आंधळी न्यायदेवता..
आज सोमवार. आठवड्याचा पहिला दिवस होता. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. त्यामुळे आज कोर्टात जरा जास्तच वर्दळ होती. कोर्टासमोर आरोपी, फिर्यादी हजर होत होते. पुढच्या तारखा पडत होत्या. काहींचे निकाल लागत होते. काही वकील आपल्या आशीलासोबत विचारविनिमय करत होते. काही बाहेर बसून आपल्या नंबर येण्याची वाट पाहत होते. तिथे येणाऱ्या प्रत्येक चेहऱ्याची कहाणी वेगळी. तो सगळ्यांना न्याहाळत होता. त्याला ते आता सवयीचं झालं होतं. पहिल्यांदा जेव्हा तो आईसोबत आला होता तेंव्हा खूप घाबरला होता. एखादा आरोपी असल्यासारखं वाटलं होतं.
आजही तो कोर्टाच्या आवारात येरझाऱ्या घालत होता. कोर्टाने पुढची तारीख दिली होती. तो त्याच्या वकिलाची वाट पहात होता. फेऱ्या घालून थकल्यावर तिथेच तो एका ठिकाणी खाली बसला. वयाच्या तिशीतच तो वृद्ध वाटू लागला होता. डोळ्याखाली काळ्या वर्तुळानी जागा घेतली होती.. डोक्यावरचे केस विरळ झाले होते. खूप दमल्यासारखा वाटत होता तो. डोळ्यात पाणी होतं. गेली दोन वर्षे तो अश्याच कोर्टाच्या वाऱ्या करत होता.. मनात प्रश्नांचं काहूर. काय चूक होती माझी? कशाची शिक्षा? पाण्यात दगड मारावा आणि पाण्याचा तळ ढवळून निघावा तसं झालं. जीवनपट एखादया चित्रपटासारखा त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होता.
'आकाश' एक हरहुन्नरी मुलगा. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला. आकाशचे वडील खासगी नोकरीतून निवृत्त झालेले आणि आई गृहिणी. एक मोठा भाऊ, वहिनी, दोन भाचरे. दोन बहिणी त्यांची लग्ने झालेली. खूप श्रीमंत नाही पण समाधानी कुटुंब. आकाशचा मोठा भाऊ 'कॉम्प्युटर इंजिनिअर' एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चांगल्या पदावर, त्याची पत्नीला सुद्धा चांगली नोकरी होती. आकाशची मोठी बहीण लग्न करून पुण्यात स्थायिक झालेली नोकरी करत होती. धाकट्या बहिणीचंही लग्न झालेलं. आता फक्त आकाशच लग्नाचा राहिला होता.. त्याच्यासाठी वधुसंशोधन सुरू होतं. सगळे जवळचे नातेवाईक त्याच्या साठी मुली पाहू लागले होते.
आकाशला लहानपणापासूनच शिक्षणात गोडी फारशी नव्हती. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलं. तरीही एका खाजगी कंपनीत नोकरी होती. पगारही ठीक होता. रंगाने काळा सावळा तरी दिसायला छान होता. स्वभावाने बोलका, गपिष्ट. पटकन मैत्री व्हायची त्याची. मोठा मित्रपरिवार. लहानथोर सगळ्यांचा लाडका आवडता होता तो. मुली सांगून येत होत्या पण शिक्षण कमी, कधी आर्थिक परिस्थिती साधारण, कधी त्याचा काळा रंग , कधी पत्रिका, कधी त्याची खाजगी नोकरी तर कधी धकाधकीचं मुंबई शहर. अश्या अनेक कारणांमुळे लग्न जमत नव्हतं.
आकाश आपल्या मोठ्या बहिणीकडे, स्मिताकडे काही दिवसांसाठी सुट्टीला राहायला आला होता. नवीन शहर असूनही त्याची सगळ्यांची ओळख झाली. तिथेच स्मिताच्या शेजारच्या काकूंनी एक स्थळ आणलं होतं. पत्रिका जुळली. आरती नाव होतं तीचं. पाच बहिणी च्या पाठीवर परत झालेली. पितृछत्र लहानपणीचं हरवलं होतं. आई कोणत्यातरी छोट्या सरकारी बँकेत साफसफाई, चहा देण्याचं काम करत होती.. परिस्थिती हलाकीची.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. स्मिता आणि आकाश आरतीला पाहायला गेले. आरती फार सुंदर नव्हती पण दिसायला शांत. मितभाषी वाटली. आकाश आणि स्मिताला वाटलं,"की गरिबा घरची मुलगी, तिला परिस्थितीची जाण असेल. मोठ्या कुटुंबात सगळ्यांना सांभाळून राहील" स्मिताला आणि आकाशला मुलगी पसंत पडली
स्मिता आणि आकाशाला आरती आवडली होती. स्मिताने घरी आईबाबांना फोन करुन तसं कळवलं. आरतीचा फोटो व्हाट्सएपवर पाठवून दिला. त्यांनाही ती आवडली. आकाश तसा साधा सरळ. त्याला तशीच साजेशी मुलगी मिळाली होती.
एक मध्यमवर्गीय कुटूंब. पुण्यात भाड्याचं घर. आरतीचे मामा, दोन मावश्या तिथेच जवळपास रहात होते. आरतीची आई आपल्या पाच मुलींसोबत राहत होती. आरतीची आजी कधी तिच्या मामाकडे तर कधी आरतीच्या घरी राहायची. मुलगा हवा, वंशाचा दिवा होण्याच्या हव्यासापोटी पाच मुली लागोपाठ झालेल्या. आजीनेच या सगळ्या बहिणींचे संगोपन केलं होतं. घरची हलाखीची परिस्थिती. पदरात पाच मुलींना टाकून वडिल अकालीच देवाघरी गेलेले. एकटी आरतीची आई कमावती. मग अश्या वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलींच्या लग्नासाठी स्थळं कोण पाहणार!!
आरतीच्या मोठ्या बहिणीने स्वपसंतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. तीही तिच्या नवऱ्यासोबत तिथेच जवळपास राहत होती. तिला दोन लहान मुलं. एक मुलगा मतिमंद. आईकडेच सारखी ऊठबस. आरती दोन नंबरची. आरती वाणिज्य शाखेतुन पदवीधर झाली होती. आर्थिक ओढाताण. अजून तीन बहिणी लग्नाच्या. एक दोन वर्षांच्या अंतराने. एकंदरीत काय!! तर आरतीच्या लग्नाने घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं. तिच्या आईचा आर्थिक भार कमी होणार होता.
मुलांची पसंती झाल्यावर आरतीच्या घरचे मुंबईला आकाशच्या घरी आले. मुंबई सारख्या शहरात आकाशच्या वडिलांचं स्वतःचं घर, सुसंकृत कुटूंब, गावी वडिलोपार्जित थोडी शेती, मोठ्या भावाचं स्वतःचं घर. ही सारी सुखवस्तू पाहून आरतीच्या घरचे सगळेच आनंदून गेले होते. त्यांच्या कडून होकार होता. सगळे खूप छान बोलत होते.. आकाशच्या घरच्यांनाही वाटलं. गरीब कुटूंब आहे. आरती मोठ्या कुटुंबात राहिलेली. या कुटुंबात सामावून राहील. आणि म्हणतात ना! "मुलगी द्यावी श्रीमंताच्या घरी आणि सून आणावी गरिबांच्या घरची" म्हणून त्यांनाही या स्थळाची पसंती दर्शवली.
आकाशलाही वाटलं, आपलं शिक्षण कमी. दिसायला सर्व साधारण, नोकरी ही अशी. आधीच या कारणांमुळे नकार मिळालेले.. आरतीकडून होकार आल्यावर तो आंनदी झाला होता. वाटलं त्याला आरती शिकलेली. छान सांभाळून घेईल. दोघे मिळून नोकरी करू. सुखा समाधानाने संसार करू. अशी बरीच स्वप्नं त्याच्या डोळ्यासमोर फेर धरू लागली.
काही दिवसांनी लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी स्मिताने आरतीच्या घरच्यांना फोन केला. दोन्ही कुटुंबाच्या सवडीने बोलणी करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. आकाशच्या घरातली त्याचे काका-काकी,मामा-मामी,सगळी थोर मंडळी आरतीच्या घरी गेले. बोलणी सुरू झाली.
अजूनही आपल्या समाजात वरपक्षातली मंडळी हुंडा,मानपान, सोनं नाणं, दागदागिने, देणंघेणं,सोनंनाणं, मुलाचा पोशाख, लग्नाचा खर्च, जेवण या सगळ्या गोष्टींचं ओझं मुलींच्या कुटुंबावर खुशाल टाकून मोकळं होतात. या गोष्टींचा मुलीच्या कुटुंबावर किती आर्थिक ताण येत असेल याची पुसटशी कल्पना ही त्यांना येत नाही किंवा येतेही पण ती मुलींच्या घरच्यांचीच जबाबदारी आहे अश्याच अविर्भावात असतात.
आरती खरंच नशीबवान होती. आकाश आणि त्याचे कुटुंब खूप समजुतदार होते. आकाशच्या मोठया काकांनी स्पष्टपणे सांगून टाकले,
“दोन्ही कुटूंब मध्यमवर्गीय आहेत आम्हाला हुंडा नको. मुलीची आई एकटी कमवती आहे. त्यांचा विचार करता लग्नाचा हॉल, जेवण, लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांची येण्या जाण्यासाठी बसची सोय, लग्नाचा सगळा खर्च अर्धा अर्धा वाटून घेऊ. तुम्हाला ही आर्थिक ताण नको आणि आम्हालाही नको”
आरतीच्या घरच्यांना खूप आनंद झाला. जिथे संपूर्ण लग्नाची जबाबदारी घ्यावी लागली असती तिथे वरपक्षानेच हा प्रस्ताव मांडला होता. त्यांनी पटकन होकार दिला. सुपारी फुटली. साखरपुडा झाला. लग्नाची तारीख काढण्यात आली. १डिसेंबर लग्नाची तारीख ठरवण्यात आली. गोड जेवणाच्या पंगती उठल्या. एकमेकांना गळाभेट करून आकाशच्या घरच्यांनी त्यांचा निरोप घेऊन आपल्या घरी मुंबईला परतले.
दोन्ही कुटुंबातील मंडळी खुष होती. दोन्ही कुटूंब लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाचा बस्ता, दागदागिने, भांडीकुंडी, खरेदीची तयारी सुरू झाली.
इकडे आकाश आणि आरती एकमेकांशी फोनवर बोलत असायचे. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आकाश आपल्या घरच्यांबद्दल, नातेवाईक मित्रमैत्रिणींबद्दल, नोकरीबद्दल भविष्याच्या नियोजनाबद्दल भरभरुन सांगत असायचा. हे सगळं घडत असताना आकाशच्या एक गोष्ट लक्षात आली की, आरती फारशी बोलायची नाही. फक्त हो हो करायची, ती कधीच भावी संसाराविषयी बोलायची नाही. कधीच इतर मुलींसारखी करियर बद्दल बोलायची नाही. खूप मितभाषी, संथ वाटायची. एकदा आकाशने हे स्मिताला बोलूनही दाखवले. तेंव्हा स्मितांनेच त्याला समजावले. हा प्रेम विवाह नाही अरेंज मॅरेज मध्ये असंच असतं. समजून घ्यायला वेळ लागतो. ती आधीच लाजळू म्हणून कमी बोलत असेल. आकाशलाही तिचं बोलणं पटलं. आणि त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं.
आणि हीच आकाशची चूक होती का? काय घडलं पुढे. आकाशचं लग्न होतं का? पाहूया पुढच्या भागात.
क्रमश.
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा