Login

आनंदी हे जग सारे ( भाग 3 )

सुरभी आनंदात होती. चांगला जॉब, चांगला पगार मिळणार होता. बाबांच्या ऑपरेशनची व्यवस्था सुद्धा झाली होती. आता एकदा बाबा बरे झाले की, बस! मग पूर्णतः कामावर फोकस करायचा असं मनात ठरवत असतानाच पुन्हा तिचा फोन वाजला."आताच तर बोलले. मग परत आईचा फोन? आईला पण चैन पडत नाही." असं म्हणत तिने फोन घेतला."सरू.. सरू... पटकन ये ग. बाबा कसतरी करतायेत. मला काहीच कळत नाहीये. काय करू ग?" आईचा रडवेला आवाज ऐकून सुरभी सुद्धा घाबरली."आई, आई हे बघ.. आधी शांत हो. बाबांना पाणी दे. मी अँब्युलन्स बोलावते. तू बाबांना घेऊन लगेच आपल्या डॉक्टरकडे जा. मी हॉस्पिटलमध्ये येते डायरेक्ट. निघालेच बघ. काळजी नको करू." सुरभी निघता निघता बोलली.तिने लगेच अँब्युलन्स घरी पाठवली आणि शेजारी फोन केला. निमा काकू आणि केशवला आई बाबांच्या मदतीला जायला सांगितलं. टेन्शनमध्ये समरला काहीही न सांगताच ती लगेच हॉस्पिटलमध्ये गेली. आई बाहेर बसली होती. निमा काकू तिला धीर देत होत्या. सुरभीला बघताच आईचा बांध फुटला. सुरभीने आईला जवळ घेतलं.
आनंदी हे जग सारे (भाग ३)

©®स्मिता भोस्कर चिद्रवार.

सुरभी आनंदात होती. चांगला जॉब, चांगला पगार मिळणार होता. बाबांच्या ऑपरेशनची व्यवस्था सुद्धा झाली होती. आता एकदा बाबा बरे झाले की, बस! मग पूर्णतः कामावर फोकस करायचा असं मनात ठरवत असतानाच पुन्हा तिचा फोन वाजला.

"आताच तर बोलले. मग परत आईचा फोन? आईला पण चैन पडत नाही." असं म्हणत तिने फोन घेतला.

"सरू.. सरू... पटकन ये ग. बाबा कसतरी करतायेत. मला काहीच कळत नाहीये. काय करू ग?" आईचा रडवेला आवाज ऐकून सुरभी सुद्धा घाबरली.

"आई, आई हे बघ.. आधी शांत हो. बाबांना पाणी दे. मी अँब्युलन्स बोलावते. तू बाबांना घेऊन लगेच आपल्या डॉक्टरकडे जा. मी हॉस्पिटलमध्ये येते डायरेक्ट. निघालेच बघ. काळजी नको करू." सुरभी निघता निघता बोलली.

तिने लगेच अँब्युलन्स घरी पाठवली आणि शेजारी फोन केला. निमा काकू आणि केशवला आई बाबांच्या मदतीला जायला सांगितलं.

टेन्शनमध्ये समरला काहीही न सांगताच ती लगेच हॉस्पिटलमध्ये गेली. आई बाहेर बसली होती. निमा काकू तिला धीर देत होत्या. सुरभीला बघताच आईचा बांध फुटला. सुरभीने आईला जवळ घेतलं.

"आई, आधी शांत हो बरं असं करून कसं चालेल? काकु तुम्ही आलात, हे खूप चांगलं झालं . काही बोलले का डॉक्टर?"

"डॉक्टर काहीच बोलले नाहीत ग अजून. आल्या आल्या अण्णाना आत घेऊन गेलेत. तो केशव आहे तिकडे फॉर्म भरतोय. तू बघ काय म्हणतायत ते डॉक्टर. मी आहे इथे वहिनी जवळ." निमा काकू म्हणाल्या तशी सुरभी लगेच डॉक्टराना भेटायला गेली.

बाबांची ट्रीटमेंट इथेच सुरू होती. बाबांचे ते मित्र होते, त्यामुळे डॉक्टर ओळखीचे होते. त्यांनी काही न बोलता सुरभीला बसायला सांगितलं आणि फोनवर कोणाशीतरी गंभीरपणे बोलत होते.

सुरभीचं टेन्शन वाढत होतं. शेवटी एकदाचं डॉक्टरांचं बोलणं संपलं आणि "मी येतो थोड्या वेळात. मग सगळं सांगतो. काही टेस्ट करायच्या आहेत." असं म्हणून सुरभीला काहीच बोलायची संधी न देता ते बाहेर निघून गेले.

सुरभीला काहीच सुचत नव्हतं. ती बाहेर आली. आई, काकू आणि केशव तिची वाटच बघत होते.

"अग काय म्हणले डॉक्टर? ठीक आहे ना सगळं. हे बघ त्यांना म्हणावं पैशांची सोय झाली आहे. ऑपरेशन लगेच करून टाका. काय करायचं ते करा, पण बाबांना बरं वाटू दे."

"हो. ठीक आहे सगळं. काही टेस्ट करायच्या आहेत असं म्हणत होते डॉक्टर. काळजी करू नका म्हणाले आहेत. केशव असं कर, तू आई आणि काकूला घरी घेऊन जा. मी थांबते इकडे. वेळ लागेल सगळ्या टेस्ट होईपर्यंत. मी फोन करते. निघा तुम्ही." सुरभी म्हणाली. आईला उगीच टेंशन येईल म्हणून मुद्दाम सगळं काही ठीक आहे असं तिने सांगितलं.

"ताई, मी दोघींना घरी सोडतो आणि येतो लगेच परत. इथे कोणीतरी हवं तुझ्यासोबत." केशव म्हणाला. सुरभीला अगदी मोठ्या बहिणीसारखं जपत होता तो. दोन्ही कुटुंब अगदी जवळच्या नात्याने बांधलेली होती. अगदी घरच्या सारखे संबंध होते त्यांचे!

"अग त्याची काही गरज नाही. आम्ही दोघी रिक्षाने जातो घरी. केशवला थांबू दे, इथे तुझ्यासोबत. घरात दहा हजार होते ते मी आणले सोबत. केशवकडे आहेत. अजून बँकेत दोन लाख आहेत एफ. डी. केलेले. मी तुझ्या काकांना सांगते. ते आणतील काढून. नेमके कल्याणीकडे गेलेत ते. येतील संध्याकाळपर्यंत. केशव, चल आम्हाला रिक्षात बसवून दे आणि काळजी घे ताईची. काहीतरी खायला आण आणि दोघंही खाऊन घ्या. आणि फोन कर. मी वहिनींना आमच्या घरीच घेऊन जाते आहे. एकट्या उगीच काळजी करतील त्या." निमा काकू म्हणाल्या

तसं सुरभीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जवळ घेऊन काकू आणि आई घरी निघाल्या. आई तयारच नव्हती पण काकूंनी जबरदस्ती तिला घरी नेलं.

केशव दोघींना रिक्षात बसवून आला. सुरभी सैरभैर झाली होती.

"ताई, सोहमला कळवायला हवं ना. मी करू का त्याला फोन?"

सुरभीचा लहान भाऊ सोहम दुसऱ्या शहरात इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. सुरभीप्रमाणे तो सुद्धा अगदी समंजस होता. केशव आणि सोहम अगदी घट्ट मित्र होते.

"नको रे केशव. उगीच काळजी करेल तो आणि तसंही तो आज संध्याकाळी येणारच आहे. दोन दिवस सुट्टी आलीय ना जोडून. मग उगीच प्रवासात काळजी नको त्याला." सुरभी म्हणाली

तितक्यात सुरभीचा फोन वाजला. आईचा फोन होता.

"काय झालं ग? बोलले का डॉक्टर काही? बाबांना भेटलीस का? मी येऊ का? इकडे निमाताई मला आराम करायला लावत आहेत. जेऊ घातल त्यांनी मला जबरदस्ती. तू काही खाल्ल का? केशव आणि तू खाऊन घ्या. सोहमचा फोन आला होता. मी त्याला काही सांगितलं नाही. तो निघेलच थोड्या वेळात इकडे यायला. काहीतरी सरप्राइज आहे म्हणत होता. सगळं नीट असावं ग त्याचं आणि तू इंटरव्ह्यूला गेली होतीस तिकडे काय झालं?" आई अजूनही काळजीत होतीच!

"बरं केलंस. सोहमला काही सांगितलं नाहीस ते. आल्यावर कळेलच त्याला आणि आई अग आनंदाची बातमी आहे. मला जॉब मिळाला आणि तो राज आठवतो ना तुला, माझा सिनियर? तो पण आहे तिकडे माझ्यासोबत. पगार चांगला आहे. उद्यापासून या म्हणालेत, पण बघते आता बाबांचं कसं आहे त्यावर ठरवते." आईशी बोलता बोलता सुरभीला आपण समर सरांना काहीचं न सांगता अचानकपणे निघाल्याच आठवत

"अग आई, तुझा फोन आला आणि मी गडबडीत निघाले. त्या सरांना काही न सांगता. त्यांना कळवायला पाहिजे. उगीच गैरसमज होईल नाहीतर. पण कसं कळवू? माझ्याकडे नंबर पण नाही त्यांचा. राजने ॲड्रेस दिला होता आणि मी गेले तिकडे" सुरभी म्हणाली

"अग त्या राजकडून घे की नंबर आणि कळव त्यांना. उगीच प्रॉब्लेम नको. चांगली नोकरी आहे म्हणतेस ना आणि आता सोहम येतोच आहे, तर तू जाऊ शकतेस पण फोन कर आठवणीने. सोहम आला की, आम्ही दोघं येतोच. पण कळव काय ते. नुसती हुरहूर लागून राहिली आहे ग. मन शांत नाही अजिबात." आई म्हणाली

"आई बरोबर बोलतेय. राजकडून नंबर घेऊन समरला कळवाव इतकं साधं सुचू नये आपल्याला? लगेच फोन करते राजला" सुरभी मनात म्हणाली आणि राजचा नंबर डायल करणार इतक्यात डॉक्टरांनी सुरभीला आत बोलावलं. ती पटकन धावली.

डॉक्टर गुप्ते तिच्या बाबांचे मित्र होते आणि त्यांचे अगदी घरच्यांसारखे संबंध होते. सुरभीला ते त्यांची मुलगीच मानायचे.

सुरभी आत येऊन बसली पण गुप्ते काकांचं लक्षच नव्हतं.

त्यांचा चेहरा नेहमीसारखा प्रसन्न नव्हता. खरंतर ते नेहमी हसतमुख असायचे. त्यांच्याशी बोलूनच पेशंट अर्धा बरा होत असेल, असं सुरभी नेहमी त्यांना म्हणायची, पण आता ते काहीतरी वेगळेच भासत होते तिला.

बराच वेळ असाच गेला. शेवटी सुरभी बोलली," काका, बरे आहात ना तुम्ही? बाबा कसे आहेत? नक्की काय झालंय त्यांना? टेस्ट झाल्या का? रिपोर्ट कसे आहेत? मी भेटून येऊ का त्यांना? मला बघितलं कीz बरं वाटेल लगेच. आई पण काळजी करतेय कधीची. सांगा ना काय ते?" सुरभी अगदी कासावीस होऊन बोलत होती

"सुरभी, बेटा शांत हो. हे पाणी घे. मला सांग वहिनी कुठे आहेत? सोहम येणार आहे का? सगळ्या टेस्ट झाल्या आहेत वसंताच्या." डॉक्टर गुप्ते म्हणाले

"आईला मी घरी पाठवलं आहे. ती फार काळजी करते ना. त्रास होतो मग तिला. आमच्या शेजारच्या काकू आहेत सोबतीला. त्यांचा मुलगा केशव आहे इथे माझ्यासोबत. सोहम निघतोय आता यायला. संध्याकाळपर्यंत पोहचेल. त्याला काही सांगितलं नाहीये. दोन दिवस सुट्टी आहे म्हणून तो येतोय. काका काहीतरी लपवताय तुम्ही. काय ते सांगा खरं..खरं! तुमचा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय." सुरभी काकुळतीने म्हणाली

"हे बघ, बेटा अजून काही रिपोर्ट्स यायचे आहेत. संध्याकाळी कळेल. तू असं कर घरी जा. संध्याकाळी सोहम आला की, तुम्ही दोघं या मग बोलू. वहिणींना घरीच राहू दे. मला खूप भूक लागली आहे. मी जेवायला जातोय आणि नंतर राऊंडला जायचं आहे. वसंताच्या टेस्ट सुरू आहेत त्यामुळे भेटता येणार नाही आता. निघ तू लगेच." डॉक्टर गुप्ते सुरभीची नजर चुकवत बोलले आणि ती काही बोलायच्या आतच केबिनबाहेर निघून गेले.

नक्की काहीतरी झालं होतं. गुप्ते काका काहीतरी लपवत होते, हे सुरभीच्या लक्षात आलं होतं. आधी म्हणाले सगळ्या टेस्ट झाल्या आहेत, नंतर म्हणाले अजून टेस्ट सुरू आहेत? नक्कीच काहीतरी होतं जे आपल्यापासून लपवलं जात आहे याची तिला जाणीव झाली होती.

(नक्की काय झालं असेल? जाणून घेऊया पुढील भागात!)

🎭 Series Post

View all