आनंदी हे जग सारे (भाग-७)
©® स्मिता भोस्कर चिद्रवार.
राज एक खूप चांगला मुलगा होता पण सुरभीने त्याला नेहमीच एका मोठ्या भावाच्या नजरेने बघितल होतं. त्याच्याशी प्रेम, लग्न हे तिला शक्यच नव्हतं. समरच मात्र तिला सगळंच आवडायचं. त्याचा स्वभाव, झोकून काम करण्याची पद्धत, त्याचं बोलणं, वागणं सगळंच तिला मोहवून टाकायचं.
दोघांनाही एकमेकांबद्दल सगळंच माहिती होतं. दोघेही एकमेकांना अनुरूप होते. घरी कसं सांगायचं हा प्रश्न होता. तसा समर एक दोनदा सुरभीकडे आला होता. आईला तो चांगला मुलगा वाटला होता पण समरच्या घरच्यांनी मात्र सुरभीला बघितलं नव्हतं.
समर तर त्याचे आई बाबा नाही म्हणणार नाहीत अशी खात्री बाळगून होता.
दोघांनीही आपापल्या घरी सांगितलं. दोन्ही कुटुंबांनी एकत्र भेटायचं ठरवलं. सुरभीच्या आईने समरच्या घरच्यांना आपल्या घरी बोलावलं. जुजबी बोलणी झाली. 'दोन-चार दिवसांत विचार करून कळवतो' असं सांगून मंडळी गेली.
"सरू, अग लोक तर खूप चांगले वाटत आहेत. शिवाय तुम्ही दोघेही एकमेकांना ओळखता, एकाच क्षेत्रातले, एकमेकांना अगदी अनुरूप आहात. मला तर जावई पसंत आहे. "आईने सुरभीला जवळ घेतलं.
"अरे व्वा! जावई पसंत आहे सासू बाईंना आणि आम्हाला सुद्धा आमचे जीजू अगदी पसंत आहेत. काय मस्त पर्सनालिटी आहे समरची? आपल्याला तर एकदम आवडला आणि ताई तर काय एकदम एका पायावर तयार आणि जीजु पण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले दिसतच होते. आता रडायची आणि डान्स करायची प्रॅक्टिस करायला हवी. गोड गोजिरी... ताई तू होणार नवरी, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा..." सोहम अगदी खुशीत येऊन सुरभीला चिडवत होता. सुरभीच्या गालावर फुललेले गुलाब बघून रंजना बाई अगदी आनंदल्या. तिघेही वसंत रावांच्या फोटोसमोर उभे राहिले. त्यांचा चेहरा सुद्धा होकार असल्याचं जणू सांगत होता.
इकडे समरच्या आईला, उषाला मात्र सुरभी अजिबात आवडली नव्हती.
"काय रे समर, इतक्या सुंदर सुंदर मुली दाखवल्या तुला आणि तुला ही आवडावी? ना रंग, ना रूप, आणि घर बघितलं का किती साधं? आणि तुझ्याच कंपनीत काम करते. वडील नाहीत, भाऊ पण नुकताच नोकरीला लागलेला, त्यांच्याकडून तुझी काही हौस मौज होणार नाही . मला अजिबात आवडली नाही ती मुलगी."
"ही बघ. कालच आलंय हे स्थळ. माझ्या ओळखीची आहे ही मुलगी. उद्या हिला बघायला जायचं आहे. त्या मुलीला विसरून जा." उषा समरला एका मुलीचा फोटो दाखवत म्हणतात
"आई अग नुसतं रंग रूप बघायचं का? तिचा स्वभाव खूप छान आहे. अगदी संस्कारी आहे. आणि खूप हुशार आहे. मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. दुसऱ्या कोणाशी मी लग्न करणार नाही." समरने निक्षून सांगितलं तेव्हा सगळ्यांचाच नाईलाज झाला.
सगळ्या गोष्टी पटकन ठरल्या आणि अगदी साधेपणाने समर - सुरभीचा विवाह सोहळा पार पडला. राज सुरुवातीला नाराज होता पण सुरभीने त्याला तिच्या भावना सांगितल्या आणि त्याने हे नाते आनंदाने स्वीकारले. उषाबाई नाखूष होत्या पण सुरभी आपल्या गोड स्वभावाने त्यांचं मन जिंकण्यात हळू हळू यशस्वी होत होती.
दोघांचा संसार छान सुरू होता . सुरभी आणि समरचा व्यवसाय भरभराटीला आला होता. सुरभी आयुष्यात आल्यापासून त्याची खूप प्रगती होत होती.
घर आणि ऑफिस सांभाळताना सुरभीची कसरत होत होती पण ती सगळं आनंदाने करायची. रंजनाबाई पण लेकीचा सुखी संसार बघून समाधानी होत्या. लेक जावई अधून मधून जाऊन प्रेमळ भेट द्यायचे, त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित व्हायचा.
नव्याची नवलाई सरत आली आणि सगळ्यांनाच नव्या पाहुण्याच्या आगमनाचे वेध लागले होते.
"आम्ही धड धाकट आहोत, तोपर्यंत होऊ द्या मुल म्हणजे आम्ही पण आमच्या नातवंडांना खेळवून समाधान मानू."
"आम्ही सांभाळू त्याला. तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या करियरच्या आड येणार नाही बाळ."
दोन्हीकडच्या भावी आजी अगदी मागे लागल्या होत्या. सुरभी आणि समरला सुद्धा बाळ हवंच होतं पण अजून तशी काही बातमी मिळालेली नव्हती.
बघता बघता दोन वर्षे सरून गेली. दोघांचा व्यवसाय वाढत होता, पण संसार वेलीवर अजून फुल उमलण्याची चिन्ह दिसत नव्हती. आता मात्र सुरभी काळजीत पडली होती. तिने समरला घेऊन डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला.
दोन्हीकडच्या भावी आजी अगदी मागे लागल्या होत्या. सुरभी आणि समरला सुद्धा बाळ हवंच होतं पण अजून तशी काही बातमी मिळालेली नव्हती.
बघता बघता दोन वर्षे सरून गेली. दोघांचा व्यवसाय वाढत होता, पण संसार वेलीवर अजून फुल उमलण्याची चिन्ह दिसत नव्हती. आता मात्र सुरभी काळजीत पडली होती. तिने समरला घेऊन डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी अनेक टेस्ट केल्या आणि शेवटी समरमध्ये दोष असल्याने ट्रीटमेंट घ्यावी लागेल असे निदान केले. मूल होण्याची शक्यता तर होती पण बऱ्याच ट्रीटमेंट कराव्या लागणार होत्या. बराचवेळ आणि पैसा खर्च करावा लागणार होता.
पण मुल तर हवच होतं त्यामुळे दोघांनीही तयारी दाखवली. बरेच महिने निघून गेले आणि ती गोड बातमी मिळाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला.
उषाबाईंना काय करू आणि काय नाही असे झाले होते. रंजना बाई सुद्धा खुप आनंदल्या. मधल्या काळात सोहमच लग्न सुद्धा रेश्माशी झालं आणि नवीन सून त्यांच्या घरात आली. सुरभीला आता आईची काळजी नव्हती.
काही दिवसांत सोहमला परदेशी अगदी छान नोकरीची ऑफर आली. समरने सुद्धा अजून एक नवीन ऑफिस उघडलं. बाळाचा पायगुण अगदी छान होता.
सुरभीला अगदी छान जपत सगळेजण बाळाच्या आगमनाची वाट बघू लागले .सुरभीचे दिवस भरत आले होते. अचानक तिला एक स्वप्न पडलं. 'मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार' सुरभीची आई हसत तिच्या स्वप्नात म्हणत होती. या स्वप्नाने सुरभी दचकून जागी झाली. हे असं विचित्र स्वप्न का पडलं असेल या विचाराने तिला अस्वस्थ वाटू लागलं होतं. आईला लगेच फोन करावा म्हणून ती उठली आणि तिच्या पोटात दुखायला लागलं. समर आणि उषा बाई तिला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले.
सुरभीची डिलिव्हरी होणार होती. समरने फोन करून सोहम आणि आईला कळवलं. आनंदाच्या भरात आई तयार होऊन बाबांच्या फोटो पुढे उभी राहून बोलत होती.
"अहो किती आनंदाचा दिवस आहे आज पण मला मात्र कसंतरी वाटतं आहे. तुम्ही मला तुमच्याकडे बोलावता आहे असं सारखं भासतेय. खरंच मी सुरभीच्या बाळाच्या रूपाने परत येईन. मी येतेय तुमच्याकडे.. सोहम-रेशमा एकमेकांना सांभाळा. तुम्ही दोघं परदेशी जा. माझी आणि बाबांची इच्छा पूर्ण करा. खूप यशस्वी व्हा. मी खूप समाधानी आहे. माझी सगळी लेकरं आनंदात आहेत." आईने दोघांना जवळ घेतलं.
"आई अग हे काय बोलतेस तू? " बोलत असतानाच धाडकन कोसळल्याचा आवाज आला. तिथेच उभे असणारे सोहम- रेश्मा एकदम आवाक झाले. रंजनाबाई त्यांच्यातून निघून गेल्या होत्या. आईच्या जाण्याची बातमी पचवणं सोहमला शक्यच नव्हतं, पण पर्याय नव्हता
इकडे सुरभी आईची वाट बघत होती पण तिला कळा सुरू झाल्या आणि डॉक्टर तिला ऑपरेशन थिटरमध्ये घेऊन गेले.
काही वेळातच बाळाच्या रडण्याने सगळ्यांच्या जीवात जीव आला.
"अभिनंदन! लक्ष्मी आलीय. बाळ बाळंतीण अगदी सुखरूप आहे." नर्सने चिमुकलं गोंडस बाळ समरच्या हातात दिलं. जगातला सगळ्यात मोठा आनंद त्याला आज मिळाला होता.
उषाबाईंच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वामनराव लगेच मिठाई घेऊन आले. सगळ्या डॉक्टर आणि स्टाफला त्यांनी गिफ्टस दिले. सुरभी शुद्धीवर आली तशी तिची दृष्ट काढून उषा बाईंनी तिला पोटाशी धरलं. समरने तिच्या कपाळावर ओठ टेकले. त्याच्या डोळ्यातला आनंद आणि अभिमान ओसंडून वाहत होता.
सुरभी आपल्या लेकीकडे डोळे भरून बघत होती. जणू काही तिची आईच बाळ रूप घेऊन आली होती. तिला आईची आठवण आली. 'आई कशी नाही आली अजून?'
आईचं जाणं स्वीकारणं सुरभी आणि सोहमसाठी खूपच अवघड होतं. तिच्या त्या स्वप्नाचा अर्थ आता तिला उमगला. आईच आपल्या पोटी पुन्हा जन्म घेऊन आली आहे याची तिला खात्री पटली. बाळाकडे बघून सुरभीने आपलं दुःख गिळल.
तिच्या येण्याने सगळीकडे आनंदी आनंद झाला होता म्हणून बाळाचं नाव "आनंदी" ठेवण्यात आलं
तिच्या येण्याने सगळीकडे आनंदी आनंद झाला होता म्हणून बाळाचं नाव "आनंदी" ठेवण्यात आलं
काही महिन्यात सोहम आणि रेशमा परदेशी गेले.
सुरभी आनंदीच्या बाळ लीला बघत स्वतःच दुःख पचवायला शिकली होती. सगळं घर "आनंदीमय" झालं होतं.
सुरभी आनंदीच्या बाळ लीला बघत स्वतःच दुःख पचवायला शिकली होती. सगळं घर "आनंदीमय" झालं होतं.
आनंदी अगदी गोड, गोरी गोंमटी आणि अगदी सुदृढ होती.
ती हळू हळू वाढू लागली होती. सगळेच सतत 'आनंदी' 'आंदु' करण्यात मग्न होते.
आजी, आजोबा नातीचं सगळं अगदी मनापासून करत होते. सुरभी हळू हळू कामात पुन्हा लक्ष घालू लागली.
आनंदी मोठी होऊ लागली तश्या तिच्या हालचाली मंद आहेत असं वाटू लागलं होतं.
"जरा गब्बु आहे."
"काही मुलं थोडी स्लो असतात." असं म्हणून मनाची समजूत सगळेच घालत होते.
आनंदी अकरा महिन्यांची झाली आणि न राहवून सुरभी आणि समर तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. बऱ्याच तपासण्या झाल्या आणि ती भयंकर बातमी डॉक्टरांनी त्यांना दिली.
(काय असेल ती भयंकर बातमी? जाणून घेऊया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा