आनंदी हे जग सारे (भाग २)
©®स्मिता भोस्कर चिद्रवार.
समरच्या नवीन ऑफिसचं काम जवळ जवळ पूर्ण होत आलं होतं. स्वतः इंटेरियर डिझाईनर असल्यामुळे सगळंच एकदम छान झालेलं होतं. समर आणि त्याचा जिवश्च मित्र केतन दोघांनी मिळून बघितलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार होतं. समर इंटेरियर डिझाईनर तर केतन बिल्डर होता. दोघांचं मस्त जमायचं. कामही एकमेकांना पुरक असल्यामुळे दोघेही आपापल्या व्यवसायात एकमेकांना मदत करायचे.
मध्यमवर्गीय असल्यामुळे समरला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती, पण समर एक सज्जन, हुशार आणि जबाबदार तरुण होता. एकट्याने तर इतकी इंवेस्टमेंट शक्य नसल्यामुळे आता दोघांनी मिळून आपला स्वतंत्र व्यवसाय करायचं नक्की केलं होतं.
बहुतेक सगळं काम होत आलं होतं.फक्त स्टाफ अजून लागणार होता. त्यासाठी दोघेही इंटरव्ह्यू घेत होते.
केतनला लागणारा स्टाफ त्याला मिळाला होता, पण समर मात्र अजूनही त्याला हवा तसा स्टाफ शोधत होता. त्याच्या मनासारखं काम करून देणारं कोणी अजून भेटतच नव्हतं. त्यातल्या त्यात राज त्याला आवडला होता, पण तो पूर्ण वेळ काम करू शकणार नव्हता. दुसरं कोणीच मनाला पटत नव्हतं.
राजने त्याच्या मैत्रिणीचा, सुरभीचा रेफरन्स दिला. ती खूप हुशार आणि मेहनती होती, पण तिच्याकडे कुठलाही अनुभव नव्हता. समरला अनुभवी व्यक्ती हवी होती आणि त्यातल्या त्यात मुलगी तर नकोच होती.
सुरभीला कामाची खूप गरज होती. राज तिचा सिनियर म्हणून तिला समरला भेटायला घेऊन आला होता. काहीतरी कारण सांगून नाही म्हणायचं हे समरचं ठरलेलं होतं.
'काहीही एक्सपेरियन्स नाही' हे तर महत्वाचं कारण होतंच!
सुरभी एक साधी, सरळ पण अतिशय हुशार मुलगी होती. नुकतीच तिने तिची डिग्री पूर्ण केली होती. घरी दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ, बाबांची नोकरी साधारण, त्यामुळे लहानपणापासून तिने घराची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली होती. आता चांगली नोकरी मिळवून भरपूर पैसे कमवायचे आणि घरातल्या सगळ्यांना आनंद द्यायचा अशी तिची धडपड सुरू होती, पण काहीही अनुभव नसल्यामुळे तिला मनासारखी नोकरी मिळत नव्हती.
राज तिचा सिनियर होता. त्याच्या मनात तिच्याबद्दल आपुलकी होती. मनाच्या एका कोपऱ्यात प्रेमाची भावना सुद्धा होती, त्यामुळे राज सुरभीला हरतऱ्हेने मदत करायला तत्पर होता.
नाही..नाही... करत एकदाचा समर तिचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तयार झाला.
साधासा कॉटनचा गुलाबी कुर्ता आणि स्काय ब्लू जीन्स घातलेली सुरभी हसतमुखाने समर समोर आली. दिसायला फारशी सुंदर नाही, पण एक गोड हास्य नेहमी तिचा चेहरा सुंदर ठेवायचं. कुठल्याही मेकअप शिवाय येणारी मुलगी म्हणजे अजागळ अशीच कल्पना समरने केली होती. तसंही त्याला नाहीच म्हणायचं होतं त्यामुळे जुजबी प्रश्न त्याने विचारले.
सुरभीला समरचा मनसुबा लगेच कळला .ती जायला निघाली.
"मी एक दोन दिवसांत तुम्हाला कळवतो." समरने बाय करत सांगितलं.
"माफ करा सर. जरा स्पष्टच बोलते . सरळ नाही म्हणून सांगा ना तुम्ही. स्पष्ट दिसतंय तुम्हाला काहीही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही इतके साधे प्रश्न विचारलेत आणि मुख्य म्हणजे माझं एकही डिझाईन बघितलं नाही. दुसऱ्या कोणाला घेतलं असेल तर सांगायचं ना तसं. मला माहिती आहे, मी नवीन आहे पण माझं काम तर बघा आणि नसेल इच्छा तर बोलावू तरी नका, मी बाहेरगावी गेले होते. तिथलं काम अर्धवट टाकून इतक्या दुरून यायचं हे सोपं नाही माझ्यासाठी. तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद! आणि एकच सांगते पुन्हा असं कोणासोबत वागू नका. येते मी. आय मीन जाते मी." सुरभीचे भरून आलेले डोळे समरला बरच काही सांगून गेले. त्याला स्वतःची लाज वाटली.
"एक मिनट, मिस सुरभी. माफ करा पण तुमचं म्हणणं पटलं आहे मला. खरंतर हे काम मला एखाद्या अनुभवी व्यक्तीला द्यायचं होतं आणि मुलगा हवा होता मला कामासाठी. राजने तुमची शिफारस केली त्यामुळे नाईलाजाने मी तुम्हाला बोलावलं. माझी चूक मला समजली आहे. मी आता तुमचा इंटरव्ह्यू घेतो." समरने आपली चूक कबूल करून सुरभीचा व्यवस्थित इंटरव्ह्यू घेतला.
तिचं बोलणं, तिचा कॉन्फिडन्स आणि मुख्य म्हणजे तिचे डिझाईन्स बघून तो अगदी भारावून गेला.
"मिस सुरभी खरंच तुमचे डिझाईन्स मला खूप आवडले. इतक्या दिवसांपासून मी शोधत असलेली व्यक्ती मला मिळाली. एखादा अनुभवी सुद्धा करू शकणार नाही, असं काम तुम्ही करून दाखवलं आहे. मी तुम्हाला जॉब ऑफर करतो आहे. कामाच्या वेळा आणि पगार याचे डिटेल्स वाचून घ्या. तुमचा डिसिजन मला लगेच कळवला तर बरं होईल. शेजारच्या केबिनमध्ये बसून तुम्ही विचार करा. मी खायला मागवतो आपल्यासाठी. सगळं जुळून आलं तर उद्यापासून जॉईन व्हा." समर अगदी इंप्रेस झाला होता.
सुरभी दुसऱ्या केबिनमध्ये बसली. पर्समधली पाण्याची बाटली काढून तिने त्यातलं पाणी प्यायलं. एसीच्या गारव्यात तिला जरा बरं वाटलं. सुरभीला एकदम आठवलं, आई बाबा काळजी करत असतील.
तिने घरी फोन केला. जुजबी बोलून तिने फोन कट केला.
आता ती विचारात पडली. सुरभीची खरंतर इच्छा नव्हती. समरचं वागणं तिला आवडलं नव्हतं, पण कामाची तर गरज होती. पैसेही चांगले मिळणार होते आणि राजही होता सोबतीला.
"हो म्हणाव का? सध्या काही दिवस करूया. दुसरं काही काम मिळेपर्यंत. पगार तर चांगला देत आहेत. राज आहेच काही गरज पडली तर. शिवाय घरापासून फारसं दूर नाही. सध्या वर्किंग आवर्स पण कमी आहेत. आपले संध्याकाळचे क्लासेस पण सुरू ठेवता येतील. बाबांच्या ऑपरेशनचं सांगून टाकू का? तेव्हा सुट्टी लागेल. उगीच कट कट करायला नको पुन्हा. तसंही स्वतः ला मोठा शहाणा समजतो तो समर. आधी उगीच नाटकं केली पण माझं काम बघून कसा वठणीवर आला? एकदा राजशी बोलून मग काय ते फायनल सांगू." तितक्यात हातात समोसे, इडली, वडा, पेस्ट्री आणि जुस घेऊन समर आत आला.
"मिस सुरभी, हे घ्या. मला माहिती नव्हतं तुम्हाला काय आवडतं ते, पण जवळ हेच मिळतं आणि मला आवडतं म्हणून मी मागवलं . दुसरं काही हवं असेल तर सांगा. तुम्ही हो म्हणाल, अशी आशा आहे. माझं वागणं तुम्हाला चमत्कारिक वाटेल. खडूस म्हणा मला हवं तर पण आधीच सगळं विसरून विचार करा. मला पुढच्या आठवड्यापासून ऑफिस सुरू करायचं आहे, म्हणून तुमचा निर्णय लगेच कळवा असं म्हणालो पण विश्वास ठेवा तुमचं काम चांगलं असेल, तर माझ्याकडून नेहमीच तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळेल आणि मी खरंच स्वतः ला अतीशहाणा समजणारा खडूस बॉस नाही बरं पण माझ्यासाठी सुद्धा हे सगळं नवीन आहे आणि त्यामुळे ही चूक झाली माझ्याकडून. मला तुमच्या राजसारखा मित्र समजा आणि योग्य तो डिसिजन घ्या."
सुरभी आपल्याच विचारात हरवली होती. अचानक समरलासमोर बघून ती दचकली. 'आपल्या मनातलं याला कसं अचूक कळलं?'
"अरे सर, तुम्ही का घेऊन आलात हे? खरंच गरज नव्हती या सगळ्याची आणि इतकं सगळं मी नाही संपवू शकणार. तुम्हाला आवडतं ना मग तुम्हीसुद्धा घ्या माझ्यासोबत. मला आधी वाईट वाटलं होतं तुमच्या वागण्याचं पण तुमची बाजू कळली आणि तुम्ही चूक कबूल करून माझं ऐकून घेतलत ना यातच सगळं आलं. तुमची ऑफर चांगली आहे. मी लेटर वाचलं आहे. बाकी सगळं ठीक आहे पण एक अडचण आहे, माझ्या वडिलांचं ऑपरेशन आहे पुढच्या महिन्यात तेव्हा मला सुट्टी लागेल. बाकी मी उद्यापासून जॉईन होण्यासाठी तयार आहे. मी नवीन आहे त्यामुळे मला सांभाळून घ्याल अशी आशा करते." सुरभी आपली बाजू क्लिअर करते
"वाह..! मला खूप आनंद झालाय. वेलकम इन् अवर फॅमिली. आपण एकत्र मस्त काम करू. तुमचा मित्र राज आहेच सोबतीला. आता दोघं मिळून हे संपवू आणि सुट्टीच होईल मॅनेज. आठ-दहा दिवस जमेल. तारीख आधी कळवून ठेवा म्हणजे तसं प्लॅन करता येईल. उद्या सकाळी पोहोचाल ना वेळेवर? दुपारी एका क्लाएंटसोबत मीटिंग आहे. आपण डिस्कस करू सकाळी. थोडं थांबा, मी फॉर्म्यालिटीज पूर्ण करून देतो लगेच." समर
तशी सुरभीने मान डोलावली.
समर गेल्यावर सुरभीने राजला आनंदाची बातमी दिली. राज पण खूप खुश झाला. आता सुरभीसोबत एकत्र काम करायला मिळेल म्हणून त्याला खूप आनंद झाला होता. समर सुद्धा खुश होता. त्याला हवा तसा सगळा स्टाफ त्याला मिळाला होता. ऑफिस सुरू होण्याआधीच कामही मिळालं होतं. पुढच्या आठवड्यात ऑफिसचं इनोग्रेशन होणार होतं. आता अगदी शांत मनाने त्याला तयारी करता येणार होती.
समर सगळे पेपर्स तयार करून सुरभीची सही घेण्यासाठी केबिनमध्ये आला. बघतो तो काय? सुरभी तिथे नव्हती.
(कुठे गेली असेल सुरभी अचानक? जाणून घेऊया पुढील भागात!)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा