटी स्त्री आपल्या मुलांचं संगोपण नाही करू शकत.. हे मी माझ्यावरून सांगते तुला.तुझा नवरा चांगला आहे न त्याच्याकडे बघ.. मी तुला स्वतंत्र होण्यास मदत करते.. मी तुला भाड्याने घर घेऊन देते.."  मग एका नॉर्मल मुलीने का नाही मुलीच्या भविष्याचा विचार केला.??  तिला त्रास होता सासरच्या लोकांचा म्हणजे नेमकं काय? त्यांच्या बोलण्याचा??आपल्या स्वतःच्या आधी का नाही विचार केला मुलीच्या भवितव्याचा?? आरतीला स्वतंत्र  राहायचं होतं मग भाड्याने घर घेईपर्यंत तिला धीर नव्हता का? की ती समर्थ होती मुलीचं संगोपण करण्यासाठी..?? आणि जर होती मग आज पोटगी आणि मुलीच्या खर्चासाठी अवास्तव मागणी कोर्टात दाखल केली ती का? कधीही तिला त्रास न देणाऱ्या नवऱ्यावर किती घृणास्पद आरोप, अगदी नवरा बायकोच्या नाजूक नात्याला अनैसर्गिक संबंध असं हीन नाव द्यावं?? वकीलही एक माणुसच असतो ना..मग आपल्या आशिलाची बाजू मांडताना अशी बीभत्स भाषा वापरताना काहीच वाटू नये?? प्रश्न मुलीच्या संगोपनाचाच असेल तर इतकी मोठी रक्कम देऊ न शकणाऱ्या आणि एका बाप म्हणून मुलीची जबाबदारी घ्यायला तयार असणाऱ्या आकाशला ती मुलगी देऊ शकेल?? जर उत्तर नाही असेल तर मग मुलगी हे साधन असावं का पैसे उकळण्याचं?? आणि खरंच संसाराची चाड असेल तर ती येईल का परतून सासरी?? 

आरतीच्या घरच्या लोकांनी का नाही थोडा समंजसपणा दाखवला? मुलगी जरा रडली..सासरी कामाचा त्रास होतो म्हणाली, सासरची लोकं त्रास देतात म्हणाली तर त्याचा शहानिशा न करता लगेच आई म्हणणारी पदरानं लेकीचे डोळे पुसायला निघाली.. क्षणभर विचार केला तर खरंच आकाशच्या घरचे इतके वाईट होते? आरतीच्या आईने का नाही निक्षून सांगितलं," बाळ तेच तुझे आईबाबा, तेच तुझं घर..सहन कर थोडं.." उलट ये निघून घरी तू..  पण असच नाही यायचं राडा करूनच घरी यायचं..आकाशला धडा शिकवूनच. ही त्यांची भाषा.. मुलीच्या घटस्फोटाचा अर्ज दाखल करणाऱ्या आरतीच्या घरच्यानी तिचा संसार टिकवण्यासाठी किती प्रयत्न केले?? आरतीला पोलीसात तक्रार करण्यास कोणी उद्युक्त केले?? आकाशला आणि त्याच्या घरच्यांना पोलीस कस्टडीत डांबूनच त्यांचा आत्मा शांत होणार होता?

असेल ही आकाशच्या घरच्यांची चुक.. पण संसार हा दोघांचा होता ना.., किती सामंजस्याने केला? किती विचार केला तो टिकवण्यासाठी.. आणि समजा आकाश वाईट होता. तर त्यालाच शिक्षा व्हायला हवी न.. सगळ्या कुटुंबाला वेशीला टांगण्यात काय अर्थ?? की ही फक्त सूड बुध्दी..?? आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे ह्याच मुख्य कारण म्हणजे हरवत चाललेलं प्रेम, दोघांमधला संवाद, आणि संयम.. पूर्वीही भांडण होत होती, रुसवे, फुगवे असायचे. एकत्र कुटुंब असायची.सासू, जावा बोलायच्या,एकत्र म्हटल्यावर भांड्याला भांड लागायचंच.. असं समजून परत राग लोभ विसरून एकत्र नांदायचे.  पण नातं तुटत नव्हतं.. पूर्वी आदर होता नात्यात.. तो आता संपलाय.. 

रस्तावर एखादं जोडपं भांडत असेल आणि पुरुष त्या स्त्रीला मारत असेल तर बघणारे म्हणतील, कीती दृष्ट माणुस आहे बायकोवर हात उचलतो आणि एखादी स्त्री जेंव्हा पुरुषाला मारत असेल तर बघणारे म्हणतील, नक्कीच पुरुषाचा दोष असेल, त्यानेच काहितरी केलं असेल..म्हणजे काय तर प्रत्येक वेळीस पुरुषच दोषी, तोच नालायक.. कसा हा कायदा?? एकीकडे स्त्री पुरुष समान म्हणून आपण नारेबाजी करायची आणि दुसरीकडे स्त्री म्हणून कायद्याचा गैरफायदा घ्यायचा..!!! तोच कायदा, न्याय सर्वांसाठी समान असायला नको का? का घ्यावा त्याचा फायदा एक स्त्री आहे म्हणून??

मी कोणत्याही वाईट वागणाऱ्या पुरुषाचं  समर्थन करत नाही. वा कोणत्याही व्यथित स्त्रीचा अपमानही करत नाही..  जर  एखाद्या स्त्रीवर खरोखरच अन्याय होत असेल तर नक्कीच पेटून उठायला पाहिजे.. अन्यायाविरुद्ध लढायला हवं.. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये..कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे म्हटल्यावर गैरफायदा घेऊ नये.. अश्या काही स्त्रियांमूळे ज्यांच्यावर खरोखरीच अन्याय झालाय त्यांना न्याय मिळत नाही.. कोणत्याही चुकीच्या व्यक्तीची बाजू ग्राहय धरून कोणावर अन्याय होऊ नये..इतकंच सांगायचं.. मनातलं थोडं..

ही एक  सत्यकथा..      कायद्याच्या चौकटीत राहून कायदा वळवू पाहणाऱ्या समाजातल्या वाईट प्रवृत्तीची.. साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.. त्यावर फक्त प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला..

कथा कशी वाटली जरूर कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका

सस्नेह नमस्कार

आपली शब्दसखी

© निशा थोरे

0

🎭 Series Post

View all