आनंदी हे जग सारे (भाग - ६)
©® स्मिता भोस्कर चिद्रवार.
वसंतरावांच जाणं सगळ्यांसाठीच धक्कादायक होतं. काळ कोणासाठी थांबत नाही आणि तो काळच सगळ्या जखमांवरच औषध असतं. पंधरा दिवस गेले. सगळे विधी पार पडले. पाहुणे सुद्धा आपापल्या घरी निघून गेले. तिघांचीही अवस्था नाजूक होती. घर खायला उठलं होतं.
सुरभी आणि सोहम आईच्या मांडीवर झोपले होते. दोघांच्या डोक्यावरून हात फिरवत रंजना बाई अश्रू गाळत होत्या.
"आई, खूप त्रास होतोय ग. शेवटचं बोलताही आलं नाही मला बाबांशी. खूप अपराधी वाटतंय. असं वाटतंय सोडून द्यावं शिक्षण. त्याच्यामुळेच मी बाबांपासून दूर गेलो.." सोहम स्वतःला खूप अपराधी समजतं होता.
"नाही रे बाळा, हे फक्त आपलं प्रारब्ध! आणि बाबांची किती इच्छा होती तू इंजिनीयर होऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करावस आणि ते तू पूर्ण करणार आहेस. आतापर्यंत जसे छान मार्क्स मिळवलेस आणि आताही इतकी छान नोकरी मिळाली आहे ती घालवणार का तू हातची? थोडेच दिवस तर राहिलेत आता. तू त्यांची इच्छा पूर्ण कर. सगळं विसरून नव्याने अभ्यास कर आणि इंजिनियर हो. तरच बाबांच्या आत्म्याला शांती मिळेल. ते काही नाही तू उद्याचा उद्या जा." रंजनाबाई म्हणाल्या
नाईलाजाने सोहम जायला निघाला.
"अग बेटा, आता तू ही नोकरी सुरू कर. तो साहेब तुझा त्याने गैरसमज तर करून घेतला नसेल ना. बघ फोन कर त्याला आधी."
"हो ग, सगळं इतकं अचानक घडलं की काही सुचलचं नाही मला पण तुला एकटीला सोडून मी कधी जाऊ ग कामाला?" सुरभी बोलत होती
तितक्यात नीमा काकू आत येत म्हणाल्या, "अग तू वहिनीची अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. वहिनी मला लोणचं आणि पापड करायचे आहेत. चला बरं मदतीला माझ्या आणि आनंदाची बातमी आहे. कल्याणीला दिवस गेलेत. आपण आजी होणार. तिला आणणार आहे मी दोन-तीन दिवसात माहेरपणाला. आपण दोघी मिळून तिचे लाड पुरवू."
कल्याणी केशवची मोठी बहीण, सुरभीची अगदी सख्खी मैत्रीण होती. मागच्यावर्षी लग्न होऊन सासरी गेली होती. तिची आनंदाची बातमी ऐकून दोघीही आनंदल्या.
निमा काकू असल्यामुळे सुरभीला खूपच आधार होता आणि आता तर कल्याणी आली की, आई त्यात बिझी होणार होती आणि पैसे तर कमवायला हवेच होते, त्यामुळे नोकरी तर करावीच लागणार होती.
सुरभीने राजला फोन केला. मनात असूनही तिला समरला काहीच कळवता आलं नव्हतं. 'आता खरंच समर रागावला असेल का? माझं हे वागणं बघून माझा जॉब नक्कीच दुसऱ्या कोणालातरी त्याने ऑफर केला असेल का?'
"कशी आहेस सुरभी? अग फार वाईट झालं. बाबांचं कळलं मला. खरंतर तुझं सांत्वन करायला शब्द नाहीत माझ्याकडे. काही मदत लागली तर हक्काने सांग. मी आलो होतो घरी पण तुम्ही सगळे विधी करण्यासाठी गेला होतात. आता मी बाहेरगावी आलोय. दोन दिवसांनी येईन परत" राज म्हणाला
"हो का? तुला कसं कळलं? मी फोन करणार होते पण सगळं इतकं अचानक घडलं की, काहीच सांगू शकले नाही मी. समर सरांना पण काहीच कळवता आलं नाही. त्यांचा नक्कीच गैरसमज झाला असेल. त्यादिवशी आईचा फोन आला आणि मी त्यांना काही न सांगता तशीच निघाले. परिस्थीतीच तशी होती. आता माझा जॉब असेल की, नाही काय माहिती पण त्यांना भेटून सगळं सांगते आणि माफी मागते. मला नंबर देशील त्यांचा." सुरभी म्हणाली
"तुझा काही फोन लागला नाही मग काळजी वाटली मला म्हणून स्वतःच घरी आलो तर तिथे ती भयंकर बातमी मिळाली. तुम्ही सगळेजण विधीसाठी गेलेला होतात म्हणून भेट नाही झाली. नंतर मी फोन केले बऱ्याचदा पण तुझ्याशी बोलणं नाही झालं. मी तुझी मनःस्थिती समजू शकतो. समरला मी सांगितलं आहे सगळं. आधी तो खूप वैतागला होता पण तुझा इतका मोठा प्रॉब्लेम झालाय म्हंटल्यावर तो शांत झाला पण त्याला माणसांची गरज आहे. ऑफिसच ओपिंनिंग झालंय. सध्या माझ्या एका मित्राला मी काही दिवसांसाठी काम करायला तयार केलंय. तुला जमेल तेव्हा भेटून जा समरला पण तुला जास्त दिवस लागणार असतील जॉईन व्हायला तर मात्र नाईलाज आहे. मी नंबर पाठवतो त्याचा." राज म्हणाला
"हो. माझी खरंच काही बोलायची परिस्थिती नव्हती. तुझे खरंच खूप आभार! मी बोलते लगेच त्यांच्याशी आणि जॉईन पण होईन लवकर. बघते बोलून. तुझ्या बोलण्याने खूप आधार मिळाला खरंच. थॅन्क्स." सुरभी म्हणाली
तिने लगेच समरला फोन केला. त्यांनी तिला भेटायला बोलावलं.
ठरल्याप्रमाणे सुरभी समरला भेटायला ऑफिसमध्ये गेली.
"सो सॉरी मिस सुरभी. तुमच्या बाबांचं ऐकून खूपच वाईट वाटलं पण आपल्या हातात काहीच नसतं ना. तुमच्या आई आणि घरचे कसे आहेत? तुम्ही जर जॉईन करू शकणार असाल तर तुमची पोझिशन अजून तुमच्यासाठी ओपन आहे पण स्पष्टच सांगतो मला हे वागणं जमणार नाही. इथे सगळं काही व्यवस्थित असावं असा माझा स्वभाव आहे. कोणालाही आपल्यामुळे त्रास होईल असं वागणं यापुढेमाझ्या स्टाफच असायला नको. तुमचा प्रॉब्लेम जेनुअन होता, हे मान्य आहे पण एखादा फोन किंवा मॅसेज तुम्ही करायला हवा होता. राजने सांगितलं म्हणून बरं. किती काळजी वाटतं होती मला. एकदम न सांगता निघून गेलात? मी मदत केली असती पण ठीक आहे यापुढे मला खडूस बॉस समजू नका. कधीपासून जॉईन होऊ शकता तुम्ही?" समर मनातलं बोलून गेला
"मला खरंच माफ करा सर पण त्या परिस्थीतीत मला काही सुचलं नाही आणि आपली पुरती ओळखही नाही, मग मी तुम्हाला मदत कशी काय मागणार? पण आता मी ठीक आहे.घरचेही सावरतायेत हळूहळू. तुमचे खूप खूप आभार . मी तयार आहे लगेच जॉईन व्हायला." सुरभी समरला म्हणाली
'आता अगदी चोख काम करायचं' असं तिने मनाशी ठरवलं.
समरला कामाची गरज होती आणि सुरभीला सुद्धा त्यामुळे ती लगेच जॉईन झाली.
सुरभीने स्वतः ला कामात झोकून दिलं. तिचं काम, तिचा गोड स्वभाव बघून समर तिच्याकडे हळूहळू आकर्षित होऊ लागला होता. राजही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. सुरभी मात्र फक्त कामाचा आणि आईचा विचार करत होती.
निमा काकू, अधून मधून येणारी मावशी यांनी आईला खुप आधार दिला होता. आता तर कल्याणीसुद्धा आल्यामुळे रंजना बाईंचा वेळ तिच्या कोडकौतुकात चांगला जाऊ लागला होता.
सोहमचा अभ्यास पण सुरू होता. घर सावरू लागलं होतं. वसंत रावांची कमतरता तर सतत जाणवायची पण प्रत्येकजण 'आपण सावरलोय' असं दुसऱ्याला भासवत होता. आपल्या माणसाने आनंदी राहावं हाच त्यामागचा उद्देश होता.
सुरभिला राज नेहमीच एका मोठ्या भावासारखा वाटायचा. त्याच्या मनात मात्र तिच्याबद्दल असणार प्रेम वाढतच होतं.
पण तिच्याही नकळत ती मात्र समरजवळ ओढली जात होती.
आता ते दोघं चांगले मित्र झाले होते. सोहमची परीक्षा झाली. त्याला नवीन जॉबची ऑफर आलीच होती आणि सुदैवाने याच गावात पोस्टिंग मिळाल्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला होता.
सुरभीने ऑफिसमध्ये पेढे वाटले. तिचा आनंद बघून समर सुद्धा आनंदला. त्याने सोहमसाठी छानस गिफ्ट दिलं.
समरचा बिझिनेस छान सुरू होता. आता घरी 'लग्न कर' असा लकडा सुरू होता. 'सुरभीला प्रपोज करावं' असं त्याने मनाशी पक्कं केलं. राजच्या सुद्धा मनात तेच होतं.
इकडे आईलाही सुरभीच्या लग्नाचे वेध लागले होते. वर्षाच्या आत तिचं लग्न व्हायला हवं होतं. आईने आता सुरभीच्या मागे लागून तिचे फोटो काढून घ्यायला लावले. ओळखीच्या ठिकाणी स्थळ सुचवायला सांगितलं होतं. वधू-वर सूचक मंडळातही नाव नोंदणी करायची तिची तयारी चालली होती.
आता सोहम सुद्धा सेटल झाला होता त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. सुरभीची सध्या लग्न करायची इच्छा नव्हती पण आईपूढे तिचं काही चाललं नाही.
राजने शेवटी मनाचा हिय्या करून सुरभीला पत्र लिहून आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि तीला प्रपोज केलं. सुरभीने ते पत्र वाचल आणि तिला धक्का बसला. तसा तो अगदी छान होता पण राजशी लग्न? हा विचार तिच्या डोक्यातही नव्हता पण त्याने तिला वेळोवेळी मदत केलेली तिला आठवली. आईलाही राज आवडायचा. त्याच्या घरचे सुद्धा अगदी छान होते. सगळं छान होतं पण तिला काही सुचत नव्हतं.
राज कामासाठी बाहेर गेला होता. समरने तिला बोलावलं. रात्री तिला तो डेटवर घेऊन गेला आणि आपलं प्रेम त्याने उघड केलं आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. सुरभी मोहरली. तिच्या हृदयात धडधडू वाजू लागले होते.
(नक्की काय होईल? सुरभी राजच प्रेम स्वीकारेल की समरच? जाणून घेऊया पुढील भागात.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा