Login

आनंदी हे जग सारे ( भाग ८ )

देवाला बोल लावून झाले, नवस झाले, डॉक्टरचे प्रयत्न सुरूच होते. काही दिवसांत सुरभीने आनंदीच स्पेशल असणं स्वीकारलं. आता तिने आनंदीला होईल तितका सपोर्ट करून तिला तिच्या पायावर उभं करायचं ठरवलं.आनंदी हळू हळू वाढत होती. सुरभी आता काम सोडून पूर्णवेळ आनंदीसाठीच देत होती. घरच्यांना आनंदी बद्दल सहानुभूती होती. लहान होती तोपर्यंत सगळं ठीक सुरू होतं पण जशी जशी ती मोठी होऊ लागली तशी तिचं वागणं, असंबंध बोलणं, काही गोष्टींवर वेगळंच रीॲक्ट होणं आणि उगीचच रडणं, हसणं ह्या सगळ्यांमुळे ती घरच्यांपासून दूर होऊ लागली. तिची वाढ खूपच कमी होती. तब्येतीने पण ती खूप नाजूक होती. तिला खूप जपावं लागे.सुरभी आता फक्त आनंदीसाठी जगत होती. दिवसभर डोळ्यात तेल घालून ती आपल्या लेकीला सांभाळायची. एके काळी करियरला प्राधान्य देणारी सुरभी आता फक्त 'आनंदीमय' होऊन राहिली होती."अग काय होतीस आणि काय झालीस तू सुरभी? तुझं माझ्याकडे आजिबात लक्ष नाही. फक्त 'आनंदी, आनंदी' हेच सुरू असतं तुझं आजकाल. मला तुझी गरज आहे ऑफिसमध्ये. आता मोठी झालीये ती. एखादी बाई लाव नाहीतर तिला डे केयरमध्ये ठेव आणि ऑफिस जॉईन कर परत." समरची चीडचीड होत होती."अरे हे काय बोलतो आहेस तू समर? आनंदीला माझी आणि आपल्या सगळ्यांचीच गरज आहे ना. दुसरं कोणी तिची काळजी कशी घेऊ शकेल व्यवस्थित? मला तिच्यासोबत राहणं गरजेचं आहे. खरंतर तूही तिला वेळ द्यायला हवा. मी काही ऑफिस जॉईन करू शकत नाही .
आनंदी हे जग सारे (भाग - ८)

©® स्मिता भोस्कर चिद्रवार.

शेवटी ती भयंकर बातमी डॉक्टरांनी दिली. 'आनंदी एक स्पेशल मुलगी होती. तिला डाऊन सिंड्रोम होता. तिची वाढ सामान्य मुलांप्रमाणे होणार नव्हती. तिला खूप जपावं लागणार होतं.'

ही बातमी ऐकून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. सुरभीला तर धक्काच बसला. ती हे मानायला तयारच नव्हती. मग दुसऱ्या अनेक डॉक्टरांचे निदान करून झाले पण सगळ्यांनी आनंदी 'स्पेशल चाइल्ड' असल्याची पुष्टी दिली. आता मात्र हे सत्य स्विकारण्याशिवाय पर्यायच नव्हता. सुरभी खूप रडली.

"काय चुकलं?"

"आपणच का?"

"काय वाईट केलं आपण कोणाचं म्हणून हे असं झालं?"

"नक्की कोणाची चूक झाली? आपली की दैवाची?"

देवाला बोल लावून झाले, नवस झाले, डॉक्टरचे प्रयत्न सुरूच होते. काही दिवसांत सुरभीने आनंदीच स्पेशल असणं स्वीकारलं. आता तिने आनंदीला होईल तितका सपोर्ट करून तिला तिच्या पायावर उभं करायचं ठरवलं.

आनंदी हळू हळू वाढत होती. सुरभी आता काम सोडून पूर्णवेळ आनंदीसाठीच देत होती. घरच्यांना आनंदी बद्दल सहानुभूती होती. लहान होती तोपर्यंत सगळं ठीक सुरू होतं पण जशी जशी ती मोठी होऊ लागली तशी तिचं वागणं, असंबंध बोलणं, काही गोष्टींवर वेगळंच रीॲक्ट होणं आणि उगीचच रडणं, हसणं ह्या सगळ्यांमुळे ती घरच्यांपासून दूर होऊ लागली. तिची वाढ खूपच कमी होती. तब्येतीने पण ती खूप नाजूक होती. तिला खूप जपावं लागे.

सुरभी आता फक्त आनंदीसाठी जगत होती. दिवसभर डोळ्यात तेल घालून ती आपल्या लेकीला सांभाळायची. एके काळी करियरला प्राधान्य देणारी सुरभी आता फक्त 'आनंदीमय' होऊन राहिली होती.

"अग काय होतीस आणि काय झालीस तू सुरभी? तुझं माझ्याकडे आजिबात लक्ष नाही. फक्त 'आनंदी, आनंदी' हेच सुरू असतं तुझं आजकाल. मला तुझी गरज आहे ऑफिसमध्ये. आता मोठी झालीये ती. एखादी बाई लाव नाहीतर तिला डे केयरमध्ये ठेव आणि ऑफिस जॉईन कर परत." समरची चीडचीड होत होती.

"अरे हे काय बोलतो आहेस तू समर? आनंदीला माझी आणि आपल्या सगळ्यांचीच गरज आहे ना. दुसरं कोणी तिची काळजी कशी घेऊ शकेल व्यवस्थित? मला तिच्यासोबत राहणं गरजेचं आहे. खरंतर तूही तिला वेळ द्यायला हवा. मी काही ऑफिस जॉईन करू शकत नाही. तू अजून स्टाफ वाढव हवंतर." सुरभी म्हणाली

समर रागाने निघून गेला. असच व्हायचं नेहमी. सुरभीला काहीही करून आनंदीला स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं आणि समर अन् त्याच्या आई बाबांना हा फुकट वेळ घालवनं वाटायचं.

"समर, सुरभी आनंदी आता मोठी होत आहे. तुम्ही आता दुसऱ्या मुलाचा विचार करायला हवा. तिचं काय ती वाढेल. घराण्याला वंश हवा की नको?म्हणजे आनंदीवर आमचं प्रेम आहेच पण आता दुसरं मुलं हवं ना तुम्हाला? आम्हीही आता थकत चाललोय. वेळेवर सगळं व्हायला हवं ना. मनावर घ्या जरा." आई बाबा म्हणाले

"नाही, ते शक्य नाहीये. आनंदीला आपली गरज असताना मी असा निर्णय घेऊ शकत नाही. माझ्यासाठी तिच सर्वस्व आहे. तिला वाढवताना आपण सगळ्यांनीच तिला मदत केली पाहिजे." आनंदीचा आवाज आला आणि सुरभी निघून गेली

"समर जरा विचार कर. आनंदीला एखाद्या आश्रमात ठेवता येईल. ते साठे म्हणत होते अश्या मुलांना सांभाळायला संस्था असतात. तिथे काळजी घेतात या मुलांची. बघ जरा चौकशी कर. तिच्यासाठी आयुष्य घालवायची काय गरज आहे? जरा समजावून सांग तुझ्या बायकोला." बाबा म्हणाले

"खरंय तुमचं आई - बाबा. मी बोलतो सुरभीशी. पटतंय मला तुमचं." समर म्हणाला

सुरभी आनंदीला खेळवत होती. समर तिथेच बसून त्यांची मस्ती बघत होता. आनंदी त्याच्याजवळ आली. तिला तो काहीतरी सांगत खेळवायचा प्रयत्न करत होता पण तिचं मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. त्याने तिला गोष्ट सांगायचा, चित्र दाखवायचा प्रयत्न केला पण ती मात्र त्याला हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हती. शेवटी कंटाळून समर गप्प बसला. सुरभीने तिला झोपवलं.

ती समर जवळ आली. समरने तिचा हात हातात घेतला.

"बघितलं ना, काहीच मनासारखं होत नाही माझ्या. कितीही जवळ जायचा, शिकवायचा प्रयत्न केला तरी ही मुलगी रिस्पॉन्स देतच नाही. आई बाबांचं म्हणणं पटतंय मला. एक नॉर्मल मुल हवंच ना आपल्याला. आनंदीची जबाबदारी मी नाकारत नाहीये पण अजून एक मूल असायला काय हरकत आहे? आपण सगळे आहोत ना. होईल सगळं मॅनेज आणि तसंही तिच्यासाठी आयुष्य घालवण्यात काय अर्थ आहे सांग? शेवटी ती नॉर्मल तर होणारच नाही हे ऍक्सेप्ट करायला हवं आपण. बघ खरंच मनावर घेऊया आपण." समरने सुरभीला जवळ घेण्याचा प्रयत्न केला.

"असं कसं म्हणू शकतोस तू? अरे आनंदी आपली मुलगी आहे. तिला आपली गरज असताना आपण स्वार्थी व्हायचं? नाही ते शक्य नाही. अरे त्यात तिची बिचारीची काय चूक? मी दुसऱ्या मुलाचा विचारही करू शकत नाही आणि दुसरं मुलंही असच झालं तर? आता आनंदीच आपलं सर्वस्व." सुरभीने समरच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

"तुझं हेच मत असेल, तर मी काय म्हणू शकतो? पण तरीही सांगतोय विचार कर. भावनेच्या भरात त्या मुलीसाठी आपलं आयुष्य खर्ची करायचं की, थोडासा प्रॅक्टिकल विचार करून आनंदात राहायचं हे ठरव." समर रागाने निघून गेला

सुरभीला खूप वाईट वाटलं. एक सख्खा बाप आपल्या मुलीसाठी असा कसा विचार करू शकतो हेच तिला समजत नव्हतं. तिने समरला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला सुरभीचं म्हणणं मान्य नव्हतं

आता आई, बाबा, समर सगळ्यांनीच आनंदीच्या कुठल्याही गोष्टीत रस घेणं सोडून दिलं होतं. सुरभी आपल्या मतावर ठाम होती त्यामुळे सगळ्यांनाच तिचा राग आला होता. कोणीही तिला कुठलीच मदत करत नव्हतं. वर चीड चीड आणि राग राग करत होते.

आनंदीने काहीही चूक केली तरी तिला रागावणं , तिच्यावर चिडण वाढतच होतं. सुरभी खूपच त्रासली होती. हे सगळं मुद्दामून सुरू होतं हे तिला कळत होतं पण काहीच इलाज नव्हता. ती त्यांचं म्हणणं मान्य करणार नव्हती.

आनंदी मोठी होत होती. तिला शाळेत घालावं, चांगलं शिकवावं असं सुरभीला खूप वाटत होतं. तिने तिच्यासाठी शाळा आणि तिला समजून घेणारी काऊंसलिंग शोधायला सुरुवात केली.

तिला एका शाळेत तर घातलं पण आनंदी तिकडे अजिबात रमली नाही. बरेच प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही उलट सुरभीचा तिला शिकवण्याचा खटाटोप वायाच गेला. बरेच पैसे खर्च झाले पण आनंदीमध्ये काहीच सुधारणा होत नव्हती.

तिच्या वयाची समंजस मुलं बघितली की सुरभीच्या जीवाला लागायचं. लोकांचे टोमणे, सहानुभूती हृदयाला चरे पाडायची. बाहेरच्या लोकांचं ठीक होतं पण घरातली परिस्थीती सुद्धा काही बरी नव्हती.

घरात पूर्णपणे असहकार पुकारला होता. सुरभीला कोणीच काही मदत करत नव्हतं. उलट मुद्दाम जास्तीची कामे काढली जायची. टोमणे आणि किरकिर करून मानसिक खच्चीकरण तर रोजचं ठरलेलं होतं.

एकटीने आनंदीला सांभाळणं काही सोपी गोष्ट नव्हती पण सुरभीने हे शिवधनुष्य पेलायचं ठरवल होतच!

बराच रिसर्च केल्यावर तिला 'आधार' या संस्थेबद्दल कळलं. तिथे अश्याच मुलांना प्रेमाने आणि आपुलकीने शिकवलं जातं, असं समजल्यावर लगेच सुरभी आनंदीला घेऊन तिकडे गेली.

तिथल्या संचालिका सिंधूताई एक अगदी लघवी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्याशी बोलल्यावर तिला आधार वाटला

बाकीच्या मुलांची प्रगती बघून सुरभीच्या मनात एक आशा पल्लवित झाली पण आधीच्या अनुभवावरून तिच्या मनात अनेक संभ्रम होते.

'आनंदीच एडमिशन तर होणं शक्य होतं पण खरंच आपली आनंदी इथे रमेल का? इथे राहून ती काहीतरी शिकून आपल्या पायावर उभी राहू शकेल का? करावा का एक प्रयत्न?' शेवटी सुरभीने आनंदीला 'आधार' मध्ये घालायचं नक्की केलं

(पुढे काय होईल? आनंदी खरंच इथे रमेल का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.)

🎭 Series Post

View all