आनंदी हे जग सारे (अंतिम भाग)
स्मिता भोस्कर चिद्रवार .
समरशी बोलून खरंतर सुरभी पूर्णपणे तुटली होती पण आनंदीकडे बघून तिने स्वतःला सावरलं. आता आपण पूर्णपणे एकट्या आहोत ही जाणीव पुन्हा एकदा घट्ट झाली.
तिने समरने तिला घातलेली हातातली अंगठी, मंगळसूत्र सगळं भिरकावून दिलं.
"का? कश्यासाठी? का जपयाच्या अश्या माणसाच्या आठवणी ज्याला आपल्या बायकोची, मुलीची आजिबात कदर नाही. जोपर्यंत आपण त्याच्या कामाच्या होतो तोपर्यंत किती छान वागला आपल्याशी आणि आता हा स्वार्थीपणा? शी अश्या माणसावर प्रेम केलं आपण? कुठल्या चुकीची शिक्षा देतोयेस देवा? पण नाही आता मी रडणार नाही. माझ्या आनंदीला सुख देण्यासाठी मी वाट्टेल ते करीन. पण खरंच काय करावे बरं? आता सिंधू ताईंना आणि काकांना किती दिवस त्रास द्यायचा?" स्वतः शी विचार करत असताना अचानक सुरभीची नजर भिरकावून दिलेल्या वस्तूंवर गेली
"खरंच ही अंगठी, मंगळसूत्र आणि या बांगड्या काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा? पण भावना सोडली तर खरच याचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी होऊ शकतो. ठरलं तर मग मी हे विकून आनंदीची सध्याची ट्रीटमेंट तर करू शकते ना." या विचाराने सुरभीला बरं वाटलं.
सुरभीने तिच्या सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी विकली. मंगळसूत्र मात्र तिच्याकडून विकणं झालं नाही. अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात समरच प्रेम राहील होतं.
आनंदीची ट्रीटमेंट झाली आणि तिच्यात बराच फरक दिसू लागला. तिची पहिली स्विमिंगची टूर्नामेंट जवळ येऊन ठाकली होती. आनंदीला स्पर्धा वैगरे काहीच कळत नव्हतं पण ती आनंदाने कुठेही पोहायला तयार असायची. तिच्या कोच लीली मात्र खूप कॉन्फिडांट होत्या. त्यांनी तिची छान तयारी करून घेतली होती. सुरभीला मात्र खूप काळजी वाटायची.
शेवटी तो दिवस येऊन ठेपला. बाप्पा आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आनंदी तयार झाली. अनेक सूचनांचा तिच्यावर भडीमार होत होता.
सुरभी देवाचा धावा करत होती. इतक्या सगळ्या मुलांमध्ये आपल्या आनंदीचा काय टिकाव लागणार आहे असं तिला वाटू लागलं. 'पण आपली आंदू स्पेशल आहे. त्यामुळे इथवर आली तेच खूप आहे. फक्त तिची तब्येत ठिक राहिली पाहिजे आणि तिने मध्येच सोडून दिलं तर? स्पर्धा तिने फक्त पूर्ण करावी. हो.. हो.. करेल माझी आनंदी पूर्ण. देवा तिला बळ दे. मानसिक आणि शारीरिक सुद्धा. असं म्हणत ती प्रार्थना करत होती आणि स्पर्धा सुरू झाली. आनंदी अगदी मस्त पोहत होती आणि...आणि तिने सगळ्यात लवकर स्पर्धा पूर्ण करून पाहिला नंबर पटकावला. खरंतर ही छोटीशी स्पर्धा होती पण आनंदीचा पहिला प्रयत्न आणि तो ही अगदी तिने यशस्वीपणे पूर्ण केला. सुरभीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
तिने आनंदीला मिठीत घेतलं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तिला बिचारीला थंडी वाजत होती आणि नेहमी आपल्याला 'पटकन कपडे चेंज कर.' म्हणून ओरडणारी मम्मा आता मात्र स्वतः ही आपल्याबरोबर ओली का होतेय तेच तिला कळतं नव्हतं.
सगळ्यांनी तिचं खूप कौतुक केलं. लिली मॅम सुद्धा खूप खुश होत्या. घरी आल्यावर सिंधू ताईंनी आनंदीची दृष्ट काढली. तिच्या सगळ्या मित्रांनी तिचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं. गोरे आजोबांनी तिला तिच्या विजयाबद्दल तिला बक्षीस सुद्धा दिलं.
आनंदी खूप खुश होती. आपण काहीतरी छान केलं हे तिला कळलं पण स्विमिंग करून ती अगदी दमून गेली होती. सुरभी तिला जवळ घेऊन थोपटत होती.
आनंदी खूप खुश होती. आपण काहीतरी छान केलं हे तिला कळलं पण स्विमिंग करून ती अगदी दमून गेली होती. सुरभी तिला जवळ घेऊन थोपटत होती.
आज तिला खऱ्या अर्थाने आपल्या लेकीचा अभिमान वाटत होता. तिला अजून बाकी ठिकाणी सुद्धा आपण स्पर्धेसाठी पाठवू असं लिली मॅम म्हणत होत्या. पण आनंदीला हे जमेल का? तिची तब्येत तिला साथ देईल का? असे अनेक प्रश्न सुरभीला भेडसावत होते. पैश्याचीही गरज लागणार होतीच.
गोरे काका एक नवीन आश्रम सुरू करणार होते. सोबतच त्यांचा एक नवा बंगला सुद्धा तयार होत होता. अनेक इंटेरियर डिझाईनर बघून झाले पण त्यांच्या मनासारखं काम करून द्यायला कोणीच तयार नव्हतं. त्यांची चीडचीड सुरू होती. घाबरतच सुरभी त्यांच्याजवळ गेली आणि तिने तिचे विचार त्यांना सांगितले.
गोरे काकांनी तिला डिझाईन तयार करायला सांगितलं. सुरभी अगदी जिद्दीने कामाला लागली. खूप मेहनत करून तिने काम पूर्ण केलं आणि गोरे काकांना दाखवलं.
तिचं काम बघून गोरे काका खूप खुश झाले. त्यांनी सुरभीचे आभार मानले. तिने स्वतः लक्ष घालून सगळं काम करून घेतलं.
आनंदी अजून दोन स्पर्धामध्ये दुसऱ्या आणि पहिल्या स्थानावर विजयी झाली. आता तिला स्पर्धा म्हणजे काय ते हळू हळू कळायला लागलं होतं, त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता आणि तिने जास्त मेहनत घ्यायला सुरुवात केली. सुरभी आणि लिली मॅम तिच्यावर खुप मेहनत घेत होत्या.
तिला आता इंटरनॅशनल कॉम्पेटिशनला पाठवायचा लिलीचा मानस होता पण आनंदीची तब्येत तितकीशी साथ देत नव्हती, त्यामुळे सुरभी आणि लिली दोघीही उदास होत्या.
गोरे काकांच्या बंगल्याच आणि आश्रमाच उद्घाटन झालं. खूप मोठी मोठी मंडळी तिकडे आलेली होती. त्यांनी सगळ्यांची सुरभीशी ओळख करून दिली. सगळेजण तिचं खूप कौतुक करत होते.
काही दिवसांतच सुरभीला ऑर्डर्स यायला सुरुवात झाली. तिला चांगले पैसे मिळू लागले. पुन्हा एकदा गोरे काकांनी तिच्यावर इंडीरेक्टली उपकार केले होते.
देवाचे आभार मानत सुरभीने आता आनंदीच्या तब्येतीवर सगळं लक्ष केंद्रित केलं. डॉक्टर कुलकर्णी नावाचे खूप मोठे आणि चांगले डॉक्टर आनंदीची ट्रीटमेंट करत होते. हळू हळू त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. आनंदीची रोग प्रतिकारक शक्ती वाढायला लागली.
आनंदी स्टेट लेवल चॅम्पियनशिप जिंकली आणि तिच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने एक वेगळं वळण मिळालं. आता ती शहाणी, प्रगल्भ होऊ लागली होती. शिक्षणात सुद्धा तिची प्रगती होऊ लागली होती. संस्थेतील इतर मुलांसोबत आनंदी मोठी होत होती. ही मुलं खऱ्या अर्थाने "मोठी" होताना बघून सिंधूताई, गोरेकाका आणि सुरभी सगळेच आनंदात होते.
अनेक जिवलग मित्र आनंदीला भेटले होते. दोघींचं असं एक जग निर्माण झालं होतं. त्यात त्या दोघीही त्यांच्या जिवलग माणसांसोबत त्या जगात सुखात होत्या.
आनंदी आता अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी जाऊ लागली होती. दैवाचा तिच्यावर वरदहस्त होता आणि तिची मेहनत फळाला येऊ लागली. सगळीकडे विजयाचा आस्वाद ती घेऊ लागली होती.
या सगळ्यात झालेली फरफट, भावनिक आणि शारीरिक त्रास हा शब्दात वर्णन करणं अशक्य होतं. शेवटी देवाची कृपा आणि सगळ्यांचे आशीर्वाद यामुळे आजचा दिवस आयुष्यात आला होता. सुरभी विचारात हरवली होती. इतक्या वर्षांत सोसलेल्या त्या कटू आणि त्रासदायक प्रवासात आज ते सुखाचं स्टेशन आलं होतं. सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यापुढे उभा होता. अचानक टाळ्यांच्या कडकडाटाने तिची तंद्री भागली.
आनंदी स्टेजवर बोलत होती. अगदी आत्मविश्वास दिसून येत होता तिच्यात. आज ती एकट्याने इतक्या लोकांसमोर अगदी सहज वावरत होती.
सगळ्यांनी आनंदी सोबतच सुरभीच ही खूप कौतुक केलं. आनंदीने सत्काराच्यावेळी सुरभी, सिंधू ताई, गोरे काका आणि तिच्या सगळ्या मित्रांना स्टेजवर बोलावलं. सगळ्यांचेच डोळे पाणावले.
समारंभ थाटात पार पडला. अनेक पुरस्कार आनंदीला मिळाले. अनेक लोकांनी संस्थेला देणगी सुद्धा दिली. आता तिच्या भविष्याची चिंता मिटली होती.
सगळे परत जायला निघाले आणि तितक्यात समर त्यांच्याजवळ आला.
"आनंदी, बाळा खूप खूप अभिनंदन. सुरभी तुझं सुद्धा अभिनंदन. खरंच हे अशक्य अस काम तू करून दाखवलस. आज खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतो आहे आनंदीचा. सुरभी मला माफ कर आणि तुम्ही दोघी आता आपल्या घरी चला." समरने आनंदीला जवळ घेतले, पण ती मात्र बावरली, घाबरली आणि पटकन दूर जाऊन सिंधूताईंना बिलगली.
"थांबा, आनंदीला जवळ घेण्याचा किंवा तिचा अभिमान बाळगण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाहीये. एक स्पेशल मुलगी म्हणून तिच्यावर अन्याय करणाऱ्या सगळ्याच लोकांना आज तिने "स्पेशल" असणं काय असतं हे दाखवून दिलंय. सगळ्या जगासाठी ती म्हणजे एक प्रेरणा ठरली आहे पण जेव्हा खरी गरज होती तेव्हा ज्या घराने आम्हाला झिडकारले. त्या घरात आता पुन्हा येणं शक्य नाही. आम्ही आमच्या जगात सुखी आहोत. तिकडे अश्या कोणत्याही वाईट गोष्टी आमच्याजवळ येऊ शकत नाहीत. माझी मुलगी आता कुठल्याही आधाराशिवाय आयुष्य जगू शकते. तिने जगात नाव कमावले आहे, ते फक्त "आनंदी" म्हणून हो एक स्पेशल व्यक्ती म्हणून आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आमच्या आनंदी जगात आम्ही खरंच सुखात, समाधानात आणि मुख्य म्हणजे प्रेमाच्या माणसांच्या सहवासात आहोत. त्यासाठी देवाचे खूपच आभार मानते मी. निघतो आम्ही आमच्या जगात. आमच्या आनंदी जगात..." समरला काही बोलण्याची संधी न देता सुरभी आनंदी सोबत निघून गेली. त्यांच्या स्वतःच्या स्पेशल जगात. जिकडे आता फक्त आनंदी आनंद होता.
समाप्त_
(ही प्रेरणादायी कथा लिहिताना खरंच खूप समाधान वाटतं आहे. स्पेशल मुलांसोबत सध्या मी अनुभव घेते आहे ते खरंच आनंददायी आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना लागणारी कसोटी खरंच खूप मोठी आहे पण अशक्य नाही. सगळ्या स्पेशल मुलांना असच आनंदी आयुष्य जगण्याची संधी मिळावी अशी आशा करते. कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. त्याचा कोणाशीही व्यक्तिगत संबंध नाही. आपण सगळे सुद्धा आपलं कर्तव्य करत नक्कीच राहूया आणि स्पेशल मुलांना नॉर्मल बनवण्यात नक्कीच हातभार लावूया.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा