आनंदी हे जग सारे (भाग - ५)
©®स्मिता भोस्कर चिद्रवार .
रंजनाबाई नको नको म्हणत असतानाही केशव त्यांच्या सोबत आलाच! निमा ताई आणि सुरेशराव सुद्धा यायला तयार होते पण रंजना बाईंनी त्यांना येऊ दिलं नाही.
दोघं हॉस्पिटलमध्ये पोचले. आईला बघताच सुरभी आणि सोहम तिच्या कुशीत शिरून रडायला लागले.
"अरे काय हे? लहान आहात का दोघं अजून? आई दिसली की, तिच्या कुशीत शिरून रडायला? बाबा कसे आहेत? गरम गरम उपमा आणलाय त्यांच्यासाठी. पथ्य असतील ना त्यांना आणि तुमच्या दोघांसाठी जेवण आणलय. तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत मी बाबांना उपमा देते आणि तू काय रे डायरेक्ट इकडेच आलास आणि सरप्राइज की काय होतं ना ते? सांग लवकर. बाबा कुठल्या रूममध्ये आहेत? उपमा थंड होतोय." रंजना बाई म्हणाल्या
(आपला नवरा अगदी लवकर बरा होऊन घरी येणार अशी खोटी आशा त्या मनाशी बाळगून होत्या)
सुरभी आणि सोहम आईला बघून अजूनच तुटून गेले. आईला वास्तवाची जाणीव कशी करून द्यायची हेच त्यांना कळत नव्हतं.
"आई, अग बाबांना काही खायची परवानगी नाहीये. आम्हीही खाल्लंय आणि खूप आनंदाची बातमी आहे. मला चांगली नोकरी मिळाली आहे. पगार चांगला आहे. कंपनी पण खूप छान आहे." आपलं दुःख आईपासून लपवत सोहम भरल्या गळ्यानी बोलला
"बाळा पांग फेडलेस आज. देवा खरंच तुझी खूप कृपा आहे. आमच्या लेकरांवर असाच नेहमी तुझा आशिर्वाद असूदे. अरे बाबाना सांगितलंस का? किती आनंद होईल त्यांना. लगेच खडखडीत बरे होतील ते आता. गुप्ते काका कुठे आहेत? काय म्हणतायेत ते कधी सोडणार बाबांना? चला ना लवकर. मला तुमच्या बाबांना भेटायचं आहे." रंजनाबाई लेकरांच्या प्रगतीने आनंदल्या.
सुरभीला रडू आवरत नव्हतं. आईसमोर आपलं दुःख लपवण शक्य नव्हतं, म्हणून मुद्दाम ती औषधं आणायची आहेत म्हणून गेली. बाथरूममध्ये जाऊन तिने आपले रोखलेले अश्रू वाहू दिले.
सोहम सुद्धा डॉक्टरांना भेटून येतो म्हणून आईपासून दूर गेला. आईपुढे उभं राहणं दोघांनाही शक्य नव्हतं.
सुरभी आणि सोहम डॉक्टर गुप्तेंच्या केबिनमध्ये गेले. आईला कसं सांगायचं हे त्यांना समजत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी रंजना बाईना बोलावलं.
"काय म्हणताय भावजी? कसे आहात? खूपच बिझी झालात हो तुम्ही? किती दिवसात घरी आला नाहीत. आता जेवायलाच या. आनंदाची बातमी आहे. दोन्ही लेकरांना चांगली नोकरी मिळाली आणि तुमच्या मित्राला कधी सोडताय घरी? जरा सक्तीची विश्रांती घ्यायला सांगा त्यांना. अजिबात स्वस्थ बसत नाहीत. जेवणाचे काय पथ्य आहेत तेही सांगा. मी घेईन काळजी. आता भेटू द्याल का त्यांना? सांगा कुठल्या रूममध्ये आहेत ते. मला त्यांना आनंदाची बातमी द्यायची आहे."
"वहिनी, बसा जरा. हे पाणी घ्या. शांत होऊन ऐका. अहो सगळंच आपल्या हातात नसतं. देवापुढे आपण हतबल आहोत. वसंताला हार्ट अटॅक आला होता आणि तो खूप मेजर होता. पहिला आणि शेवटचा...तो आता मृत्यूशी झुंजतोय. वेंटीलेटर सुरू आहे तोपर्यंतच त्याचे श्वास सुरू आहेत पण आपण आता काहीच करू शकत नाही. फक्त त्याचा त्रास वाचवू शकतो. वहिनी त्याला मुक्त करा. त्याला जाऊ द्या..." डॉक्टर गुप्ते कसंबसं बोलले
इतका मोठा डॉक्टर पण आज त्याच्याही डोळ्यात पाणी होतं.
"हे काय बोलताय तुम्ही? अहो असं कसं होईल? दुसऱ्या कोणाचे रिपोर्ट असतील हो ते. मला घेऊन चला त्यांच्याजवळ. लेकरांना आणि मला बघितलं की, बघा पटकन उठून बसतील. तुम्ही मित्र गंमत करता नेहमी पण अशी जीवघेणी गंमत कोणी करतं का? ते काही नाही, अहो इतके मोठे डॉक्टर तुम्ही. तुम्हाला काय अशक्य आहे? काय वाटेल ते करा पण ह्यांना बरं करा. डॉक्टर काहीही करा.." रंजनाबाई हात जोडून डॉक्टरांना विनवत होत्या
सुरभी आणि सोहम आईजवळ गेले. दोघेही आईच्या कुशीत शिरून रडायला लागले
"आई, अग काका खरंच बोलतायत. बाबा, आपले बाबा देवाघरी जायला निघाले ग."
"वहिनी, अहो मला कळतंय तुमचं दुःख पण देवाला त्याची जास्त गरज आहे आता. वरून जरी कळत नसलं तरी त्याचा त्रास एक डॉक्टर म्हणून मला कळतोय. माझी तुम्हा तिघांना कळकळीची विनंती आहे की, त्याला सुखाने जाऊ द्या. अहो एक टक्का जरी आशा असती तरी मी असं नसतो म्हणालो पण खरंच काहीच शक्यता नाहीये. जितका वेळ आहे तितका त्याच्यासोबत घालवा. छान बोलत रहा. आनंदी राहा. कोणाला बोलवायचं असेल तर बोलावून घ्या." डॉक्टर गुप्तेनी शेवटचं सांगितलं.
तिघेही धाय मोकलून रडले. गुप्ते सुद्धा रडत होते. काही वेळ गेल्यावर तिघे जरा शांत झाले. अश्रूंचा झरा थोडा कमी झाला.
"सोहम आत्या, काका, मावशी सगळ्यांना फोन करून काळव. पोरांनो आता रडायचं नाही. बाबांना आवडणार नाही आपण रडलेल. चला, त्यांच्या जवळ जाऊ आपण. त्यांचा प्रवास सुखरूप होवो अशी प्रार्थना करू आपण. आता तेच आपल्या हातात आहे." रंजना बाईंचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
मुलांना आईच्या धैर्याच खूप कौतुक वाटलं. सगळ्यांनी डोळे पुसले.
"आज सकाळी तू गेलीस ना सुरभी तर बाबानी मला जवळ बसवून घेतलं. जुन्या सगळ्या गोष्टी आठवत राहिले. भरभरून बोलत होते. अगदी निर्वाणीच बोलायला सुरुवात केली मध्येच. 'मुलांची काळजी घे. आपली मुलं खूप गुणी आहेत. आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी आनंदाची पूर्ती म्हणजे आपली लेकरं आणि तू पण मला किती साथ दिलीस. खरंच किती नेटानं केलास संसार. कोणाची मदत नाही, साधारण परिस्थीती, नेहमीच पैश्यांची भासणारी चणचण पण तुझी साथ लाभली आणि आपला संसार किती सुखाचा झाला. खरंच सुखी आहेस ना तू? की मलाच आपलं वाटतं? माझ्यानंतर पण तुम्ही सगळ्यांनी असच नेहमी आनंदात राहायचं. वचन दे मला.' असं बोलत राहिले. मी तर अगदी धास्तावले ग. म्हणूनच फोन करत होते मी तुम्हा दोघांना. माझा हात हातात घेतला, देवापुढे घेऊन गेले मला. दिवा लावला, हात जोडले आणि कोसळले एकदम. काहीच सुचलं नाही मला पण हे सगळं जाणवलं बहुतेक त्यांना. म्हणूनच माझ्याकडून वचन घेतलं त्यांनी. त्यामुळे आता मला कितीही त्रास झाला तरीही माझं वचन मला पाळायलाच हवं. तुम्हीही माझी साथ द्याल मला खात्री आहे." आईचं बोलणं ऐकून मुलं गहिवरली. डॉक्टर गुप्तेनी डोळे पुसले.
सोहम सगळ्यांना फोन करायला बाहेर गेला. बाहेर केशव आणि त्याचे आई, बाबासुद्धा होते. सोहमला बघतच काकू रडू लागल्या. केशवच्या आणि काका काकूंच्या मिठीत सोहमच्या हृदयायाचा बांध पुन्हा फुटला.
केशवने आणि सुरेश रावांनी नातेवाईकांना फोन केले. तसे फारसे कोणी नातलग नव्हते त्यांचे. जे जवळचे होते त्यांना कळवणे झाले.
सुरभीने फॉर्मवर सही केली आणि सगळे वसंतरावांकडे गेले. रंजनाबाईंनी वसंत रावांना देवाचा अंगारा लावला. त्यांचं डोकं मांडीवर घेतलं. मुलं त्यांच्या पायाशी बसली.
"अहो, ऐकलात का? तुमच्या सोमूला नोकरी लागली, खूप छान कंपनी आहे. नाव काढलं पोरांन आणि आपली सरू तर किती सालस आहे. तिच्याच पावलावर पाऊल ठेवून आता सोहम पण किती समजूतदार झालाय. सुरभीची पण छान नोकरी सुरू होईल आता. दोन्ही मुलं त्यांच्या पायावर उभी आहेत आपल्याला अजून काय हवं? इतकी गुणी मुलं असणं हेच खरं समाधान आपलं." डोळ्यातून वाहणारे अश्रू ढाळत रंजनाबाई बोलत होत्या.
"बाबा, मला आशिर्वाद द्या. तुमच्यासारखं व्हायचं आहे मला. ताई सारखं सगळं सांभाळून आनंदी राहायला शिकायचं मला." सोहम बाबांच्या पायावर डोकं ठेवून रडत होता.
"तुमची शिकवण आयुष्यभर पुरेल बाबा, तुम्हीच आमचा खरा आधार." सुरभीला स्वतःला आवरण कठीण होत होतं.
तिघेही अगदी मनातलं सगळं बोलत होते. जुन्या आठवणी काढत होते. डॉक्टर गुप्ते सुद्धा त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी करत होते. वसंतरावांचा चेहरा समाधानी दिसत होता.
सुरेशराव , केशव आणि निमा ताई सुद्धा गहिवरून बोलत होते.
काहीवेळाने, वसंतरावांचा चेहरा अधिकच आनंदी दिसू लागला. मॉनिटरवर एक सरळ रेषा दिसू लागली.
डॉक्टरांनी तपासले आणि "वसंता..." अशी जोरात आर्त हाक मारली
(पुढे काय होईल? वसंतरावांच आकस्मिक जाणं सगळे स्वीकारतील का? पाहूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा