आनंदी हे जग सारे (भाग - १०)
©®स्मिता भोस्कर चिद्रवार
सुरभीने आपली अडचण गोरे काका आणि सिंधू ताईंना सांगितली. दोघांनाही खूप वाईट वाटलं. 'बघूया काय करता येईल ते. उद्या काहीतरी मार्ग काढू' असं सांगून दोघांनीही सुरभीचा निरोप घेतला. दोघं आत बोलत होते. सुरभीला धडधड होत होती.
'आपण उगीच सांगितलं का त्यांना? खरंच काही मार्ग निघेल का? आपण समरला सांगायला हवं होतं का पण काय उपयोग? तो तर धड बोलतही नाही आजकाल आपल्याशी आणि आनंदीशी तर तुसड्यासारखं वागतो. त्याची कोणीच नाही का ती?जाऊ दे मी आणि आनंदी घरात राहू नये असच त्या सगळ्यांना वाटतं पण मी हार मानणार नाही. माझी आनंदी स्वतः ची ओळख नक्कीच निर्माण करेल. त्यासाठी मी जे जे काही करता येईल ते ते नक्की करेन. एखादं भाड्याचं घर बघावं आसपास. थोडी फार सेविंग्ज आहेत आपली. मग आनंदी इकडे असते तोपर्यंत, एखादं काम करता येईल. आज वाट बघू. उद्या काय तो निर्णय घेऊन टाकावा.' सुरभी मनाशी विचार करत होती.
तो दिवस असाच काळजीत गेला. दुसऱ्या दिवशी सुरभीचे कान सिंधू ताई काय म्हणतात हे ऐकण्यासाठी आतुरलेले होते. सकाळपासून त्या कुठेच दिसत नव्हत्या. गोरे काका पण आज येणार नव्हते. सुरभी त्यांची वाट बघत होती.
बराच वेळ वाट बघितल्यावर एकदाच्या सिंधू ताई आल्या पण त्या कामातच होत्या. शेवटी सुरभी परत जाणार इतक्यात त्यांनी तिला बोलवलं. धडधडत्या हृदयाने सुरभी आत गेली. सिंधू ताई फोनवर बोलत होत्या. ती तशीच संकोचून उभी होती.
"अग बस ना सुरभी. किती टेन्शनमध्ये दिसतेयस. घे पाणी पी. तुझ्या घरच्यांबद्दल ऐकून खरंच खूप राग आला आणि वाईटही वाटलं बघ. किती गोड आहे आपली आनंदी? इतक्या गोड मुलीबद्दल त्यांना प्रेम वाटू नये? का तर ती नॉर्मल नाही? त्याचंच रक्त आहे ना ते? खरंतर मला त्यांना जाऊन चांगलं खडसवायच आहे पण तरीही गप्प बसले आहे मी. असे अनुभव अनेक ठिकाणी येतात पण तुझ्यासारख्या उचब्रू, सुसंस्कृत घरात हे असं वागणं? पण तू आजिबात काळजी करू नकोस. आता तू तिथे आजिबात राहू नकोस. हे बघ तू आम्हाला मुलीसारखी आहेस. गोरे अण्णांनी तुला दोन पर्याय दिले आहेत. एकतर तू त्यांच्या घरी आनंदी सोबत राहू शकतेस. तसंही त्यांच्याकडे कोणीच नाही आणि तुला ते मुलीसारखं मानतात. नाहीतर तू इकडे संस्थेत राहू शकतेस. मी राहते तिकडे तुझी सोय होऊ शकते. मला माहिती आहे तुला असच राहणं आवडणार नाही. तसंही आपल्या इथे सुपर वायझरची जागा ओपन आहे, तेव्हा तू ते काम करावस असं आम्हाला वाटतं. बाकी तुला तर सगळं माहिती आहेच. बाकी काही काळजी करू नकोस. आम्ही आहोतच. तुला हवं तर तू डीवोर्स घे. माझ्या ओळखीचे आहेत वकील. आपण कायद्यानं लढूया. तुझा आणि आनंदीचा हक्क तिला मिळेलच."
सुरभीने सिंधू ताईच्या पायावर डोकं ठेवलं.
"खरंच उपकार झाले तुमचे. माझं ओझचं हलक केलं तुम्ही. मी इथेच राहीन आणि कामही करेन मला जमेल तशी सगळीच कामं मी करेन आणि डीवोर्सचं म्हणाल तर मला सध्या काहीच नाही करायचं तसं. त्यांना हरवून काय मिळणार मला? त्यापेक्षा माझ्या लेकीचं भविष्य जास्त महत्त्वाचं आहे. मी आजच घरी बोलते. कदाचित समर मला समजून घेईल. नोकरी तर मी नक्कीच करेन. इथे पाठवायला समर नक्कीच तयार होणार नाही. भावनेच्या भरात मी घर सोडायचं म्हणत होते पण आता मला माझी चूक समजली आहे. समरच प्रेम आहे माझ्यावर आणि आनंदीवर. मला खूप आधार वाटला तुमचा. गोरे काकाना सुद्धा सांगा. मी उद्या बोलतेच फायनल." सुरभी आनंदाने म्हणाली. तिच्या मनात अजूनही एक वेडी आशा होती.
घरी जाताच सुरभीने समरला एकांतात गाठलं.
"ऐक ना समर, मला संस्थेत सुपर वायजरची नोकरीची ऑफर आहे. करू का जॉईन? म्हणजे दोन्ही काम होतील. आनंदीवर लक्ष ठेवता येईल आणि चार पैसे ही मिळतील? लोक तर किती चांगले आहेत. आपल्या आनंदीवर किती माया करतात? प्रेमाने समजून घेतात. किती फरक पडलाय तिच्यात बघतोस ना तू?"
"हो, हो तुला त्या लोकांचं प्रेम दिसतं आणि आमचं काय? एक मूल मागतोय तुझ्याकडे, कामात मदतही करत नाहीस की, आई बाबाही खुश नाहीत. सारखं आनंदी, आनंदी... त्या आनंदीला तिकडे आश्रमात ठेवून घेता का विचार त्यांना. ते लोक चांगले आहेत, तिची काळजी घेतात म्हणालीस ना तू? मग काय हरकत आहे? बघ विचार करून सगळेच प्रॉब्लेम सुटतील त्यामुळे." समरचं बोलणं ऐकून सुरभीची उरली सुरली आशाही मावळली. तिचा धीर सुटला. मनातला धबधबा पुन्हा एकदा डोळ्यांवाटे कोसळू लागला. तिला तसं बघून समर चिडला.
"झालं सुरू, सतत किरकिर आणि रडारड. तू नाहीतर तुझी ती पोरगी. एक झालं की एक. शी...कंटाळा आलाय मला. आजकाल घरी यावस वाटतं नाही मला. जा कर काय करायचं ते कर. तिकडेच राहिलीस तरी बरं. तुम्हा दोघींचा खर्च निघेल इतकं कमावशीलच तू. काही कमी जास्त लागलं तर मी आहेच समर्थ. बघ तुझं ठरलं की सांग. तशीही घरात असतेस किती वेळ? तिकडेच असतेस अर्धा दिवस आणि घरी आलीस तरी तेच. असून नसून नसल्यासारखीच... काय करायचं ते कर" समरच बोलणं तिच्या काळजावर घाव घालत होतं
तिचं काही ऐकून न घेता तो तिथून निघून गेला.
"काय झालं रे समर? मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता तुमचा? जाऊ दे काहीच उपयोग झाला नाही तुझं लग्न करून. ना तुला संसाराचं सुख ना मुला बाळांचं. आमचं तर काय विचारायलाच नको. या वयातही काय काय बघावं लागतंय? तुझ्या बायकोचं काहीतरी वेगळंच असतं. काहीच ऐकत नाही ती. ऐकल नाहीस ना आमचं आधी आता भोगा. आता काय म्हणणं आहे बाई साहेबांचं? द्या म्हणा ऑर्डर आम्ही आहोतच सगळं निस्तरायला."
समरच्या आईचं बोलणं ऐकूनही सुरभी गप्प राहिली. तसाही काही बोलण्यात अर्थ नव्हता.
समरच्या आईचं बोलणं ऐकूनही सुरभी गप्प राहिली. तसाही काही बोलण्यात अर्थ नव्हता.
"अग आई, बाईसाहेबांना नोकरी मिळाली आहे तिकडे. आता काय रान मोकळच. पोरीला तिकडे सोडून ऑफिस मध्ये ये म्हणतो तर नाही जमत. तिला तिकडेच आवडायला लागलं आहे आता. तिकडची माणसे खूप चांगली आहेत म्हणे. फार जीव लावतात. चांगलं शिकवतात." समर आईला सांगत होता.
"हो का? बरं आहे मग. आम्ही काय त्रास देतो नुसता. बाहेरचे लोकच तिला चांगले वाटतात. घरातले तिच्या चांगल्यासाठी बोलतात ते कायम वाईटच. करू दे काय करायचं ते. थोडे फार पैसे तरी मिळतील. नाहीतर त्या पोरीचा इतका खर्च. तू एकटा किती करशील? आणि इतकं करूनही काय फायदा सांग ना? त्या अवदसेपायी आयुष्य चाललय वाया माझ्या लेकाच..पण पर्वा आहे का कोणाला?" सुरभीला ऐकू जावं म्हणून मुद्दाम जोरात बोलत आई म्हणाल्या.
"अहो आई, काय बोलताय तुम्ही? आणि समर हा काय स्वर आहे बोलण्याचा? आनंदी ऐकते आहे. तिच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल? प्लीज तुम्ही दोघं हे सगळं आडून आडून बोलणं बंद करा आणि काय ते स्पष्ट बोला. आनंदीच्या भल्यासाठी कुठला निर्णय घेण्याचा मला काहीच अधिकार नाही का? आणि खरंतर तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यायला हवी पण ते तर दूरच राहिलं. मला सपोर्ट सुद्धा करत नाही तुम्ही कोणीच. ते परके लोक आपल्या लेकीला किती जीव लावतात बघा. एकदा तिथे या मग कळेल तुम्हाला किती काय काय शिकवता येईल आनंदीला. ती नक्की काहीतरी करून दाखवेल, आपलं नाव मोठं करेल. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया नक्कीच काहीतरी चांगलं होईल. मला काही वर्ष द्या. आनंदीला स्वतःच्या पायावर उभं करूया मग विचार करू दुसऱ्या मुलाचा. समर, येशील ना तू माझ्या बरोबर? आई, बाबा तुम्ही पण आहात ना आनंदी सोबत? आपण सगळे मिळून तिचं भविष्य उज्ज्वल करूया. देव आहेच आपल्या पाठीशी." सुरभी काकुळतीला येऊन बोलत होती. तिला शेवटची आशा होती. सगळ्यांची साथ तिला हवी होती.
(पुढे काय होईल? सगळे सुरभीसोबत एकत्र येऊन आनंदीला साथ देतील का? जाणून घेऊया पुढील भागात.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा