आनंदी हे जग सारे (भाग-१)
©®स्मिता भोस्कर - चिद्रवार
शेवटचे दहा सेकंद... टेन, नाईन, एट... सेकंदा-सेकंदाला सुरभीची धडधड वाढत होती. आपल्या लाडक्या आनंदीला एखाद्या जलपरीप्रमाणे पाण्यात सुर मारताना बघून एकीकडे अतिशय आनंद आणि एकीकडे आईची काळजी, ह्रुदयात अगदी कालवाकालव होत होती तिच्या! डोळे मिटून देवाचा धावा करत असतानाच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने तिचा उर भरून आला.
"आनंदी, आनंदी, आनंदी..." सगळीकडे अगदी जल्लोष सुरू होता. सुरभी सोबतच सगळे फोटोग्राफर, रिपोर्टर आनंदीच्या दिशेने धावले.
आज आनंदीने सगळ्यात कमी वेळेत पोहण्याचा रेकॉर्ड केला होता. इतकी मोठी आणि मानाची समजली जाणारी चॅम्पियनशिप एका 'स्पेशल' मुलीने गाजवावी, यासारखा सुवर्णक्षण सगळ्यांनी अगदी रेकॉर्ड करून ठेवला होता.
आनंदी भोवती लोकांचा अगदी वेढा जमला होता. सगळे अगदी तिचं कौतुक करत होते. तिची नजर मात्र आईला शोधत होती. सगळ्यांना बाजूला सारून सुरभी आनंदीकडे पोचली. आई दिसताच आनंदी तिच्या कुशीत झेपावली.
फोटोग्राफर, रिपोर्ट्स, प्रचंड जनसमुदाय सगळेच एकामागून एक आनंदीशी बोलण्यासाठी सरसावत होते.
"मिस आनंदी, तुम्ही आज हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सगळ्यात कमी वेळात तुम्ही हा टप्पा पार केला आहे, त्यामुळे तुमचं नाव आता रेकॉर्ड बुकमध्ये येणार. कसं वाटतं तुम्हाला?" पहिला रिपोर्टर
"काँग्रज्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन! आम्हां सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुमचा आनंद आमच्यासोबत शेअर करा.." दुसरी रिपोर्ट्स
"आज एक रेकॉर्ड ब्रेक झाला आहे आणि तो ही एका स्पेशल व्यक्तीने केला आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारी ही पहिली स्पेशल मुलगी आहे. मिस आनंदी आज काय वाटतंय तुम्हाला?" तिसरी रिपोर्टर
"तुमच्या यशाचं श्रेय कोणाला देणार तुम्ही?" चौथा रिपोर्टर
"सगळेजण उत्सुक आहेत. काय भावना आहेत तुमच्या?" दुसरी रिपोर्टर
"हा विक्रम करण्याची प्रेरणा कशी मिळाली? ध्येय साध्य करण्यासाठी कसे प्रयत्न केले?" तिसरी रिपोर्टर
"तुमच्या यशामुळे आज सगळ्यांना तुमचा अभिमान वाटतो आहे. काय संदेश द्याल तुम्ही?" चौथा रिपोर्टर
आनंदीवर कौतुकाचा आणि प्रश्नांचा भडीमार होत होता, पण आनंदी मात्र बावरली होती. तिला काहीच बोलता येत नव्हतं. एवढ्या सगळ्या लोकांपुढे बिचारी अगदी घाबरून उभी होती. सुरभीला तिची अवस्था लक्षात आली. सगळ्यांना तिने हात जोडून धन्यवाद दिले.
"तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार! माझ्या आनंदीवर तुम्ही इतकं प्रेम करता आणि तिच्याशी तुम्हाला खूप बोलायचं आहे, हे मला माहिती आहे. पण तिला थोडासा वेळ द्या. थोड्याचवेळात इथे तिचा सत्कार होणार आहे, तेव्हा ती नक्की बोलेल. आता जरा तिला फ्रेश होऊ द्या." बावरलेल्या आनंदीला घेऊन सुरभी रूममध्ये आली
ती अजूनही घाबरलेली होती. सुरभीने तिच्याकडे बघितलं. आनंदी म्हणाली, "क्स्विझ.. टेन... हग..."
या छोट्या छोट्या गोष्टी खरंच आनंदीचे मन शांत करायला उपयोगी होत्या. सुरभीने तिचा हात हातात घेतला. प्रेमाने दहा वेळा दाबला आणि मग तिला कुशीत घेतलं तशी आनंदी खुदकन हसली. आता तिला एकदम रिलॅक्स वाटत होतं. सुरभीने तिला छान तयार केलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिची दृष्ट काढली.
"अंदू बाळा, तू जिंकलीस. अग तू रेकॉर्ड मोडलास. सगळ्यात फास्ट स्विमिंग करून आज तू एक खूप मोठं मानाचं स्थान मिळवलं आहेस. मला तुझा खूप अभिमान वाटतो आहे. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. माझी गुणाची बाय ग. आता बाप्पाला नमस्कार कर बरं!" सुरभी म्हणाली
"मम्मा, म्हणजे मी खरंच विनर झाली! ये... तुझं स्वप्न पूर्ण झालं. किती लोक होते ना तिकडे आणि आता मला अवॉर्ड मिळणार ना, पण खूप लोक मला नाही आवडत. फक्त तू, मी, आजी आणि माझे फ्रेंड्स बस! बाकी मला भीती वाटते." आनंदी पुन्हा थोडी बावरली होती.
"हे बघ बाळा, हे सगळे लोक खूप चांगले आहेत. त्यांना तू जिंकली म्हणून खूप आनंद झाला आहे, म्हणूनच तुझा सत्कार करणार ते! प्राईझ पण देणार तुला मोठ्या स्टेजवर. खूप सारे फोटो काढणार तुझे. मस्त पोझ द्यायची बरं का आणि छान बोलायचं. अजिबात घाबरायच नाही. नाहीतर मम्मा आणि आजी रागावतील."
"तू खूप सुंदर दिसते आहेस. चल आता रेडी ना. जाऊया बाहेर. आजी आणि तुझे फ्रेंड्स पण आले आहेत तुझं कौतुक करायला. " सुरभीला अगदी भरून आलं होतं.
"हो मम्मा. मी ट्राय करेल. तू म्हणतेस तर चांगले लोक असतील ते. पण आधी आजी आणि माझ्या फ्रेंड्सला भेटणार मी. चल लवकर." आनंदी बाहेर जायला अगदी आतुर झाली होती.
बाहेर जय्यत तयारी होती. मस्त मोठा स्टेज होता. आजची स्पर्धा खूपच महत्त्वाची होती. कोणी ना कोणी जिंकणार होतंच पण ती आनंदी असल्यामुळे तिचं स्पेशल कौतुक होत होतं. खूप लोक जमले होते. सगळ्या मोठ्या चॅनलचे रिपोर्ट्स, फोटोग्राफर आनंदीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी अगदी तयार होते. मंत्रीजीच्या हस्ते आनंदीचा सत्कार होणार होता.
आनंदी आणि सुरभी बाहेर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. दुतर्फा लोक स्वागतासाठी उभे होते. प्रत्येकजण हात हलवून आनंदीचे कौतुक करत होता. फोटो आणि व्हिडिओ शुटींग सुरू होतं. आनंदी खूप खुश होती. ती सुद्धा आनंदाने हात हलवून सगळ्यांना प्रतिसाद देत होती.
तिची नजर मात्र आजीला शोधत होती. स्टेजजवळ जाताच तिला आजी आणि तिचे मित्र दिसले. ती पटकन त्यांच्याजवळ गेली. आजीच्या पाया पडली. आजीने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवून बोटं मोडली. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. मग आनंदी आजीच्या कुशीत शिरली. तिचे मित्र तिच्याजवळ आले. सगळ्यांनी एकमेकांना 'हाय फाय' केलं. आनंदीला स्टेजवर जायचं होतं. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती जमलेले होते. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर कुतूहल, आश्चर्य आणि कौतुक होतं.
"आंदू बेटा, चल कार्यक्रमाची वेळ झाली. सगळे तुझी वाट बघत आहेत. बघ किती सुंदर स्टेज आहे. ते सगळे लोक खूप मोठे आणि चांगले आहेत. तुझं खूप कौतुक करणार ते. प्राईझ पण मिळणार. खूप फोटो काढणार. छान बोलायचं सगळ्यांशी. पाया पडायच त्यांच्या आणि अगदी कॉन्फिडन्सने सगळ्यांना उत्तरं द्यायची. चल जा पटकन." सुरभीने आनंदीला जवळ घेतलं.
"हो मम्मा, मी छान बोलणार. खूप मस्त वाटतं आहे मला आणि मी पाया पडतेच ना नेहमी मोठ्यांच्या? तू आणि आजीने शिकवलं तसच मी वागणार. चला आपण जाऊया सगळे. चेअर कमी दिसतायेत स्टेजवर. त्यांना सांगूया का अजून आणा म्हणजे आपल्या सगळ्यांना बसता येईल. नाहीतर आम्ही उभे राहतो. चला सगळे पटकन. कोणीच गोंधळ करणार नाही आम्ही. गुणी मुलांसारखे वागणार. आजी हेच बोलणार होतीस ना तू?" आनंदी आजीकडे बघून गोड हसली. तिचे नेहमीचे डायलॉग होते ते!
"आनंदी, हे बघ तू एकटीच जाणार आहेस स्टेजवर. आम्हाला अलाउड नाही. तुझा सत्कार म्हणजे तू जायचं एकटीने. आम्ही इथे बसून बघणार आणि टाळ्या वाजवणार. चल जा लवकर, सगळे वाट बघत आहेत तुझी. पाहुणे पण आलेत. खूप गोड दिसत आहे माझी परी. जा लवकर." सुरभीने मुद्दाम आनंदीला एकटं पाठवलं.
आनंदीने सुरभीला मिठी मारली आणि मोठ्या आत्मविश्वासाने स्टेजकडे जायला निघाली. तिच्यासाठी रेड कार्पेट तयार होते. दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव होत होता. सगळे तिच्यासाठी चेरिंग करत होते. अनेक मान्यवर तिच्या सत्कारासाठी जमली होती. टाळ्यांच्या कडकडाटात आनंदीने स्टेजवर पाऊल ठेवलं आणि एकच जल्लोष झाला.
"आनंदी, आनंदी" असा मनाला मोहवून टाकणारा आवाज आसमंतात भरून गेला आणि सुरभीचं हृदय सुद्धा अभिमानाने भरून गेलं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कितीही थांबवलं तरीही तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्याच!
या आनंदाच्या प्रसंगी सुरभीला मात्र जुन्या आठवणी विसरता येणार नव्हत्या. आज सगळ्यांची आवडती असलेली ही आनंदी एकेकाळी तिच्या स्वतःच्या माणसांना सुद्धा नकोशी होती.
(नक्की काय झालं होतं भूतकाळात? जाणून घेऊयात पुढील भागात!)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा